मित्रांनो, नमस्कार! विजेचे आपल्या जीवनात अतिशय महत्वाचे स्थान आहे. ‘विजेशिवाय जनजीवन’ याची आपण कल्पना देखील करु शकत नाही. कारण Electricity हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. सर्वसामान्य लोकांचे जनजीवन सुरक्षित रहावे यासाठी विजेचा सुरक्षितरीत्या वापर होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि विद्युत सुरक्षिततेचे महत्व सर्वस्तरावर तसेच जनमानसात पोहोचविण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरीक्षणालय कार्यरत आहे.
24 एप्रिल 2015 पासून विद्युत निरीक्षणालय हे स्वतंत्रपणे मुख्य विद्युत निरीक्षक यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली तसेच मंत्री (ऊर्जा) व प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अधिपत्याखाली नवीन उत्साहाने कार्यान्वित झाले आहे. आता दररोज बाजारात नवनवीन विद्युत उपकरणे येत आहेत व आपले जीवन अधिक सुखकर व्हावे म्हणून या उपकरणांचा आपण जास्तीत जास्त वापर करीत आहोत. तथापि विद्युत उपकरणांची योग्यरित्या हाताळणी न केल्यामुळे विद्युत अपघाताने जिवीतहानी होण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 1500 माणसे विद्युत अपघाताने दगावतात अथवा जायबंदी होतात. विद्युत शार्ट सर्किटमुळे आग लागून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान होते. विद्युत अपघातामुळे बरीच कुटुंबे उध्वस्त होतात.
वरील घटनांच्या चौकशीत असे आढळून येते की, यातील बहुतेक सर्व अपघातांचे कारण हे अप्रमाणित वीजसंच मांडण्या, शासनमान्य विद्युत ठेकेदार व विद्युत पर्यवेक्षकाकडून वीजसंच मांडणीची उभारणी व देखभाल न करणे, हलक्या दर्जाची वीज उपकरणे वापरणे, कमी खर्चात वीजसंच मांडणी उभारण्याचा मोह व अपुरी चुकीची देखभाल व दुरुस्ती करणे हेच आहे. 21व्या शतकात विद्युत क्षेत्रात आमुलाग्र तांत्रिक बदल घडून आले आहेत.
स्वयंचलित व अचूक विद्युत सुरक्षा यंत्रणा निर्माण झाल्या आहेत. तरीसुद्धा विद्युत उपकरणे सुरक्षितपणे हाताळण्याचे अज्ञान, बेफिकीरी अथवा फाजील आत्मविश्वास अथवा अतिउत्साह हे मानवी घटकही विद्युत अपघातास तेवढेच कारणीभूत आहेत. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. मंत्री (ऊर्जा) नवीन व नवीकरणीय ऊर्जा यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली व विद्युत सुरक्षिततेबाबत सर्वसामान्य जनतेत जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रधान सचिव (ऊर्जा) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य विद्युत निरीक्षक यांच्यामार्फत जिल्ह्यातील विद्युत निरीक्षक, सर्व विद्युत पुरवठाकार, परवानाधारक, विद्युत ठेकेदार, त्यांच्या संघटना उद्वाहन निर्मिती करणारे उत्पादक, उद्वाहन उभारणी करणारे ठेकेदार, महावितरण, टाटा, बेस्ट, रिलायन्स औद्यौगिक प्रतिष्ठान इत्यादींच्या सहभागाने व आर्थिक सहकार्याने 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2016 या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ आयोजित करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात विद्युत निरीक्षणाचे विभागीय कार्यालय आहे. त्यांच्यामार्फत विद्युत कायदा 2003 व केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम 2010 यातील तरतुदीचे अनुपालन वीज उपभोक्त्यांनी करावे व विद्युत अपघात टाळण्यास मदत करावी.
सर्वसामान्य लोकांमध्ये विद्युत सुरक्षिततेबाबत जागरुकता निर्माण करणे हा या विद्युत सुरक्षा सप्ताहामागचा प्रमुख उद्देश आहे. कारण विद्युत शक्ती ही अशी बाब आहे की, जिथे चुकीला माफी नाही. त्यामुळे यासंदर्भात काम करणारे व्यावसायिक, वीज वापरणारे अथवा त्यांच्या संपर्कात जाणारे, अशा प्रत्येकाला याचे गांभीर्य कळावे आणि होणारे अपघात टाळावे यासाठी हा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे.
विद्युत उपकरणे हाताळणे वा त्यावर काम करणे हे या क्षेत्रातील निष्णात लोकांचेच काम आहे. कोणीही उठून नळाला पाईप जोडून हवे तिथे पाणी वाहून नेऊ शकतो इतके ते सोपे काम निश्चितच नाही. एखादा फ्यूज झालेला बल्ब अथवा ट्यूब नळी बदलणे इतपत ठीक आहे. पण लोक नको त्या धोकादायक पातळीला जाऊन काम करतात आणि त्याचे दुष्परिणाम ओढवून घेतात. तेव्हा ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे की तुमच्या चुकीमुळे केवळ तुम्हालाच नाही तर इतरांनाही मोठा धोका होऊ शकतो. आणि प्रसंगी होणारी जिवीत अथवा वित्त हानी ही सर्वस्व उध्वस्त करुन टाकणारी असू शकते. तेव्हा सावधान! जीवन बहुमूल्य आहे.
आपल्यातील अनेक लोक अगदी व्यावसायिकही विद्युत हाताळणीविषयी निष्काळजीपणाने वागतात असे लक्षात येते. उदा. विद्युत पुरवठा करणारी उपकरणे, वापर, त्यावर असलेला लोड इ.अनेक उदाहरणे दाखवता येतील. आता जोपर्यंत हे कामचलाऊ प्रकार टिकतात तोपर्यंत ठिक असते. पण जेव्हा काही बिघाड होतो तेव्हा निर्माण होणारा धोका हा वाचवलेला वेळ, पैसा आणि श्रम यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो. किंबहुना परत कधीही भरुन निघणार नाही असे त्याचे अत्यंत भयंकर परिणाम असू शकतात. म्हणजे वीजेविषयी अज्ञान असणे ही गोष्ट जितकी भयानक आहे, त्याहीपेक्षा ज्ञान असूनही निष्काळजीपणा, फाजील आत्मविश्वास दाखविणे हे अधिक भयंकर म्हटले पाहिजे. आणि या बाबतीत सर्व स्तरांमध्ये जागरुकता निर्माण करणे हे आपल्या ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ आयोजित करण्यामागच्या उद्दिष्टांपैकी एक आहे.
त्याचबरोबर अनेक लोक विद्युत उपकरणे हाताळताना अतिउत्साह दाखवतात आणि त्यामुळे अपघात घडतात आणि याचे प्रमाण आज इतके वाढले आहे की, या बाबतीत खरंच लोकांना पुन्हा पुन्हा जागृत करणे ही अत्यावश्यक बाब होऊन बसली आहे. या अतिउत्साहात अगदी निष्णात लोक देखील हातात रबरी ग्लोव्हज घालणे, पायात सेफ्टी शूज वापरणे, इतकेच काय तर विद्युत पुरवठा बंद करुन मग काम करणे इतके छोटे उपायही करीत नसल्याने जिवीतहानी झाल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. तसे पाहिले तर हॅन्ड ग्लोव्हज किंवा सेफ्टी शूज घालायला 10 ते 15 सेकंद लागतात. पण ते न केल्याने एक जीव गमवावा लागला तर मागे उरलेल्या कुटुंबाने कोणाच्या आधारावर जगायचे ? म्हणजे सुरक्षेचे उपाय हे केवळ आपल्यासाठी नसून आपल्याशी निगडीत प्रत्येक घटकासाठी तितकेच महत्वाचे आहेत. हे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आपला उद्देश आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केंद्रीय विद्युत नियम हे उपभोक्त्याच्या वायरिंगचे नियंत्रण व सुरक्षा यासाठी बनविले आहेत. यासाठी उपभोक्त्याने आपल्या विद्युत संच मांडणीसाठी भारतीय मानक संस्थेने (आय.एस.आय) प्रमाणित केलेले साहित्य व दर्जा नियंत्रण मंडळाने प्रमाणित केलेली घरगुती विद्युत उपकरणे वापरावीत. आपल्या कृषी, वाणिज्य, औद्योगिक विद्युत संच मांडणीची (वायरींगचे) संकल्पचित्र, उभारणी व चाचणी ही कामे शासन मान्यताप्राप्त अनुज्ञाप्तीधारक विद्युत ठेकेदारांकडून करुन घेणे बंधनकारक आहे.
विद्युत कायदा, 2003 व केंद्रीय विद्युत प्राधिकरण विनियम, 2010 नुसार 15 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतीच्या नवीन वायरींगचे निरीक्षण व परवानगी, नवीन उच्च दाब, अती-उच्च दाब, जनित्र विद्युत संच मांडणीचे विद्युत निरीक्षण विभागातर्फे निरीक्षण करुन घेणे, परवानगी घेणे आणि आपले वायरींग सुरक्षित असल्याची खात्री करुन घेणे बंधनकारक तर आहेच, पण ही आपली जबाबदारी देखील आहे.
याच विद्युत नियमानुसार वाणिज्य, मध्यमदाब, जनित्रसंच, उच्चदाब आणि अति उच्चदाब ह्या प्रकारच्या वीज संच मांडण्यांचे, विद्युत निरीक्षकांमार्फत दरवर्षी निरीक्षण करुन घेणे, आपले वायरींग निर्धोक असल्याची खात्री करुन घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
प्रत्येक विद्युत संच मांडणीचे संकल्पचित्र, ज्यामध्ये सर्व तांत्रिक बाबी, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियंत्रण, सुरक्षेची योग्य व्यवस्था व वायरींगवर योग्य भार (लोड) जोडणी, याचा विचार केल्यास त्यायोगे अतिभारामुळे होणारे धोके, स्पार्किंग होऊन आग लागणे, वायरींग नादुरुस्त झाल्याने काम बंद पडणे हे प्रभावीपणे व यशस्वीरित्या टाळता येईल. त्याचप्रमाणे ई.एल.सी.बी./एम.सी.बी. सारखी सुरक्षिततेची साधने सर्वसाधारण वायरींगवर वापरुन होणारे नुकसान टाळता येईल.
या विद्युत सुरक्षा सप्ताहात मुख्यत्वे विद्युत संच मांडणी सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे, काय करु नये, विद्युत उपकरणे हाताळणीबाबत, उद्वाहनांचा सुरक्षित वापर करण्याबद्दलचे निकष, सुरक्षेच्या बाबी लक्षात घेऊन बनवले गेलेले नियम, गुणवत्ता, प्रशिक्षण, मार्गदर्शन, नियम न पाळल्यास होऊ शकणारी कारवाई अशा अनेक गोष्टींबाबत प्रबोधन केले जाईल.
याचा लाभ विद्युत विभागात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार तसेच त्यांच्याकडे काम करत असलेले कामगार, पर्यवेक्षक अशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी पथनाट्य, चर्चासत्रे, बॅनर, रॅली, होर्डिंग्ज, विविध प्रचार माध्यमांचा वापर करुन लोकांपर्यंत हा विषय पोहोचविण्यात येणार आहे. तसे पाहता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या लोकांपर्यंत पथनाट्याव्दारे हे प्रबोधनात्मक विचार रुजविणे ही काळाची गरज ओळखून या सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले गेले आहे. या उपक्रमाचा लाभ ग्रामीण जनतेलाही व्हावा असे कार्यक्रम आखले गेलेले आहेत. या बरोबरीने पुढच्या पिढीला यासंदर्भात जागरुक करता यावे, यासाठी शालेयस्तरावरही सुरक्षा सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
जसे शाळांमधून या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विद्युत सुरक्षा या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान असे भरघोस कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
मुळात ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ हा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यामागे प्रमुख उद्देश असा आहे की यादरम्यान कोणतेही शालेय परीक्षांचे वेळापत्रक आड येत नाही. त्यामुळे वर्षातला हा काळ योग्य म्हणूनच 11 ते 17 जानेवारी 2016 या तारखेच्या दरम्यान हे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने लोकांपर्यंत सुरक्षा, जागरुकता, प्रबोधन पोहोचवता आले की लोकही याचे गांभीर्य ओळखतील, आपापसात चर्चा करतील आणि हळूहळू जनमाणसात आपले उद्दिष्ट पोहोचेल.
मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या; कितीही कायदे केले, कडक नियम लावले आणि कठोर शासन केले तरी जोपर्यंत आपण या बाबतीत जागरुक होत नाही, तोपर्यंत आपण होणारी हानी थांबवू शकत नाही. तेव्हा प्रत्येकाने कसोशीने नियम व निकष पाळा आणि विद्युत अपघात टाळा हाच आपला मूलमंत्र हाच आपला ध्यास…!!!
लेखक - सुहास रा. बागडे, मुख्य विद्युत निरीक्षक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मुंबई.
माहिती स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 6/30/2020
विद्युत संचमांडणीमध्ये वापरण्यात येणारे साहित्य व ...
आपत्तीच्या काळात म.रा.वि.वि.कंपनीची जबाबदारी.
खाजगी वीज निर्मिती होऊन ऊर्जा क्षेत्रात स्पर्धा नि...
विद्युत मोटार आय.एस.आय. मान्यताप्राप्त असावी. मोटा...