प्रसवोत्तर परिचर्येचा मुख्य उद्देश बाळंतिणीस तिची गर्भावस्थेपूर्वीची प्रकृती पुन्हा प्राप्त होण्यास मदत करण्याचा असतो. निरोगी गर्भारपण व सुखप्रसूती यानंतरचा प्रसवोत्तर काळ सर्वसाधारणपणे व्यत्ययाशिवाय पार पडतो. काही स्त्रिया या काळात मनोविकारवश बनतात. जननक्रिया पूर्ण झाल्यानंतरची ती मानसिक प्रतिक्रिया असू शकते. स्थिर व्यक्तिमत्त्वाची स्त्री पूर्वावस्थेत जेवढी सहज येऊ शकते तेवढी अस्थिर व्यक्तिमत्त्वाची भावनाविवश स्त्री येत नाही. कारण तिच्या आयुष्यातील पहिले बाळंतपण ही एक महत्त्वाची घटना असते. प्रत्येक बाळंतिणीस या काळात विश्वासात घेऊन समजूतदारपणाने व ममतेने वागविण्याची गरज असते.
जननेंद्रियांच्या परागामी बदलांना ‘निवर्तन’ किंवा ‘प्रत्यावर्तन’ म्हणतात. गर्भाशयातील या बदलांना ‘गर्भाशय निवर्तन’ म्हणतात. या बदलांचा हेतू अवयवांची अवस्था गर्भारपणापूर्वीप्रमाणे करण्याचा असतो. प्रसूतीनंतर ताबडतोब गर्भाशयाचे आकारमान १५ सेंमी. लांब, १२ सेंमी. रुंद, ४·५ सेंमी. जाड वरच्या भागात व १ सेंमी. जाड खालच्या भागात असतो व त्याचे वजन १,००० ग्रॅ. असते. गर्भाशय निर्वतन पहिल्या आठवड्यात जलद होते व त्याचे वजन आठवड्याच्या शेवटी ५०० ग्रॅ. भरते. त्यानंतर आकारमान व वजन हळूहळू कमी होत जाऊन सहाव्या आठवड्याच्या शेवटास वजन ६० ग्रॅ. भरते. प्रसूतीनंतर लगेच गर्भाशयाची ग्रीवा (मानेसारखा भाग) मऊ,ठेचाळलेल्यासारखी व सुजलेली असते. केवळ दोनच दिवसांत ती पूर्ववत होते. पहिल्या दहा दिवसांपर्यंत ग्रीवानालात दोन बोटे शिरू शकतात; परंतु दुसऱ्या आठवड्यात शेवटी एकच बोट शिरू शकते. योनिमार्ग पूर्ववत होण्यास तीन आठवडे आणि श्रोणिस्नायूंचा (धडाच्या तळाशी हाडांनी अवेष्टित असलेल्या खोलगट भागातील स्नायूंचा) तान (प्राकृतिक जोम व ताण) पूर्ववत होण्यास सहा आठवडे लागतात.
प्रसवोत्तर काळात योनिमार्गातून येणाऱ्या, रक्त व गर्भशय्या भागाच्या मृत ऊतकमिश्रित (पेशीसमूहमिश्रित) स्रावाला ‘सूतिस्राव’म्हणतात. पहिले तीन-चार दिवस हा स्राव रक्त व क्लथित (साखळलेल्या) रक्ताच्या गोळ्यांचा बनलेला असून लाल रंगाचा असतो. याला ‘लाल सूतिस्राव’ म्हणतात. दुसऱ्या आठवड्यात या स्रावाचा रंग करडा ते पिवळा होतो व त्यात प्रामुख्याने द्रवीभवन झालेले रक्त आणि श्वेतकोशिका (पांढऱ्या पेशी) असतात. याला ‘पीत सूतिस्राव’ म्हणतात. तिसऱ्या आठवड्यात स्राव पांढरा व गढूळ बनतो आणि त्यात श्वेतकोशिका व श्लेष्मा (बुळबुळीत पदार्थ) असतो. याला ‘श्वेत सूतिस्राव’ म्हणतात. सूतिस्राव क्षारधर्मी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण तयार होण्याचा गुणधर्म असलेला) असून त्याला विशिष्ट गंध असतो. प्रसूतीनंतर पहिले दोन-तीन दिवस गर्भाशयाची पोकळी निर्जंतुक असते; परंतु त्यानंतर योनिमार्गातील सूक्ष्मजंतू वर प्रवेश करतात व ते सूतिस्रावाच्या सूक्ष्मदर्शकीय तपासणीत दिसतात.
प्रसवोत्तर काळात पहिले दोन-तीन दिवस स्तनाग्रातून घट्ट पिवळसर स्राव येतो. त्याला ‘प्रथमस्तन्य’ म्हणतात. त्यानंतर दुग्धस्रवणास सुरुवात होते. या सुमारास स्तन भरून येतात, टणक बनतात व ताणलेल्या त्वचेखाली निळ्या नीला स्पष्ट दिसतात. हे रक्ताधिक्य बहुप्रसवेपेक्षा प्रथमप्रसवेत अधिक असते. बहुप्रसवेचे दुग्धस्रवण प्रथमप्रसवेपेक्षा लवकर सुरू होते. [⟶ दुग्धस्रवण व स्तनपान ].
प्रसवोत्तर परिचर्येचे तीन उद्देश असतात
(१) बाळंतिणीस तिची पूर्वीची निरोगी प्रकृती मिळवून देणे,
(२) सूक्ष्मजंतू-संक्रमणास विरोध करून प्रसूति-पूतिज्वरासारख्या विकारांना प्रतिबंध करणे आणि
(३) स्तनपानास योग्य परिस्थिती निर्माण करून अर्भक संगोपनाविषयी सूचना देणे. वरील उद्दिष्टांशिवाय आधुनिक काळात राष्ट्रीय गरज बनलेल्या कुटुंबनियोजना विषयी माहिती देणे याच वेळी हितावह ठरेल. संततिनियमनाच्या साधनांच्या माहितीशिवाय दोन मुलांमधील अंतर कमीतकमी तीन वषे असावे, हेही पटवून द्यावयास हवे.
1) विश्रांती - पहिला दिवस बाळंतिणीने अंथरूणात पडून पूर्ण विश्रांती घ्यावी. दुसऱ्या दिवसापासून दैनंदिन विधी करावयास हरकत नसावी. बाळंतीण जेवढी लवकर चलनक्षम होईल तेवढा नीला अंतर्कीलनाचा (रक्ताची गुठळी किंवा इतर काही बाह्य पदार्थ नीलेमध्ये अडकून तेथील रक्तप्रवाह बंद पडण्याचा) धोका कमी होतो. सूतिकागृहातून सुखप्रसूती झालेल्या स्त्रियांना २–५ दिवसांत घरी पाठवतात. बाळंतिणीला रात्रीची झोप उत्तम हवी. जरूर तेव्हा एखादे शामक औषध द्यावे. दुपारच्या जेवणानंतर दोन तास पूर्ण विश्रांती घ्यावी.
२)आहार - पहिल्या दिवशी आहारात हलके अन्न असावे. दुसऱ्या दिवसापासून पूर्ण भोजन करावे. त्यात जरूर ती जीवनसत्त्वे,खनिजे वगैरे पदार्थ तर असावेतच, पण शिवाय दुग्धस्रवणाकरिता ७०० कॅलरी अधिक ऊर्जा मिळेल असा आहार असावा. [⟶ पोषण].
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/23/2020
गर्भाशयात अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात.
अंड्यांचे निषेचन (फलन) ज्यांच्या शरीराच्या आत होते...
या आजाराचे नेमके कारण माहीत नाही. यामध्ये आतून तपा...
गर्भाशय बाहेर पडणे म्हणजेच अंग बाहेर पडणे. ही तक्र...