देशात आज सौरऊर्जा, पवनऊर्जा अशा अपारंपरिक ऊर्जा साधनांचा अधिकाधिक वापर करून परांपरागत साधनांवरील ताण कमी करण्याची गरज आहे. देशात उदंड सूर्यप्रकाश आहे आणि भरपूर वारे वाहत आहेत. त्यांचा उपयोग करून वीज निर्माण केली तर पेट्रोल, डिझेल, गॅस, कोळसा आदी परंपरागत ऊर्जा साधनांचा तेवढाच वापर कमी होणार आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात आपले परकीय चलनसुद्धा वाचणार आहे. म्हणून लोकांनी सौरऊर्जा वापरावी, हे खरे पण जोपर्यंत समाजधुरीण अशा वापराचा आदर्श उभा करीत नाहीत, स्वत: वापरून उदाहरण घालून देत नाहीत तोपर्यंत सामान्य माणसाला ही ऊर्जा साधने वापरावीशी वाटणार नाहीत. म्हणून राज्यपालांच्या राजभवनावर सौरऊर्जेतूनच सारे व्यवहार व्हावेत, असा केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा साधन मंत्रालयाने निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध राज्यांच्या राजभवनांवर सौरऊर्जा प्रकल्प राबवला जात आहे. यापूर्वी आसाम, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांच्या राजभवनांवर सौरऊर्जा प्रकल्प राबवले गेले आहेत. तिथले सर्व व्यवहार आता वीज मंडळाच्या विजेवर चालत नसून सौर ऊर्जेवर चालत आहेत. सौरऊर्जेवर संशोधन करणा-या लोकांनी या उर्जा साधनांवर दिवे लावण्याबरोबरच पंखे, वातानुकूलित यंत्रणा, फ्रीज, टीव्ही हीही साधने चालवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे एखाद्या ग्राहकाने आपल्या घरातले सगळेच व्यवहार सौर ऊर्जेवर चालावेत, असा अट्टाहास केला तर त्याला ते शक्य होईल आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या विजेची त्याला अजिबात गरज भासणार नाही, इतके संशोधन या क्षेत्रात झालेले आहे. शेतातल्या विहिरीवर चालणारे पंपसुद्धा सौरऊर्जेवर चालत आहेत.
महाराष्ट्रातली काही गावे सौरऊर्जेमुळे पूर्णपणे भारनियमनमुक्त झाली आहेत. तरीसुद्धा अजून या ऊर्जा साधनांच्या बाबतीत म्हणावी तेवढी जागृती झालेली नाही. म्हणूनच राज्यपालांच्याच बंगल्यावर सौर ऊर्जेने दिवे उजळायला लागले की, समस्त जनतेलासुद्धा आपण सौर ऊर्जेची कास धरावी, असे वाटायला लागेल. आपण जेवढी सौरऊर्जा वापरू तेवढी कमीच आहे. तिला लागणारे साधन म्हणजे सूर्यप्रकाश उदंड उपलब्ध आहे. जोपर्यंत सूर्य चमकत आहे तोपर्यंत सौर ऊर्जेला तोटा नाही. मुख्य म्हणजे सौर ऊर्जेचा कच्चा माल निसर्गात फुकटात उपलब्ध आहे. वाराही निर्सगात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. वारे वाहात आहेत तोपर्यंत पवनऊर्जेला काही तोटा नाही. म्हणूनच राजभवनावरील कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनी जनतेला सौर ऊर्जेची कास धरण्याचे आवाहन केले. सौर ऊर्जेच्या वापरामुळे कोळसा, गॅस इत्यादींच्या आयातीवर होणारा खर्च कमी होईल. पूर्वी पारंपरिक वीज आणि सौरऊर्जा यांच्या उत्पादनाच्या खर्चात मोठा फरक होता. त्यामुळे सौरऊर्जा महाग वाटत होती. पण आता औष्णिक वीज केंद्रातील वीज महाग झाली आहे आणि सौरऊर्जा साधनांच्या किमती कमी झाल्या आहेत. तेव्हा प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या घरात शक्य तेवढी सौरऊर्जा निर्मिती करावी. अशा प्रकारे ती तयार करणे, हेच खरे देशकार्य ठरणार आहे. राज्यपालांनी त्यासाठीच स्वत:च्या बंगल्यावर ती वीज वापरून उदाहरण घालून दिलेले आहे.
अंतिम सुधारित : 10/7/2020
पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल विद्युत सहवीज निर्मिती...
मानवाच्या विकास उन्नतीमध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत...
नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालय मोठ्या शहरां...
जैव पदार्थापासून विद्दुत निर्मिती या प्रकल्पात ११ ...