नेहमी पाळी नियमित असेल व आता मासिक पाळी चुकून दोन आठवडयांपेक्षा जास्त दिवस गेले असतील तर गर्भ धारणेची शक्यता धरावी. पाळी चुकून वर एक-दोन महिने गेले असतील व गर्भधारणेची इतर लक्षणे असतील तर खात्रीने सांगता येते. मात्र काही स्त्रियांची पाळी अनियमित असते, दोन-दोन महिने येत नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत खात्री देता येत नाही. त्यासाठी इतर तपासणीची मदत लागेल.
ब-याच स्त्रियांना गर्भधारणेनंतर पहिल्या तीन-चार महिन्यांत सकाळी उठल्यानंतर मळमळ, क्वचित उलटी होते. शरीरातले 'स्त्रीरस' (स्त्रीसंप्रेरक-इस्ट्रोजेन) वाढल्याने असे होते. काही स्त्रियांना असा अनुभव येतच नाही, तर काहींना याचा फार त्रास होतो.
गर्भावस्थेत स्तनांचा आकार वाढतो व ते जडावतात. बोंडाची त्वचा हळवी व काळसर होते. स्तनांमधील हा फरक पहिल्या गर्भधारणेच्या वेळी जास्त उठून दिसतो. एकदा काळसर झालेले बोंड प्रसूतीनंतरही तसेच राहते.
लघवी तपासणी
पाळी चुकल्यानंतर 10 दिवसांतच लघवी तपासून गर्भनिदान करता येते. गर्भाच्या वाढीबरोबर काही विशिष्ट संप्रेरके तयार होतात व ते लघवीत उतरतात. गर्भपात करायचा नसेल तर याही तपासणीची आवश्यकता नाही.
आतून तपासणी
तीन महिन्यांच्या आधी गर्भाशय खूप आत असते. म्हणून अशा वेळी आतून (म्हणजे योनिमार्गातून) तपासणी करावी लागते. गर्भपात करून घ्यायचा असेल तर लवकरात लवकर गर्भनिदान होणे आवश्यक असते व त्यासाठी ही तपासणी करताना'आतली' दोन बोटे आणि पोटावरचा हात यांमध्ये गर्भाशय पकडून त्याचा आकार व तोंडाचा मऊपणा हे तपासले जाते. गर्भ नसलेले गर्भाशय निबर लागते व त्याचा आकार मोठया लिंबाइतका असतो. गर्भधारणेनंतर आकार वाढत जातो व गर्भाशयाचे तोंड मऊ होते. मात्र या तपासणीसाठी थोडाफार अनुभव पाहिजे.
पाळी चुकून साधारण 3 महिन्यांनंतर गर्भाशय पोटावरून हात लावून कळू शकते. आठवडे,महिने जातील तसा त्याचा आकार वाढत जातो. तपासणीसाठी आल्यावर स्त्रीला आधी लघवी करून यायला सांगावे. लघवी केल्याने लघवीची पिशवी ( मूत्राशय) रिकामी होते,तेव्हा गर्भाशयाचा आकार नीट कळतो. नाही तर गर्भाशयाच्या आकाराबद्दल गैरसमज होणे शक्य असते, गोलसर, घट्ट, वाढलेल्या आकाराचे गर्भाशय हाताला लागल्यावर गर्भधारणेची खात्री धरायला हरकत नाही. मात्र या तपासणीसाठी चार महिने तरी पूर्ण व्हावे लागतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 9/1/2020
सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तींचा रक्तदाब १३०/८० असतो...
अर्भकांत आणि लहान मुलांमध्ये आहारात प्रथिने कमी वा...
कंपवात : उतार वयात होणाऱ्या व हळूहळू वाढत जाणाऱ्या...
अनियंत्रित पेशी-विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग. या र...