विद्युत मोटार आय.एस.आय. मान्यताप्राप्त असावी. मोटारीची किंमत वाजवीपेक्षा अधिक असू नये. कामांचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य त्या अश्वशक्तीची मोटार घ्यावी. मोटार बसविण्याची जागा ही पाणी, धूळ अथवा कचरा यांपासून संरक्षित असावी. मोटार तापून तिच्या वेटोळ्यातील तारेवरचा पापुद्रा जळून वेटोळे काळे पडले, की मोटार जळाली असे समजावे. कमी अश्वशक्तीच्या मोटारीवर त्यापेक्षा जास्त काम करून घेण्याचा प्रयत्न केल्यास तारेचे वेटोळे जास्त विद्युत प्रवाह घेण्याचा प्रयत्न करते आणि मोटार जळते. मोटारीवरील तारेचे वेटोळे पाण्यात बुडाले किंवा ओले झाले की मोटार जळते. कीटक, लहान बेडूक, उंदीर मोटारीत शिरले आणि त्यांचा विद्युत वाहक भागाशी स्पर्श झाल्यास तारांमधील विद्युत प्रवाह अनियमित होऊन मोटार जळते. मोटारीत धूळ, कचरा जास्त झाल्यास ती तापते. मोटारीतील रोटर व स्टार्टर एकमेकांवर घासले गेल्यास मोटार जळते.
बिघाड टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
मोटारीवर पाणी उडू देऊ नये, ती सुरू करण्यापूर्वी मोटारीत पाणी शिरलेले नाही याची खात्री करून घ्यावी. कचरा, धूळ, कीटक, उंदीर वगैरेंपासून मोटार संरक्षित ठेवावी. बेअरिंगला वेळच्या वेळी ग्रीस व तेल द्यावे. कमी शक्तीच्या मोटारींकडून जास्त शक्तीचे काम करून घेऊ नये. मोटार सतत चालवू नये, तिला अधूनमधून विश्रांती द्यावी. मोटार जळाल्यास खात्रीच्या ठिकाणाहून रिवाइंडिंग करून घ्यावी.
फ्यूज वायर योग्य त्या रेटिंगचीच निवडावी, म्हणजे कुठल्याही कारणामुळे बिघाड झाल्यास फ्यूज वायर तुटून मोटारीला संरक्षण मिळेल व ती जळणार नाही.
विजेपासून अपाय होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी
मोटारीसाठी अर्थिंग करून घ्यावे. कोरड्या लाकडी फळीवर उभे राहून बोर्डाचे काम करावे; तसेच रबरी बूट, चप्पल वापरावेत, मात्र ते ओले असू नयेत. फ्यूज तार बसविताना रबरी हातमोजे वापरावेत. मोटार चालू असताना मोटारीच्या कुठल्याही भागाला हात लावू नये. मोटारीचे काम पूर्ण झाल्यावर नंतर मेन स्वीच बंद करावा.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन