पंपकिन, स्क्वॉश, रेडगोर्ड, रेड पंपकिन, मस्क मेलॉन, मेलॉन पंपकिन, कुशॉ, कॅनडा क्रूक नेक, विंटर क्रूक नेक; लॅ. कुकर्बिटा मोशाटा; कुल-कुकर्बिटेसी). या वर्षायू (एका हंगामात जीवनक्रम पूर्ण होणाऱ्या), आरोही (आधाराने वर चढणाऱ्या) किंवा सरपटणाऱ्या) किंवा सरपटणाऱ्या वेलीच्या पंचकोनी खोडावर केस नसतात. पाने नरम, मखमली व खंडित असून त्यांवर बहुधा पांढुरके अथवा रंगीबेरंगी ठिपके असतात. पानांच्या देठावर मउ केस असतात. पुष्पमुकुटाची नलिका खालून वरच्या बाजूस रुंद होणारी असून पाकळ्या रुंद व ताठ अभ्या असतात. स्त्री-पुष्पाच्या संवर्ताचे खंड मोठे व पानासारखे असतात [⟶ फूल]. फळाचे देठ खोल कंगोरेदार असून फळांशी जोडलेल्या जागी ते पसरट असतात. फळात प्रामुख्याने दोन प्रकार आढळून येतात. एका प्रकारात ती गुळगुळीत व काहीशी लंबगोल व दुसऱ्या प्रकारात ती खोबणीदार आणि गोल किंवा बसकी असतात. कोवळी फळे गर्द हिरवी असतात व पिकल्यावर त्यांच्या पृष्ठभागांवर मृदुलक (हिरव्या-निळ्या रंगाचे नाजूक मखमली आवरण) असते. मगजाचा (गराचा) रंग पिवळा अथवा काळपट नारिंगी असतो. बिया सपाट व करड्या किंवा तपकिरी असून त्यांची किनार बियांच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाची असते.
फळाचा वाळलेला मगज रक्तयुक्त थुंकी आणि फुप्फुसातून होणाऱ्या रक्तस्राव यांवर गुणकारी आहे. फळाला लागून असलेला देठाचा भाग वाळवून व पाण्यात उगाळून विषारी कीटकांच्या (विशेषतः गोमेच्या) दंशाच्या जागी लावतात व हा खात्रीशीर इलाज असल्याचे मानण्यात येते.
जमीन : या पिकाला कोणतीही चांगल्या निचऱ्याची जमीन चालते. वेलाची मुळे जमिनीच्या वरच्या भागात वाढणारी व पसरणारी असतात. धुळे जिल्ह्यात नदीकाठच्या जमिनीत भोपळ्याची लागवड करतात.
प्रकार : काळा भोपळा भारतात सर्वत्र लागवडीत आहे. यात आकार, आकारमान आणि मगजाचा रंग या बाबतींत भिन्नता असलेले अनेक प्रकार आढळून येतात. मोठा लाल, मोठा हिरवा, मोठा गोल, पिवळा मगज व लाल मगज हे लागवडीतील सामान्य प्रकार आहेत. अर्का चंदन, आय. एच. आर ८३-१-१-१ आणि सी. ओ. १ हे सुधारित प्रकार उपलब्ध आहेत. अर्का चंदन या हळव्या प्रकाराची फळे मध्यम आकारमानाची (२.५ ते ३.५ किग्रॅ. वजनाची) व गोल आकाराची असून वरच्या व खालच्या टोकाला काहीशी चपटी असतात. मगज घट्ट असून फळाच्या सालीचा रंग फिकट हिरवा असतो. बी लावल्यापासून १२५ दिवसांत फळे तयार होतात. दर वेलाला ४-५ फळे धरतात. वाहतुकीत फळे चांगली टिकतात. फळांत कॅरोटिनाचे प्रमाण पुष्कळ असते. आय. एच. आर ८३-१-१-१ प्रकाराची फळे मध्यम आकारमानाची (२ ते ३ किग्रॅ. वजनाची) व गोल असून वरच्या व खालच्या बाजूला जास्त चपटी असतात. सालीचा रंग फिकट तपकिरी ते पिवळा असून खोवणी उथळ असतात. सी. ओ. १ ची फळे गोलाकार व ७ ते ८ किग्रॅ. वजनाची असून बी लावल्यापासून १७५ दिवसांत फळे तयार होतात.
पावसाळी पिकाचे हेक्टरी उत्पादन १३,७०० ते १८,८०० किग्रॅ. व उन्हाळी पिकाचे ६,५०० ते ७,५०० किग्रॅ. असते.
संदर्भ : 1. Chauhan, D. V. S. Vegetable Production in India, Agra, 1972.
2. Choudhury, B. Vegetables, New Delhi, 1967.
3. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, Delhi, 1950.
क्षीरसागर, ब. ग.; परांडेकर, शं. आ.; गोखले, वा. पु.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
या कुलात अनेक उपयुक्त वनस्पतींचा समावेश आहे. फळे ब...
तोंडलीची फळे बीटा-कॅरोटिनाचे उत्तम स्रोत आहेत. याख...
वाळलेल्या बिया भाजून खातात.