गुंज :(हिं.चिर्मिती, गुंची; गु. चनोती; इंडियन लिकराइस, रोजरी पी; लॅ.अॅब्रस प्रिकॅटोरियस; कुल-लेग्युमिनोजी; उपकुल-पॅपिलिऑनेटी). सु. पाच-सहा मी.पर्यंत उंचीवर, दुसऱ्या झाडावर चढत जाणारी ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) पानझडी व बारीक फांद्यांची वेल भारतात सर्वत्र आढळते.महाराष्ट्रात कोकण व कर्नाटकातील उत्तर कारवार येथील समुद्रकाठच्या विरळ व दमट जंगलांत विशेष आढळते; बागेत व शेतातही लावतात; उष्ण कटिबंधात इतरत्र ही वेल सामान्यपणे सापडते. खोड गुळगुळीत; पाने संयुक्त व समदली, पिच्छाकृती (५ — १० x ३ सेंमी.); दले लहान व १० — २० जोड्या असतात; फुले पतंगरूप [→ अगस्ता], लहान व गुलाबी असून गर्दीने मंजऱ्यांवर पावसाळ्यात येतात. फळे (शिंबा, शेंगा) वाटाण्याच्या शेंगेएवढी, टचटचीत, लवदार असून तडकल्यावर त्यांतल्या ४ — ६ बिया दिसतात; याच गुंजा होत. यांत दोन प्रकार आहेत; लाल व पांढऱ्या; बहुधा गुंजेवर काळा ठिपका असतो; त्या कधी पूर्ण काळ्याही असतात; तसेच त्या किंचित लांबट, वाटोळ्या, गुळगुळीत व चकचकीत असतात. सामान्य शारीरिक लक्षणे लेग्युमिनोजी कुलात वर्णिल्याप्रमाणे. मुळे, पाने व बी औषधी आहेत. मुळे व पाने मधुर परंतु बी तिखट असते. ही सर्व पौष्टिक, पित्तनाशक, रुचिवर्धक, कांतिवर्धक, नेत्ररोगहारक, श्वेतकुष्ठनाशक, चर्मरोगहारक असून जखमा व कंडू यांवर उपयुक्त. यांशिवाय ज्वर, मुखरोग, डोकेदुखी, दमा, दात किडणे व तहान यांवर मुळे व पाने गुणकारी असतात. मुळांचा रस कफनाशक असून घसा (आवाज)बसला असता ज्येष्ठमधाऐवजी पाने चावून खाल्ल्यास तो सुटतो. बिया थोड्या प्रमाणात सारक व वांतिकारक पण अधिकांश विषारी; दुभत्या जनावरास गर्भनाशक व प्राणनाशकही
ठरतात; म्हणून तसा दुरुपयोग केला जातो. बियांचे चूर्ण दुधात उकळून प्याल्यास पौष्टिक व कामोत्तेजक असते. सांधे धरणे पक्षाघात गृध्रसी (राजचेता शूल ढुंगण व पायाची मागची बाजू यांतून जाणाऱ्या मज्जेतील वेदना) यांवर बीजाचे लेपन करतात. चित्रक मुळीसह हाच लेप श्वेतकुष्ठावर (कोडावर) लावतात. बीजांचे चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकात ओढल्यास तीव्र डोकेदुखी थांबते. बियांतील विषारी द्रव्यात अॅब्रीन हे ग्लुकोसाइड प्रमुख घटक असून ते एरंडाच्या बियांतील रिसिनाप्रमाणे असते. पूर्वी सोने वजन करण्यासाठी बिया माप म्हणून वापरीत असत. | |
---|---|
गुंज : (१) संयुक्त पाने, फुलोरा व शिंबा यांसह वेल; (२) तडकलेली शिंबा |
लेखक- परांडेकर, शं. आ
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
ज्येष्ठमध : (ज्येष्ठमध, ज्येष्ठीमध; हिं. मुल्हट्टी...
या फुलझाडांपैकी बोरॅजिनेसी, पोलेमोनिएसी व हायड्रोफ...
टेलँथीरा फायकॉइडिया : (कुल-ॲमरँटेसी). ही लहान, सरळ...
ही लहान ओषधी मोकळ्या पडीत जागी किंवा कचऱ्याच्या ढि...