पुरुष व स्त्री यांच्या स्तन ग्रंथी यौवनावस्थेपूर्वी अगदी सारख्या असतात. स्त्रीच्या स्तनांच्या आकारात यौवनारंभापासून बदल होत जातो व त्यांचा घाटही बदलतो. स्तनवाढ, बगल व जघनस्थानावर होणारी केसांची वाढ यांचा समावेश दुय्यम लैंगिक लक्षणांत होतो. लैंगिक प्रौढावस्थेच्या सुमारास स्त्रीच्या स्तनांत होणारी वाढ ही त्या ठिकाणी वसेचा (स्निग्ध पदार्थाचा) साठा व संयाजी (जोडण्याचे कार्य करणाऱ्या) ऊतकाची (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाची) वाढ मिळून होते. वसा व संयोजी ऊतकामध्येच दुग्धवाहक नलिका व दूध स्रवणाऱ्या कोशिकांचे (पेशींचे) बनलले दुग्धकोश विखुरलेले असतात. स्त्रीच्या अंडकोशापासून स्रवणारी स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन) व गर्भरक्षक (प्रोजेस्टेरोन) ही हॉर्मोने (रक्तात मिसळणारे उत्तेजक स्राव) स्तनवाढीकरता आवश्यक असतात. पोष ग्रंथीची (मेंदूच्या तळाशी असलेल्या हाडांनी बनलेल्या पोकळीतील ग्रंथीची) विकृती असल्यास किंवा यौवनावस्थेपूर्वीच अंडाशय काढून टाकल्यास स्त्रियांमध्ये स्तनवाढ जवळजवळ होतच नाही. ऋतुचक्रानुसार स्त्रीच्या स्तनांमध्ये सूक्ष्मदर्शकीय मासिक लयबद्ध बदल होत असतात. अनेक स्त्रियांना ऋतुस्राव सुरू होण्यापूर्वी स्तनांचा जडपणा, भरीवपणा व स्पर्शासह्यत्व जाणवते. असेच बदल गर्भारपणीही होतात व ते ऋतुचक्रातील बदलांपेक्षा अधिक असतात. स्तनांचा आकार वाढून प्रत्येक स्तनाचे वजन जवळजवळ अर्ध्या किलोग्रॅमने वाढते. मात्र ही वजनवाढ स्तनातील दुग्धस्रावक भागांच्या वाढीमुळे होते. गर्भारपणातील ही स्तनवाढ पोष ग्रंथीच्या दुग्धस्रावक हॉर्मोनामुळे (प्रोलॅक्टिनामुळे) नियंत्रित केली जाते. याशिवाय अंडाशयाची स्त्रीमदजन व गर्भरक्षक हॉर्मोने वारेतून स्रवणारी हीच हॉर्मोने स्तनवाढीस मदत करतात. स्त्रीमदजनामुळे दुग्धवाहक नलिकांची वाढ होते, तर स्त्रीमदजन व गर्भरक्षक दोन्ही मिळून दुग्धकोशांच्या वाढीस कारणीभूत असतात. याशिवाय दुग्धस्रावक हॉर्मोनाप्रमाणेच कार्यशील असणारा आणखी एक स्राव वार तयार करीत असते. गर्भारपणाच्या पहिल्या दोन महिन्यांत होणारी स्तनवाढ बहुतांशी रक्तवाहिन्यांच्या आकारवाढीमुळे होते. तिसऱ्या महिन्यानंतर मात्र सर्वच ऊतकांची वाढ होऊ लागते. स्तनवाढीच्या प्रमाणावर दुग्धोत्पादन अवलंबून असते. सर्वसाधारपणे प्रत्येक स्तनाची २०० घ.सेंमी. वाढ मूल वाढविण्यास पुरेशी असते.
दुग्धस्त्रावक हॉर्मोनामुळे दुग्धोत्पादन होते. उंदरांवरील काही प्रयोगान्ती असे आढळून आले आहे की, अवटू ग्रंथिस्त्राव [अवटुग्रंथि], अधिवृक्क ग्रंथिस्त्राव [अधिवृक्क ग्रंथि], इन्शुलीन व वृद्धी हॉर्मोन्स (सोमॅटोट्रोफोन) स्तनवाढीस व दुग्धोत्पादनास मदत करतात. स्त्रीमदजन व गर्भरक्षक हॉर्मोनांचा दुहेरी पुरवठा (अंडाशय व वार या दोहोंपासून होणारा) फार महत्त्वाचा असावा कारण गर्भारपणाच्या पहिल्या व दुसऱ्या महिन्यांच्या दरम्यान अंडाशये काढून टाकली, तरी गर्भपातही होत नाही किंवा स्तनवाढही थांबत नाही. गर्भारपणी एका स्त्रीची पोष ग्रंथी काढून टाकल्यानंतरही स्तनवाढ होत राहिली असे दिसून आले. एवढेच नव्हे तर प्रसूतीनंतरही दुग्धस्रवणात बदल झाला नाही.
जन्मानंतर मुलीच्या व मुलाच्याही स्तनातून थोडासा दुधासारखा स्राव येतो. हा स्राव मातेच्या रक्तातील हॉर्मोन्स वारेद्वारे अर्भकाच्या शरीरात पोहाचलेली असल्यामुळे होतो. दुग्धस्रवणाचा दोन विभागांत विचार करता येतो : (१) दुग्धस्त्रवण प्रारंभ आणि (२) दुग्धस्त्रवण चालू ठेवणे.
गर्भारपणात स्त्रीमदजन व गर्भरक्षक रक्तप्रवाहातून पोष ग्रंथीपर्यंत पाहोचून तिच्या दुग्धस्त्रावक हॉर्मोनाच्या उत्पादनास प्रतिबंध करीत असावीत. प्रसूतीनंतर वार बाहेर पडल्यानंतर तिची हॉर्मोने रक्तप्रवाहातून वाहणे बंद होते. याशिवाय अंडाशयांच्या या दोन्ही हॉर्मोनांच्या उत्पादनावरील नियंत्रण सैल पडून त्याचे उत्पादन वाढते. त्यामुळे स्तनातील दुग्धस्रावक ऊतकावर परिणाम होऊन दुग्धस्रवणात वाढ होते. याच वेळी अधिवृक्क ग्रंथीच्या रक्तप्रवाहातील हॉर्मोनामध्ये वाढ होत व ती दुग्धस्रवण प्रारंभ यंत्रणेस मदत करीत असावी.
पोष ग्रंथीच्या दुग्धस्रावक व इतर हॉर्मोनांचे स्रवण मेंदूतील अधोथॅलॅमस [तंत्रिका तंत्र] हा भाग नियंत्रित करतो. दुग्धस्त्रावक हॉर्मोनाचे उत्पादन रोखून धरण्याचे कार्य अधोथॅलॅमस करतो. या उलट इतर पोष ग्रंथी हॉर्मोनांच्या स्रवणाच्या चेतनेस तोच कारणीभूत असतो. अधोथॅलॅमसाच्या कार्यावर परिणाम करणारी औषधे दुग्धस्रावक हॉर्मोनाचे स्रवण कमी करतात आणि म्हणून दुग्धस्रवणी कमी होते. याउलट शांतक (मन शांत ठेवणारी) औषधे स्तनवाढीस व दुग्धोत्पादन वाढीस मदत करतात. ही औषधे बहुधा दुग्धस्रावक हॉर्मोनांचे उत्पादन वाढवीत असावीत. मिथ्या गर्भारपणात (प्रत्यक्ष गर्भाशयात गर्भ नसताना गर्भधारणा झाली असल्याचे खोटी समजूत होणे) स्तनवाढ, दुग्धस्रवण, पोटाचा आकार वाढणे यांसारखी खऱ्या गर्भारपणाची लक्षणे आढळतात. या प्रकारच्या मानसिक विकृतीवरून मनाचा व हॉर्मोन स्रवणाचा किती घनिष्ठ संबंध आहे, हे स्पष्ट होते. अती चिंता किंवा फाजील आस्था दर्शविणारे नातेवाईक दुग्धोत्पादनावर दुष्परिणाम करतात. प्रसूतीनंतर ताबडतोब दूध बाहेर पडण्यास सुरुवात होते. पहिले दोन किंवा तीन दिवस त्याचे उत्पादन अत्यल्प असते. या पहिल्या दिवसातील दुधाला ‘प्रथमस्तन्य’ म्हणतात. ते बरेचसे घट्ट आणि पिवळ्या रंगाचे असते. त्यानंतर येणाऱ्या दुधापेक्षा प्रथमस्तन्य दुधात प्रथिने जास्त (प्रत्येक १०० मिलि. मध्ये २·०६–१·०२ ग्रॅम) असतात, वसा कमी (२·०६–४ ग्रॅम) असते व लॅक्टोजही कमी (४·६–६·८) असते. ते जादा क्षारधर्मी (अल्कलाइन) असून त्यात लवणेही जादा (०·३५–०·२० ग्रॅम) असतात. नवजात अर्भकाच्या पोषणास ते उपयुक्त असतेच कारण त्यातील प्रथिने जशीच्या तशीच आंत्रमार्गातून (आतड्यांतून) अवशोषिली जातात. परंतु याशिवाय विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये प्रतिरक्षा पिंडे (रोगसंक्रामणापासून संरक्षण करणारे विशिष्ट पदार्थ) असतात. सर्वसाधारणपणे तिसऱ्या ते सहाव्या दिवसापासून नेहमीचे दूध येऊ लागते. त्याचे उत्पादन नवव्या महिन्यापर्यंत वाढत जाऊन १२ ते १८ महिन्यांनी थांबते. क्वचित वेळा दुग्धस्त्रवण ३६ महिन्यांपर्यंतही चालू असते. सर्वसाधारणपणे दर दिवशी १–१·५ लि. दूध तयार होते. भारतीय स्त्रियांमध्ये (सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गामध्येही) दररोज सर्वसाधारणपणे ४००–७०० मिलि. दूध वर्षभर तयार होते. जागतिक आरोग्य संघटनेने अर्भकास दररोज ८५० मिलि. दूध पुरेसे आहे असे सुचविले आहे. स्तनपान करणाऱ्या नवजात अर्भकास दररोजन पहिले दोन आठवडे१/२ लि. दूध पुरेसे असते. तीन ते सहा महिन्यापर्यंत ३/४ लि. पुरते. मातेला काहीही त्रास न होता २·५ ते ३ लि. दूध उत्पादन झाल्याचीही उदाहरणे आहेत.
दुग्धस्रवण चालू ठेवण्याच्या क्रियेस अर्भकाचे स्तनचूषण दोन प्रकारे मदत करते. त्यामुळे पोष ग्रंथीच्या दुग्धस्रावक हॉर्मोनाच्या उत्पादनास चेतना मिळते. त्याशिवाय पोष ग्रंथीच्याच ऑक्सिटोसीन नावाच्या हॉर्मोनाच्या उत्पादनासही चेतना मिळते. या हॉर्मोनामुळे दुग्धस्रवणात वाढ होत नाही; परंतु दुग्धकोश व दुग्धवाहिन्या यांच्या भोवतालच्या स्नायुकोशिकांचे आकुंचन या हॉर्मोनामुळे होते व तयार असलेले दूध बाहेर पडण्यास सुरुवात होते. अर्भकाने स्तनचूषणास सुरुवात केल्यापासून केवळ तीसच सेकंदास ही क्रिया सुरू हाते. ही एक प्रतिक्षेपी क्रिया [तंत्रिका तंत्र] असून तिला ‘दुग्धोत्क्षेपण’ म्हणतात. यामुळेच पुष्कळ वेळा मुलाच्या तोडात नसलेल्या बोंडीतूनही दुधाचे थेंब ठिपकू लागतात. स्तनांच्या तंत्रिका तंत्राचा दुग्धस्रवणाशी फारसा संबंध नसावा. याबाबतीत पुढील उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. ढुंगणाची बाजू एकमेकांस जन्मजात जुळलेल्या दोन मुलींपैकी एक गर्भार राहिली व पुढे प्रसूतही झाली. या जुळ्या मुलींना स्वतंत्र जनन व तंत्रिका तंत्रे होती. त्यांचे रक्त मात्र एकमेकींत मिसळत असे. जिला मूल झाले नव्हते तिची स्तने तर वाढलीच पण शिवाय दुसरीच्या प्रसूतीनंतर दुग्धस्रवणही सुरू झाले. वर सांगितलेल्या औषधाशिवाय दारू पिणाऱ्या स्त्रियांच्या दुग्धोत्क्षेपण क्रियेवर अनिष्ट परिणाम होतो. स्त्रीचा दुग्धस्रवण काल चालू असताना संभोगाच्या वेळी तिच्या स्तनातून दूध आपोआप बाहेर पडू लागते, कारण संभोगामुळे पोष ऑक्सिटोसीन स्रवण वाढते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/29/2020
जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासात आईचे दूध मिळणे हे ...
स्तनपान हे पोषणाचा एक स्रोत म्हणण्यापेक्षा कितीतरी...
या विभागात लहान मुलांना आईच्या दुधाचे काय फायदे आह...
स्तनपानाविषयीच्या माहितीचा प्रसार करणे व तिचा अवलं...