অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुप्रजनन : वैज्ञानिक दृष्टीकोन

 

आपले अपत्य शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्ट्या उत्तम असावे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते, त्याशिवाय ती स्वत:ला अपूर्णच समजते. केवळ आई होणं ही एकच जबाबदारी तिच्यावर नसते तर आजच्या धावपळीच्या जीवनात ‘एक अपत्य–सुखी दांपत्य’ ह्या सूत्राचा अवलंब करताना एकुलते एक अपत्य सुसंस्कृत, सुजाण, सुदृढ व सर्वांग परिपूर्ण असणे गरजेचे आहे. सुप्रजनन हा आयुर्वेदाचा मूळ गाभा आहे.

दर महिन्याच्या मासिक ऋतुचक्रामध्ये रजःप्रवृत्तीपासून १२ ते १६ दिवस गर्भधारणेसाठी योग्य असतात. गर्भशयामध्ये ह्याच काळात बीजाचे रोपण होणे शक्य असते. त्या वेळी रसाधातुचे पोषण होणे आवश्यक आहे. बीज, बीजभागदृष्टि गर्भाच्या आरोग्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पुरुषाचे शुक्र हे सुद्धा उत्तम प्रकारचे असणे आवश्यक आहे. जन्मास येणाऱ्या बालकाचे आरोग्य पूर्णत: माता–पित्याच्या मानसिक व शारीरिक अवस्थेवर अवलंबून असते. त्यासाठी आवश्यक शरीरशुद्धी, आहार–विहार व औषधी यांचा गर्भावर होणारा परिणाम यासंबंधी विचार करणे आवश्यक आहे.

सदृढ गर्भधारणेसाठी स्त्रीबीज व पुरुषबीज सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वात पहिला उपचार म्हणजे शरीरशुद्धी. यासाठी अत्यंत उपयुक्त उपचार म्हणजे ‘पंचकर्म’. गर्भधारणेसाठी इच्छा असणाऱ्या स्त्री–पुरुषाने शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म अर्थात वमन, विरेचन, बस्ति इ. उपचार अवश्य करावेत. ह्या ठिकाणी विरेचन म्हणजे नुसते जुलाब नव्हेत किंवा बस्ति म्हणजे एनिमा नव्हे तर आयुर्वेदीय निर्माण पद्धतीने तयार केलेले व वनस्पतींनी सिद्ध केलेले तूप प्रकृती व वय शरीरशक्तीचा विचार करून किमान सात दिवस घ्यावे. शरीरशुद्धीसाठी बाह्यस्नेहन म्हणजेच अभ्यंग, मसाज इ. चा उपयोग करावा. केवळ वरवर पंचकर्म म्हणून शिरोधारा, अंगाला तेल लावणे असे वरवरचे दिखाऊ उपचार करू नयेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने वमन, विरेचन, बस्ती, नस्य, इ. उपचार करून घ्यावेत. स्त्रियांनी गर्भाधानापूर्वी शोधन व बृहण उत्तरबस्ति, योगबस्ती क्रम, योनिघावत–धूपन, इ. उपचार तज्ञ आयुर्वेद स्त्रीरोग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावेत. याबाबतीत “वैद्यराज व्हिजन” ही संस्था मोफत समुपदेशन करू शकते. ह्या सर्व गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधि लागतो. त्यापेक्षा कमी वेळात केलेल्या शॉर्टकट उपचारांचा योग्य फायदा होणे शक्य नाही हे सुप्रजेसाठी इच्छुक दांपत्याने समजून घ्यावे.

पंचकर्म उपचारांनी शरीरसुद्धी होते व त्याबरोबरीने स्त्री व पुरुषबीजशुद्धी पण होते. सर्व इंद्रियांची शक्ती वाढते, मन प्रसन्न होते. स्त्री–पुरुषामधील आकर्षण वाढते व पुढे गर्भधारणा होऊन आरोग्यसंपन्न अपत्यप्राप्ती होते. शरीरशुद्धीच्या महत्त्वाच्या टप्प्यानंतर आर्तव व शुक्र वाढण्यासाठी ओजवर्धक औषधी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यात अश्वगंधा, क्रौंचबीज, शतावरी, गोक्षुर, विदारीकंद, बला, कृष्णतीळ, वासा, पिंपळी, पुनर्नवा, गुडूची, आमलकी, सुंठ, श्वेतमुसली, इ. औषधे शुक्र धातूचे सामर्थ्य वाढवितात. ‘तंत्र शुक्र बाहुल्यात् पुमान’ असे वर्णन संहिताकारांनी केले आहे. त्यामुळे निःसंशय सुप्रजानिर्मिती होते. व्यंगविरहित  बालक निर्मिती हा ह्यामागील उद्देश आहे. ह्या औषधांमुळे रसाधातुचे उत्तम पोषण होते. सुप्रजननासाठी सार्वदेहिक शुक्र तसेच बीजभूत शुक्र ह्या दोन घटकांची गरज असते. ह्या औषधांमध्ये मायक्रोन्युट्रियंट्स असल्याचे सिद्ध झाले आहे. अलीकडे अनेक आहार द्रव्यांमध्ये अशी मायक्रोन्युट्रियंट्स असल्याचे दिसते. अनादि  काळापासून वनस्पतींच्या रूपाने आयुर्वेदामध्ये ह्यांचा  वापर करण्यात येतो.

१) क्रौंचबीजामुळे शरीरातील टेस्टोस्टेरॅान वाढते. त्यामुळे लिबिडो म्हणजे कामशक्ती वाढते.
२) वासा व गुडुची – ह्या द्रव्यांमुळे शुक्रदुष्टी दुर होते व त्याप्रमाणे शुक्रामध्ये कुठल्याही प्रकारची विकृती रहात होत नाही.
३) शतावरी, अश्वगंधा, कृष्ण्तीळ ह्या द्रव्यांमुळे शुक्राणूंची संख्या वाढते व शुक्रबीज निर्मिती होते. ही सर्व औषध योजना करण्यामागे संहिताकारांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. माझ्या खाजगी प्रॅक्टिसमध्ये मी ह्याचा वापर अनेक दांपत्यांवर केला असून त्याचे उत्तम परिणाम झालेले अनुभवास येतात. ह्यासाठी “शुक्रजीवक व अश्वमाह” ही औषधे मी वापरतो. दूध व तुपाबरोबर घेतल्याने ह्या औषधांमुळे उत्तम शुक्रवर्धन होते असा माझा अनुभव आहे.
४) विदारीकंद या द्रव्यात मॅग्नेशियम व ‘अ’ जीवनसत्व असून शुक्रपोषणासाठी ह्याची मदत होते. आमलकीमध्ये जीवनसत्व ‘सी’, जीवनसत्व ‘के’, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. त्यामुळे पेशींमध्ये कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण होत नाही. आमलकीमध्ये आठ ते दहा मिलिग्रॅम  जीवनसत्व ‘सी’ असून हे पेशींचा विनाश होऊ देत नाही.
५) अंनतमूळ आणि गोक्षुर हे स्त्री-पुरुषांमध्ये एकमेकांविषयी प्रेमभावना उत्पन्न करतात. ह्यामध्ये शुक्रबीज निर्मितीची शक्ती आहे.
६) पिप्पली व पुनर्नवा हे अॅन्टिफंगल व शोथनाशक आहे.

पुढे औषधाइतकीच आहार योजना देखील  महत्वाची आहे. त्यापूर्वी स्त्रियांना सुप्रजननासाठी देण्यात येणाऱ्या औषध योजनेबाबत थोडक्यात विचार करूया. स्त्रियांसाठी पुत्रजीवक, शिवलिंगी, शरपुंखा ही औषधे सुप्रजननासाठी परिणामकारक ठरलेली आहेत. यात शतावरी कल्पाचा वापरही महत्वाचा आहे. सुप्रजनन तर दूरच पण काही मातांना वारंवार गर्भस्त्राव व गर्भपात होतात. अनेक स्त्रियांचे प्रसव अकाली होऊन बालक मृत्यू पावते. काही स्त्रियांमध्ये तर सातत्याने पाच पेक्षा जास्त वेळा अकाली प्रसूती होऊन गर्भ मृत झाल्याचे दिसते. अशा स्त्रिया मातृत्व सुखापासून वंचित राहतात. आयुर्वेदात अशा स्त्रियांसाठी ‘क्षेत्रचिकित्सा’ वर्णन केली आहे. या चिकित्सेमुळे गर्भपात टाळता येतो. अकाली प्रसव व अलीकडे अनेक स्त्रियांमध्ये होणारे टॉर्च इन्फेक्शन ह्यावर चिकित्सा करता येते. आधुनिक विज्ञानामध्ये सुद्धा अकाल प्रसव, गर्भस्त्राव, गर्भपात ह्यावर निश्चित अशी चिकित्सा नसल्याचे मत अनेक स्त्रीरोगतज्ञ वेगवगळ्या परिसंवादापासून व्यक्त करीत असल्याचे माझ्या माहितीत आहे.

सुप्रजननासाठी  आयुर्वेदात उपलब्ध औषधे

यष्टिमधु, क्षीरकाकोली, तीळ, पिंपळी, शतावरी, गुडूची, कष्ठकारी, बृहति, गोक्षुर, भृंगराज, विदारीकंद, शृंगाटक, रिंगणी, डोरली, सारिवा, अंनता, उशीर, मंजिष्ठा, आमलकी, शतावरी, बला, पिठवण, चिकणा, शेवगा, बिल्व, कवठ, शिंगाडा, कमलतंतु, द्राक्ष, नागरमोथा ही सर्व औषधे सुप्रजननासाठी उपयुक्त असून ह्यांत सूक्ष्मपोषक तत्वे आहेत. आधुनिक शास्त्रानुसार मॅक्रो व मायक्रोन्युट्रियंट्स ह्यामध्ये समाविष्ट असून ते गर्भशयातील बाळाची वाढ उत्तम प्रकारे करतात. या औषधांमध्ये ग्लूटॅमिक अॅसिड, मेथीअॅनिन आणि आर्जिनीन यांसारखी दहापेक्षा जास्त अमाईनो अॅसिड असल्याचे डॉ. के. एस. अय्यर, परेल, मुंबई यांनी सिद्ध केले आहे.

यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ह्यांसारखी घटकद्रव्ये उपलब्ध आहेत. मुंबई येथील प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉ. एच. एस. पालेप ह्यांनी मार्च १९९९ मध्ये या संदर्भातील आपला शोधनिबंध मुंबई स्त्रीरोगतज्ञ प्रसूतिशास्त्र परिषदेपुढे सादर केला. वरील औषधांचा उपयोग गर्भिणीपांडू, रक्तक्षय ह्या विकारांमध्येसुद्धा होतो. मुंबई येथील पोदार रुग्णालयात ह्या औषधांचा उपयोग ‘मासानुमास-काढे’ या स्वरूपामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून होत आहे.

स्त्रियांसाठी आहार

सुप्रजनानासाठी स्त्रियांनी रोजच्या आहाराशिवाय कॅल्शियम व मॅग्नेशियमयुक्त बनणारे पदार्थ, मेथी, शेवग्याच्या शेंगा, बीट, अंजिर, द्राक्ष, कलिंगड, बाजरी, तीळ, उडीद, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, ज्वारी, इ.

पुरुषांसाठी आहार

ताजी फळे, दुध, लसूण, मुळा, बटाटे, तुप, उडीदडाळ, साखर, फरसबी, बीट, गाजर, इ.

हा वेगवेगळा आहार स्त्री-पुरुषांनी का घ्यावा?

वरील आहारामध्ये शुक्र व आर्तव यांना कार्यक्षम  करण्याची क्षमता असते. अपत्यपयाध्ये शुक्रनिवडीची क्षमता असते. अपत्यपय, गर्भाशयमुख, गर्भाशय यांच्यामध्ये शुक्रनिवड व भृणरूजूकरण अवलंबून असते. वरील प्रकारचा आहार सुप्रजननासाठी आवश्यक ठरतो. शरीरशुद्धी, औषधीद्रव्ये आणि आहार यांचा विचार केल्यानंतर आता आपण वातावरणाचा गर्भावर काही परिणाम होतो काय ह्या विषयावर उहापोह करू या.

आपला आहार-विहार जीवनपद्धती या बाबी कशा असाव्यात हे आपण ठरूवू शकतो. ह्यात काही चुकीचे सेवन केले गेले तर त्याचा विपरीत परिणाम गर्भावर होऊ शकतो. ओझोन व कार्बन मोनोक्साईड या वायूचे हवेमधील प्रमाण ज्या भागांमध्ये जास्त आहे, त्या भागातील गरोदर बायकांची मुले सदोष हृदय घेऊन जन्माला येण्याची शक्यता असते. हृदयाबरोबरच फुफ्फुसावरसुद्धा प्रदूषणाचा वाईट परिणाम होतो. गरोदरपणाच्या दुसऱ्या महिन्यामध्ये हृदयामध्ये व फुफ्फुसामध्ये दोष निर्माण झालेले असतात. ही महत्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारचा  अभ्यास कॅलिफोर्नियातील शास्त्रज्ञांनी केला आहे. ह्यासाठी योग्य पद्धतीने व तज्ञ मार्गदर्शनाखाली प्राणायाम करणे हितकर ठरू शकते.

 

डॉ. सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग
पोदार मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल
वरळी, मुंबई – ४०० ०१८
भ्रमणध्वनी +917738086299
Email – subhashmarlewar@gmail.com

स्त्रोत :मराठीसृष्टी

 

अंतिम सुधारित : 1/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate