या पध्दतीचा उपयोग केवळ पाळणा लांबवण्यासाठी नाही तर गर्भधारणेसाठी योग्य वेळ निवडण्यासाठीही केला पाहिजे. या पध्दती दोन प्रकारच्या आहेत-नैसर्गिक आणि कृत्रिम.
शरीरसंबंध न ठेवणे (ब्रह्मचर्य)
शरीरसंबंधात लवकर अलग होणे.
स्तनपानाचे पहिले वर्ष
फलनाचे दिवस टाळून शरीरसंबंध सुरक्षाकाळ
ही पध्दत बरीच प्रचलित आहे. मात्र यासाठी दोघांनाही मानसिक संयम असला पाहिजे. आधुनिक काळात ही पध्दत फार प्रचलित नाही. सुलभ साधने असताना मानसिक निग्रह पाळण्याची गरज राहिलेली नाही. धार्मिक व्यवस्थेत मात्र ब्रह्मचर्य टिकूनआहे.
स्त्रीपुरुषसंबंधात वीर्य सोडण्याच्या आधी स्त्रीपुरुषांनी अलग होणे एक चांगली पध्दत आहे. पण या पध्दतीला बराच संयम आणि समंजसपणा लागेल. लैंगिक समाधानाच्या दृष्टीने ही पध्दत थोडी कमी समाधान देणारी आहे. पुरुषाचे वीर्य निदान बाहेर सांडून तरी त्याच्या दृष्टीने क्रिया पूर्ण होते. पण स्त्रीला मात्र या पध्दतीने लैंगिक क्रिया पूर्ण होण्याचा आनंद मिळेलच असे नाही. बोटांचा वापर योनिमार्गात करून (हस्तमैथून) ही उणीव भरून काढता येते. या पध्दतीत आणखी एक अडचण अशी की प्रत्यक्ष वीर्यपतनाच्या आधी पुरुष-इंद्रियातून पाझरणारे स्राव पूर्ण निर्बीज नसतात, त्यात थोडया का होईना शुक्रपेशी असण्याची शक्यता असते. एकूण या पध्दतीत बरीच तयारी लागते आणि शंभर टक्के यशाची खात्री देता येत नाही. इतर कोणतेही साधन जवळ नसल्यास हा मार्ग उपयोगी आहे.
स्तनपानामुळे स्त्रीबीजनिर्मिती काही महिने टळते. जोपर्यंत स्तनपान चालू आहे तोपर्यंत मेंदू-स्त्रीबीजग्रंथी यामध्ये विशिष्ट चक्र चालू असते. यामुळे स्त्रीबीजे पक्व होणे, सुटणे, आदी क्रिया थांबतात. मासिक पाळीही या काळात येत नाही. अर्थात या पध्दतीची खात्री अगदी शंभर टक्के देता येत नाही. काही स्त्रियांना या काळात गर्भ राहतो आणि ते लवकर कळतही नाही. पण बहुतेक स्त्रियांना वर्षभर तरी याचा संततिप्रतिबंधक म्हणून फायदा होतो. स्त्रीबीजनिर्मितीची प्रक्रिया आणि जननसंस्थेतल्या बदलांची माहिती स्त्रियांना असली पाहिजे. विशेषतः गर्भाशयमुखामधून पाझरणारा स्राव/चिकटा पारदर्शक, तार धरणारा झाला की स्त्रीबीज येते आहे हे कळू शकते. याची माहिती पुढे येईलच.
पाळीचा पहिला दिवस धरला तर सुमारे 14व्या दिवशी स्त्रीबीज सुटते. स्त्रीबीज बाहेर पडण्याच्या आगेमागे तीन-चार दिवस स्त्रीपुरुष संबंध टाळला तर गर्भधारणा होऊ शकत नाही. कारण गर्भधारणेचा काळ तेवढाच असतो. म्हणून पाळी संपल्यानंतरचे दहा दिवस व पुढची पाळी यायच्या आधीचे दहा दिवस गर्भधारणेचे नसतात. मधले आठ ते दहा दिवस मात्र गर्भधारणा होऊ शकते. म्हणून हे मधले दिवस कुटुंबनियोजनाच्या दृष्टीने लैंगिक संबंध टाळण्याचे आहेत. या पध्दतीस कोणतेही साधन लागत नाही. तिथी, तारीख नीट लक्षात ठेवली तर अडचण येत नाही. मात्र अंदाज चुकण्याची शक्यता नेहमीच असते. शिवाय सर्वच स्त्रियांचे मासिक चक्र नियमित नसते. ही पध्दत वापरण्यासाठी संयम लागतो.
स्त्रीला स्वतःच्या शरीरात स्त्रीबीजे निर्माण होणे, फलन होणे, गर्भधारणा होणे, इत्यादी जननघटनांची जाणीव करून घेणे शक्य आहे. पाळीनंतर सुमारे 12 दिवसांनी स्त्रीबीज निर्मिती होते. मुख्यतः संप्रेरकांच्या बदलामुळे हे घडते. याच स्त्रीसंप्रेरकांमुळे गर्भाशयात,गर्भाशयमुखाच्या स्रावात विशेष बदल होतात. पुरुषांच्या शुक्रपेशी योनिमार्गातून लवकर गर्भाशयात शिराव्यात व या शुक्रपेशी गर्भाशयात जास्त दिवस जिवंत राहाव्यात यासाठी एक विशेष बदल घडतो. हा बदल म्हणजे गर्भाशयमुखाचा पाझर पातळ,पारदर्शक आणि तार धरणारा होतो. हा बदल स्त्रीबीजनिर्मितीच्या दोन दिवस आधी होतो. याआधी स्राव कमी असतो किंवा असला तर अगदी कोरडा असतो.
यासाठी आपल्या बोटाने गर्भाशयमुखावर पाझरलेला शेंब-चिकटा तपासावा. दोन बोटे लावून त्याची तार लांबते की तुटते ते पाहावे.
पातळ पारदर्शक शेंब आणि लांबणारी
, न तुटणारी तार ही बीजनिर्मितीच्या वेळी असते.मासिक स्राव संपल्यानंतर 2/3 दिवस पाझर नसतो. त्यानंतर काही दिवस कोरडा घट्ट चिकटा येतो, तो पांढरट असतो व त्याची तार लांबत नाही.
जर फलन झाले तर एक-दोन दिवसातच हा शेंब-चिकटा घट्ट व कोरडा होतो. मग बाहेरचे पदार्थ गर्भाशयात सहजपणे जाऊ शकत नाहीत.
स्त्रीबीज गर्भाशयात चोवीस तास जिवंत राहू शकते, आणि शुक्रपेशी परिस्थिती अनूकूल असेल तर 4-5 दिवस जिवंत राहतात. म्हणजे चार-पाच दिवस आधी गर्भाशयात आलेली शुक्रपेशी स्त्रीबीजाचे फलन करू शकते. याचा अर्थ असा की, गर्भधारणेच्या दृष्टीने स्त्रीबीज निर्मितीचा दिवस व त्याआधीचे चार पाच दिवस विशेष महत्त्वाचे असतात. गर्भधारणा टाळायची असेल या काळात संबंध टाळावा किंवा लवकर अलग होण्याची पध्दत वापरावी.
स्त्रीबीज-निर्मिती झाल्यानंतर फलन झाले नाही तर सुमारे दोन आठवडयांनी पाळी येते. म्हणजेच स्त्रीबीज सर्वसाधारणपणे दोन पाळयांच्या मधोमध मुक्त होते. पण हे थोडे आधीही घडू शकते. उलटपक्षी ही घटना ताप, रक्तपांढरी, काबाडकष्ट, इ. गोष्टींमुळे लांबणीवरही पडू शकते. अर्थातच यात एक-दोन दिवसांचा फरक पडू शकतो. पुरुषबीज गर्भाशयात गेल्यानंतर एक-दोन दिवस ते जिवंत राहू शकते. स्त्रीबीज परिपक्व होऊन बीजग्रंथीतून बाहेर पडल्यावर एक-दोन दिवस जिवंत राहू शकते (पण फलन काही तासांतच होते).
काही स्त्रियांची पाळी 2-3 महिन्यांच्या अंतराने येऊ शकते. पण स्त्रीबीज निर्मितीनंतर दोन आठवडयानंतर मासिक पाळी येते हे मात्र निश्चित. वर सांगितलेल्या खाणाखुणा लक्षात ठेवल्या तर ही अनिश्चितता संपू शकते. प्रत्येकीला स्वतःच्या शरीराबद्दल एवढी माहिती असणे आवश्यक आहे. या
पोटात स्त्रीबीज जाणवणे : स्त्रीबीज बीजकोशातून बाहेर पडताना
, ओटीपोटात एका बाजूला सौम्य कळ किंवा चमक जाणवते. कधीकधी एका बाजूला टोचल्यासारखे दुखते.स्त्रीबीज निर्माण होताना गर्भाशयमुख मऊ थोडे वर ओढलेले आणि थोडे खुले राहते. इतर वेळी ते आपल्या नाकाच्या शेंडयासारखे निबर लागते.
- स्त्रीबीज निर्मितीच्या एक-दोन दिवसांत स्तनांच्या बोंडाना हळवेपणा येतो, त्यात एक प्रकारच्या सौम्य झिणझिण्या येतात. इतर वेळी स्तन जड वाटतात. काहीजणींना या काळात स्तन दुखरेही वाटतात.
स्त्रीबीज निर्मितीच्या एक दोन दिवसांत स्त्रियांची लैंगिक भावना वाढते
, जास्त उत्साह वाटतो, इतर वेळी यात जाणवण्यासारखा फरक पडतो. हा फरक ध्यानात येण्यासारखा आहे. स्त्रीबीज निर्मितीच्या दिवशी शरीराचे तपमान अर्धा-एक डिग्रीने वाढते. रोज तपमान घेतले तर हा फरक कळतो.निरोध - पुरुषाचा
निरोध - स्त्रियांचा
शील्ड
वीर्यनाशक जेली
तांबी
स्त्री संप्रेरके
निरोध हे पुरुषाने संभोगाच्या वेळी वापरण्याचे पिशवीसारखे एक रबरी साधन आहे. संभोगाच्या शेवटी बाहेर पडणारे वीर्य या पिशवीतच साठून राहते. त्यामुळे गर्भधारणा टळते. हे साधन गर्भनिरोधासाठी अगदी खात्रीशीर आहे. मुख्यतः गर्भधारणेचा'सुरक्षित' काळ सोडता मधल्या दहा दिवसांतच निरोध वापरायचे असते. ज्यांना पहिलेच मूल अजून व्हायचे आहे व मासिक पाळी नियमित आहे अशा जोडप्यांना निरोध वापरणे फार सोयीचे आहे. मात्र त्यानंतरही हे साधन वापरता येते.
संभोगानंतर लगेचच शिश्नावरचे निरोध दोन बोटांनी पकडून ठेवून अलग होणे आवश्यक असते. नाही तर वीर्य स्त्रीयोनीत पडून गर्भ राहण्याची शक्यता असते. एकदा वापरलेले निरोध परत वापरू नये. निरोध निर्धोक असला तरी 100% गर्भनिरोध होत नाही; काही वेळा चुकून गर्भ राहू शकतो हे लक्षात ठेवावे.
निरोध या साधनाचा एक मोठा उपयोग म्हणजे लिंगसांसर्गिक रोगांच्या प्रसाराला आळा. संभोगाच्या वेळी निरोध वापरल्यामुळे जोडीदारापैकी कोणालाही लिंगसांसर्गिक आजार असला तरी निरोगी जोडीदाराला त्याचा संसर्ग होत नाही. त्यामुळे जिथे लिंगसांसर्गिक रोगांची शक्यता आहे अशा लैंगिक संबंधात निरोध वापरणे जरुरीचे असते.
योनिमार्गात बसवायची टोप (शील्ड) हा पातळ रबराचा टोप असतो. याला एक लवचीक बांगडी असते. बांगडी दाबून हा टोप स्त्री स्वत: आपल्या योनिमार्गात बसवू शकते. हा टोप आत गर्भाशयाच्या तोंडावर बसतो. टोप बसवायच्या आधी शुक्रपेशीनाशक क्रिम लावावे लागते. टोपीचा आकार योग्य असला की ती फिट बसते आणि वीर्य किंवा शुक्रपेशी गर्भाशयात प्रवेश करू शकत नाहीत. योनिमार्गात वीर्यनाशक क्रीमचा प्रभाव 1-2तास राहतो. या काळात लैंगिक संबंध आल्यास शुक्रपेशी नष्ट होतात. मात्र त्यानंतर हा टोप सुमारे 8 तास काढायचा नसतो.
या साधनामुळे वीर्य व शुक्रपेशींचा गर्भाशयाशी संबंध येत नाही. या कारणाने पॅपिलोमा विषाणूंपासून गर्भाशयाचे संरक्षण होते. यामुळे पॅपिलोमा कोंब आणि कर्करोगापासून थोडे संरक्षण आपोआप मिळते.
हा निरोध योनिमार्गावर बसवायचा असतो. याची 8 से.मी. व्यासाची बाहेरची बांगडी बाहेर असली तरी रबरी पिशवी योनिमार्गात असते या पिशवीच्या शेवटच्या भागात आणखी एक लहान रबरी बांगडी असते. लैंगिक संबंधात शिश्न या पिशवीतच राहते. ही पिशवी 17से.मी. लांबीची असते. पिशवीत एक वंगण असते. यामुळे वीर्य गर्भाशयात शिरू शकत नाही. यामुळे लिंगसांसर्गिक जंतुदोषांपासूनपण संरक्षण मिळते.
थोडयाशा प्रशिक्षणाने स्त्री हा निरोध स्वत:च्या योनिमार्गात बसवू शकते. लैंगिक संबंधानंतर ही पिशवी बाहेरची बांगडी धरून काढून टाकायची असते. हा निरोध यानंतर टाकून द्यावा.
पुरुष-निरोधापेक्षा याची किंमत थोडी जास्त असली तरी याचे नियंत्रण तिच्याकडेच राहात असल्याने मोठी सोय होते.
तांबी हे नाव तांब्यामुळे पडले आहे. तांबीमध्ये प्लॅस्टिकच्या 'टी' आकाराच्या साधनावर एक बारीक तांब्याची तार गुंडाळलेली असते. गर्भाशयात तांब्याचे सूक्ष्म अणू राहिल्यामुळे गर्भधारणा टळते. हे साधन गर्भाशयात बसवण्याची पध्दत खूपच सोपी आहे. एकदा बसविल्यानंतर दोन वर्षेपर्यंत तांबीचा चांगला उपयोग होतो. सहसा याचा त्रास होत नाही. सुरुवातीस मासिक पाळीच्या वेळी थोडा जास्त रक्तस्राव होतो. मात्र काही स्त्रियांना याचा त्रास होत राहतो. (पाळी जास्त जाणे, कंबर दुखणे, इ.) अशा वेळी तांबी काढून टाकणे चांगले. सुमारे 15 टक्के स्त्रियांना तांबी चालत नसल्यामुळे ती काढून टाकावी लागते.
तांबी कधी बसवावी
पाळीच्या रक्तस्रावानंतर तर लगेच तांबी बसवणे आवश्यक आहे.
बाळंतपणानंतर 40 दिवसानंतर लगेच तांबी बसवावी.
तांबी कोणत्या कारणाने बसवू नये.
रक्तस्राव, रक्तपांढरी, ओटीपोटात सूज, मधुमेह, कर्करोग यांपैकी काही आजार असल्यास तांबी बसवू नये. तांबी काढल्यानंतर महिन्याभरात पाळी पूर्वीप्रमाणे सुरू होते. शासकीय कार्यक्रमात अशा प्रकारची काळजी न घेतल्यामुळे आणि माहिती न दिल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. कधीकधी गर्भधारणा नुकतीच झाली असल्यास गर्भ वाढत राहतो. किंवा तांबीने रक्तस्राव चालू होतो. स्त्रीची योग्य ती शारीरिक तपासणी झाल्याशिवाय तांबी बसवणे चूक आहे. तांबी बसवण्यापूर्वी गर्भाशय निरोगी असणे, सूज- दुखरेपणा नसणे याची खात्री करणे आवश्यक आहे
बाळंतपणानंतर अंगावर मूल पीत असते तोपर्यंत पाळी अनियमित असते. या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता खूप असते. निरोध वापरण्यासाठी नेमका काळ कोणता हे कळत नाही. अशा वेळी तांबी हा सर्वात चांगला उपाय आहे.
तांबी स्वत: काढता येते.
पुढचे मूल पाहिजे असेल किंवा गर्भधारणा बंद करण्याची शस्त्रक्रिया करायची असेल तेव्हा तांबी काढून टाकली की झाले. योनिमार्गात लोंबणारा नायलॉनचा दोरा बोटाने ओढून स्वतःलाही तांबी काढून टाकता येते.
स्त्री-संप्रेरके (अंतःस्राव) शरीरात जननचक्र चालवतात. स्त्रीबीज परिपक्व होणे,गर्भाशयाची तयारी होणे यासाठी ही संप्रेरके आवश्यक असतात. विशिष्ट प्रमाणात ही औषधे घेतली तर स्त्रीबीज तयार होत नाही-दबून जाते. त्यामुळे गर्भधारणा टळते. ही स्त्री-संप्रेरके गोळया, इंजेक्शन, चिकटपट्टी, योनि या स्वरुपात मिळतात. पण रोज घेण्याच्या गोळया हा सर्वत्र उपलब्ध प्रकार आहे. पाळी संपल्याच्या दिवसापासून रोज एक याप्रमाणे अट्ठावीस गोळया घेतल्या की त्या महिन्यापुरती गर्भधारणा टळते. यांतल्या शेवटच्या पाच गोळयांत संप्रेरक नसते. याप्रमाणे ओळीने तीन महिने या गोळया घेऊन एक महिना गोळया न घेता सोडावा लागतो. (या सोडलेल्या महिन्यात निरोध वापरून गर्भधारणा टाळावी लागते.)
स्त्री संप्रेरकांचे काही दुष्परिणाम
मळमळ, डोकेदुखी, स्तन जड वाटणे, पाळीच्या वेळी अंगावरून कमी किंवा जास्त रक्त जाणे, अंगावरले दूध कमी होणे, इत्यादी त्रास या गोळयांपासून संभवतो.
- स्तनांचा किंवा जननेंद्रियाचा कर्करोग किंवा अन्य गाठ
- अति- रक्तदाब
- हृदयविकार
- रक्ताच्या गुठळया होण्याचा आजार वा प्रवृत्ती.
- तंबाखूची सवय
- कुपोषण
- अपस्मार-फेफरे
- दमा
- इसब, पांढरे कोड
- अर्धशिशी (अर्धे डोके दुखणे)
- अंगावरून पाळीशिवाय अधेमध्ये रक्त जाणे
- याशिवाय मुलांना अंगावर पाजत असल्यास या गोळया निदान सहा महिनेपर्यंत टाळाव्यात.
या गोळयांचा हमखास उपयोग होतो. पण त्यापासून त्रास होण्याची शक्यताही असते,हे लक्षात ठेवा.
या गोळया रोज घेण्याचा त्रास नको म्हणून दोन-तीन महिन्यांसाठी एकदमच एक इंजेक्शन घेण्याची सोय आहे. पण या इंजेक्शनचे परिणाम दुष्परिणाम, इत्यादींबद्दल पुरेसे ज्ञान अजून झाले नाही. काही शहरी रुग्णालयात या इंजेक्शनचा स्त्रियांमध्ये वापर केल्यावर काय होते याबद्दल अभ्यास सुरू आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
१५ ते ४० वयोगटातील स्त्रियांनी पाळणा लांबवण्याचा प...
कोणी जख्मी झाले किंवा अचानक अजारी पडले, अशा संकटक...
नोकरी सांभाळत भावंडांच्या सहकार्याने सिकची यांची स...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...