अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून 2010 मध्ये बीटेक पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये वेगळे काहीतरी करण्याचा करण्याचा विचार मयूर सिकची यांच्या मनात आला. मात्र त्याच वेळी विद्यापीठात झालेल्या मुलाखतीमधून त्यांची जैन एरिगेशन कंपनीमध्ये निवड झाली. मयूर गेल्या चार वर्षांपासून जालना जिल्ह्यात सेल्स इंजिनिअर म्हणून नोकरी करीत आहेत. ठिबक सिंचन कंपनीत काम करताना दररोज जालना जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांवर भेटी वाढू लागल्या. त्यांच्या बरोबरीने पीक व्यवस्थापनाची चर्चा होऊ लागली. त्यातूनच घरच्या शेतीमध्येही आता बदल करावा, असा विचार मनामध्ये आला आणि त्या दृष्टीने नियोजनही सुरू केले.
मोप हे रिसोड-लोणार मार्गावर सहा हजार लोकवस्तीचे गाव. या गावात सिकची कुटुंबीयांची सामूहिक 90 एकर शेती. मयूर यांचे वडील पुरुषोत्तम सिकची यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय. मयूर यांना एक काका आणि दोन चुलत भाऊ. सर्व जण पारंपरिक पद्धतीनेच शेती करणारे. पाण्याची कमतरता असल्याने पीक पद्धतीत बदल होत नव्हता; परंतु या शेतीमध्ये बदल करण्याचा ध्यास मयूर यांनी घेतला. मात्र नोकरी सांभाळून त्यांना शेतीचे नियोजन करावे लागणार होते. "कोशिश करनेवालों की, कभी हार नही होती' या विचाराने शेती नियोजनास सुरवात केली. सन 2012 पासून सुरवातीला दर 15 दिवसांतून एक वेळ मयूर यांनी गावी येऊन भावांच्या सहयोगाने पीक बदलाला सुरवात केली. पूर्वी कापूस, सोयाबीन, उडीद, मूग या पारंपरिक पिकांची लागवड ठरलेली. मात्र 2013 मध्ये मयूर यांनी पहिल्यांदा 70 गुंठे क्षेत्रावर हळद लागवडीचा निर्णय घेतला. चार फुटांचा गादीवाफा करून ठिबक सिंचनावर सेलम हळद लागवड केली. हळद लागवडीपूर्वी प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यानुसार पीक व्यवस्थापन ठेवले. सत्तर गुंठ्यांतून वाळलेल्या हळदीचे 48 क्विंटल उत्पादन मिळाले. हळदीला पॉलिश करून त्याची साठवण गोदामात केली आहे. चांगला दर मिळाल्यावर विक्रीचे नियोजन आहे.
1) पारंपरिक पद्धतीने दर वर्षी 10 एकरांवर कपाशीची लागवड होत होती; परंतु मयूर यांनी भावांच्या सहकार्याने सुधारित पद्धतीने लागवडीचे नियोजन केले. गेल्या वर्षी चार एकरांवर बीटी कपाशीची लागवड पाच फूट बाय सव्वा फूट अंतराने केली. ठिबक सिंचनही केले.
2) कृषी विज्ञान केंद्रातून माती परीक्षणानुसार एकात्मिक खत व्यवस्थापन केले. कीड, रोग नियंत्रणही वेळेवर केले, त्यामुळे एकरी 15 क्विंटल कपाशीचे उत्पादन मिळाले.
3) प्रति क्विंटल 5400 रुपये दराने खामगाव (जि. बुलडाणा) येथील व्यापाऱ्याला कपाशीची विक्री करण्यात आली. एकरी चौदा हजारांचा खर्च झाला होता. उत्पादन वाढल्याने नफ्यातही चांगली वाढ झाली.
4) गतवर्षी जास्त पावसामुळे कपाशीच्या शेतात पाणी साचून राहिल्याने मूळकुजव्याचा प्रादुर्भाव झाला होता. अनुभवातून शहाणे होत या वर्षी प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने चार एकर क्षेत्रावर कपाशीची गादीवाफा पद्धतीने लागवड केली. तीन फूट रुंद गादीवाफा आणि दोन गादीवाफ्यातील अंतर एक फूट ठेवले. कपाशीच्या दोन रांगेतील अंतर चार फूट आणि दोन रोपांतील अंतर सव्वा फूट आहे. पिकाला ठिबक सिंचनही केले आहे. गादीवाफ्यावरील लागवडीमुळे पांढरी मुळे तयार होण्याचे प्रमाण वाढले. अति पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी शेताबाहेर जाते. या पद्धतीमुळे वाफसा स्थिती चांगली राहते.
5) सामूहिक कुटुंबाच्या 90 एकर क्षेत्रापैकी 30 एकर क्षेत्रावर सोयाबीन लागवड असते. घरचेच बियाणे निवड पद्धतीने वापरले जाते. सरासरी एकरी आठ क्विंटल उत्पादन मिळते. गतवर्षी सरासरी 3550 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. यंदा एक हेक्टर नवीन डाळिंब लागवडीमध्येही सोयाबीनचे आंतरपीक घेतले आहे.
6) सोयाबीन लागवडीसाठी मजूर टंचाई आणि लागणारा वेळ लक्षात घेऊन आता रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणीस सुरवात केली. त्यासाठी बैलचलित यंत्र खरेदी केले.
7) ऍग्रोवनमधील डाळिंब उत्पादकांच्या यशोगाथांमधून प्रेरणा घेऊन सिकची यांनी दीड वर्षापूर्वी एक हेक्टर क्षेत्रावर भगवा डाळिंबाची लागवड केली. लागवडीपूर्वी डाळिंब उत्पादकांच्या बागेला भेट दिली. त्यांच्याकडून पीक व्यवस्थापनाची माहिती घेतली. करडा कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांचे मार्गदर्शन घेतले. दोन ओळीत 12 फूट आणि दोन रोपांत दहा फूट अंतर ठेवले आहे. यंदाच्या वर्षी हस्त बहराचे नियोजन आहे.
1) मयूर सिकची यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली आहे. त्यांचे चुलत बंधू श्रीकांत पशुपालनाकडे लक्ष देतात. सध्या त्यांच्या गोठ्यात सात म्हशी असून, त्यातील चार दुधात तर तीन भाकड आहेत.
2) चार म्हशींपासून दोन्ही वेळचे मिळून तीस लिटर दूध मिळते. दुधाची विक्री 45 रुपये प्रति लिटर दराने गावातील दूध संकलन केंद्राला होते.
3) सात म्हशी, चार बैल आणि एका गाईला वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता व्हावी याकरिता एक एकरावर संकरित नेपिअर आणि मका लागवड केली आहे.
4) सात वर्षांपूर्वी साडेतीन एकरांवर एन-7 या आवळ्याची लागवड. एका झाडापासून सरासरी 40 किलो आवळा उत्पादन. रिसोड येथील व्यापाऱ्यास थेट बागेत आवळा विक्री. सरासरी वीस रुपये प्रति किलोचा दर.
5) सात वर्षांपूर्वी पाच एकरांवर पाच फूट बाय पाच फूट सागवान लागवड.
6) डाळिंब, कपाशी, सागवानाला ठिबक सिंचन.
शेतीच्या नियोजनाबाबत मयूर सिकची म्हणाले, की जालना जिल्ह्यातील नोकरी सांभाळून दर रविवारी मी शेतावर असतो. माझ्या गैरहजेरीत सचिन आणि श्रीकांत या दोन्ही चुलत भावंडांचे शेतीकडे सातत्याने लक्ष असते. प्रत्येक रविवारी आम्ही एकत्रित बसून पुढील आठवड्यातील शेती व्यवस्थापनाचा निर्णय घेतो. मजुरांचा वापर शेतीत वाढला तर खर्चही वाढतो, ही बाब लक्षात घेऊन यांत्रिकीकरणावर भर दिला. मशागतीची बहुतांश कामे ट्रॅक्टरद्वारा होतात. प्रत्येक पिकाचा जमा खर्चाचा ताळेबंद मांडतो.
संपर्क ः मयूर सिकची - 9422939019
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोणी जख्मी झाले किंवा अचानक अजारी पडले, अशा संकटक...
या पध्दतीचा उपयोग केवळ पाळणा लांबवण्यासाठी नाही तर...
आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठ...
१५ ते ४० वयोगटातील स्त्रियांनी पाळणा लांबवण्याचा प...