অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ढेमसा

ढेमसा

ढेमसा

(सं. टिंडिश; हिं. टिंडा, दिलपसंद, टेंडू; इं. इंडियन स्क्वॉश, स्क्वॉश मेलॉन, राउंड गोर्ड; लॅ, सिट्रुलस व्हल्गॅरिस प्रकार फिस्टुलोसस; कुल–कुकर्बिटेसी). या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) पसरट वाढणाऱ्या, रांगणाऱ्या किंवा आरोही (आधारावर चढणाऱ्या) वेलीचे मूलस्थान उत्तर भारत असून भारतात सर्वत्र व बहुतेक उष्ण हवामानाच्या प्रदेशांत हिची लागवड केली जाते. तिचे खोड जाड असते. खोड व पानांचे देठ पोकळ असतात. पाने कमी विभागलेली असतात. फळ लहान, सलगमएवढे, फिक्कट किंवा गर्द हिरवे असून ते दोन्ही टोकांना दामटलेले असते. ते कोवळेपणी राठ केसाळ असते,पण पक्‍व फळांवर राठ केस नसतात. बिया काळ्या असतात. इतर शारीरिक लक्षणे कर्कटी कुलात [⟶ कुकर्बिटेसी] वर्णिल्याप्रमाणे असतात.

कोवळ्या फळांची भाजी करतात. मूग, मसूर, हरभरा इत्यादींसारख्या एखाद्या कडधान्याची डाळ मिसळूनही यांची भाजी करतात. फळात अ आणि क ही जीवनसत्त्वे आणि लोह, कॅल्शियम व फॉस्फरस असतात. फळ थंडावा देणारे असते. ते कोरडा खोकला व रक्ताभिसरणाची तक्रार यांवर उपयुक्त असते. बियांचे औषधी उपयोग करतात. वाळलेल्या बिया भाजून खातात.

उन्हाळी भाजीसाठी ढेमशांची लागवड विशेषतः पंजाब, उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात केली जाते.

कलिंगडाप्रमाणे ढेमशाचे पीकही उन्हाळी हंगामात घेतले जाते. त्याच्या यशस्वी लागवडीसाठी कोरडे, उष्ण हवामान लागते. सखल भागात सामान्यतः त्याची दोन पिके घेतात. उन्हाळी पिकाची लागवड फेब्रुवारीच्या मध्यापासून ते एप्रिलअखेरपर्यंत करतात व नंतरची लागवड जूनच्या मध्यापासून जुलैअखेरपर्यंत करतात. ते थंड हवेच्या ठिकाणी क्वचितच लावतात.

ढेमशाचे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते, परंतु रेताड, दुमट व नदीच्या पात्रातील जमीन याला चांगली असते. मात्र अशा जमिनीत हेक्टरी २५ टन चांगले कुजलेले शेणखत घालतात. जमीन दोन–तीन वेळा उभी–आडवी नांगरून तयार करतात. तसेच हेक्टरी ५० किग्रॅ. नायट्रोजन दोन समान हप्त्यांत देतात. पहिला हप्ता वेल जमिनीवर पसरू लागल्यावर व दुसरा हप्ता फलधारणेस सुरुवात झाल्यावर देतात.

ढेमशाचे सामान्यतः दोन प्रकार आढळतात. फिकट हिरव्या फळांचा एक प्रकार व गर्द हिरव्या फळांचा दुसरा प्रकार असतो. त्यांपैकी फिकट हिरव्या फळांचा प्रकार जास्त पसंत केला जातो. सी–९६ हा पंजाबमधील सुधारित प्रकार आहे.

लागवड सामान्यतः सरीला करतात. दोन सऱ्यांत १ ते १·५ मी. अंतर असते. सरीच्या दोन्ही बाजूंना एक मीटर अंतरावर एका जागी ४–५ बिया १–२ सेंमी. खोल टोकतात. हेक्टरी ४·५–८ किग्रॅ. बी लागते. लागवडीनंतर लगेच पाणी देतात. ४–५ दिवसांच्या अंतराने एकूण १०–१५ पाण्याच्या पाळ्या देतात. ४–५ दिवसांत उगवण होते. १५ दिवसांनी कमजोर रोपांची विरळणी करून एका जागी २–३ जोमदार रोपे ठेवतात. एक–दोन वेळा खुरपणी करून तणांचा नायनाट करतात. त्यानंतर मातीची भर देतात.

लागवडीनंतर २०–२५ दिवसांनी फुलांचा पहिला बहार येतो. या बहाराला येणारी फळे अक्रोडाएवढी बारीक राहतात म्हणून दिसू लागताच ती काढून टाकतात. त्यामुळे वेलीची वाढ चांगली होते. हा बहार काढला नाही, तर पुढचा बहार काहीसा उशिरा येतो. यानंतर येणाऱ्या बहारांची फळे विक्रीयोग्य मोठी होतात. ४०–५५ दिवसांत फळे विक्रीस तयार होतात. एका वेलीस ६–७ फळे लागतात. कोवळी, केसाळ व आतील बिया मऊ असताना फळे तोडतात. ३–४ दिवसांच्या अंतराने तोडणी करतात. तोडलेली फळे सावलीत ठेवतात व लगेच करंडे भरून ताज्या स्थितीत विक्रीस पाठवितात. हेक्टरी १०,००० किग्रॅ. फळांचे उत्पन्न येते.

ढेमशांवर भुरी नावाचा रोग पीक निघण्याच्या शेवटी पडतो. तो लवकर पडल्यास पिकावर गंधकाची २५० मेश भुकटी उडवितात. मावा व तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी मॅलॅथिऑन फवारतात. पाने खाणाऱ्या व फळे पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी कार्बारिल पाण्यात मिसळून फवारतात.

 

पहा : कलिंगड; काकडी

संदर्भ : Yawalkar, K. S. Vegetable Crops of India, Nagpur, 1963.

जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate