অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वीजप्रवाह - पावसाळ्यात घ्यावयाची काळजी

वीजप्रवाह - पावसाळ्यात घ्यावयाची काळजी

पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. भर पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे हे आपल्यासाठी नवीन नाही. याची कारणे वेगवेगळी आहेत. या काळात वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, पाणी तुंबून ते वाहिनीत शिरणे, वीज कोसळणे किंवा विजेचा दाब वाढणे आदींमुळे वीजपुरवठा खंडित होतो. अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे तसेच पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने विविध दुर्घटना घडतात. त्यामुळे जिवीतहानीचा धोका निर्माण होतो. तो टाळण्यासाठी सतर्कता हाच सर्वोत्तम उपाय आहे.

वीजपुरवठा खंडित होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. यापैकी एक कारण म्हणजे वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पिन किंवा डिस्क इन्सूलेटर (चिमणी) तसेच डीपी स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर. हे डिस्क इन्सूलेटर चिनीमातीचे असतात. उन्हाळ्यात हे इन्सूलेटर तापतात. त्यावर पावसाचे दोन-चार थेंब पडले की तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीजप्रवाह खंडित होतो. याशिवाय भूमिगत वाहिन्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांसाठी खोदकाम केले जाते. यात भूमिगत वाहिन्यांना धक्का बसतो. वाहिनीला भेगा पडतात. पावसाला सुरूवात झाली की पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व वाहिनीत बिघाड होतो. परिणामी वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे या काळात सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

ही काळजी घ्या

  • पावसाचे पाणी मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व तत्काळ महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधून मीटरची जागा बदलून घ्यावी.
  • पावसाळ्यात घरातील कोळी, किटक, पाल, झुरळ, चिमण्या, उबदार जागा म्हणून मीटर तसेच स्वीच बोर्डच्या आश्रयाला येतात, त्यामुळे शॉटसर्किट होऊ शकते. त्यादृष्टीनेही खबरदारी घ्यावी.
  • पावसाळ्यात विद्युत उपकरणे असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये.
  • तसेच ओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे शॉक लागण्याची शक्यता असते.
  • विद्युत उपकरणावर पाणी पडले अथवा त्यात पाणी शिरले तर ते उपकरण त्वरित बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे. त्यामुळे त्या उपकरणातून शॉक लागण्याची शक्यता राहणार नाही.
  • घराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्याशेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरली पाहिजे.
  • अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्किट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्किट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते.
  • घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे.
  • सर्व वीज उपकरणांची अर्थिंग योग्य असल्याबाबतची खबरदारी घ्यावी.
  • योग्य अर्थिंगमुळे शॉकची तीव्रता कमी होते तसेच उच्च दाब असलेल्या मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रीज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.
  • पूर किंवा अतिवृष्टीमुळे तसेच नदीकाठच्या परिसरात कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करावा.

हे टाळा

  • विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नयेत. तसेच त्यावर कपडे वाळत टाकू नयेत. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा.
  • घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे.
  • विद्युत उपकरणे दुरुस्ती करताना मेन स्वीच बंद करावा.
  • दुरुस्तीदरम्यान पायात रबरी चपला घालाव्यात व पायाखालची जमीन ओलसर असू नये याची खबरदारी घ्यावी.
  • वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये. तसेच वायरची जोडणी करावीच लागली तर त्यावर टेप लावावी.
  • मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने जमिनीवर पडलेल्या वीजतारांना स्पर्श करू नये आणि तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे.
  • पावसापासून बचाव करताना आजूबाजूला जीवंत विद्युततारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्यावी. त्यास हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करु नये.

टोल फ्री क्रमांक

शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 हे दोन टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. वीज ग्राहकांना विजसेवेविषयक तक्रार दाखल करता येणार आहे. यासोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे.

स्थानिक तक्रार निवारण केंद्रे कायमस्वरुपी बंद केल्याने ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावरच तक्रार नोंदवावी.

लेखिका - मनीषा पिंगळे,
जिल्हा माहिती अधिकारी, पालघर.

स्त्रोत : महान्युज

 

अंतिम सुधारित : 11/16/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate