অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कायम स्वरूपाचे संततिप्रतिबंधक

कायम स्वरूपाचे संततिप्रतिबंधक उपाय (पाळणा थांबवणे)

दोन-तीन मुलांनंतर पाळणा कायम थांबवण्याची गरज भासते. यासाठी पुरुषाची किंवा स्त्रीची नसबंदी करणे हाच उपाय आहे. पुरुषाची नसबंदी केल्याने शुक्रपेशी वीर्यात यायचा मार्ग बंद होतो. स्त्री नसबंदीने स्त्रीबीज गर्भाशयात यायचा रस्ता बंद होतो.

पुरुष-नसबंदी

पुरुष-नसबंदी ही अगदी सोपी, निर्धोक पध्दती आहे. ही शस्त्रक्रिया केवळ पाच-दहा मिनिटांत पूर्ण होते. रक्तस्राव, जखम, सूज वगैरे त्रास यात जवळजवळ नसतो.

या नसबंदीनंतर सात- आठ दिवस लंगोट वापरणे, ओझे न उचलणे ही पथ्ये पाळावीत.

वीर्यकोशात उरलेल्या शुक्रपेशी निघून जाईपर्यंत म्हणजे तीन महिनेपर्यंत निरोध वापरावा. तीन महिने ही काळजी न घेतल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता असते. यामुळे अकारण संशय, भीती, आणि वाद सहन करावे लागतात.

याबद्दल काही गैरसमज आहेत. उदा. पुरुषाची शक्ती कमी होते. या नसबंदीचे प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे, याला कारण पुरुषप्रधान समाजव्यवस्था, पुरुषी अहंकार. ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची असते. म्हणजेच टाका काढण्यासाठी परत डॉक्टरकडे जावे लागत नाही.

स्त्री-नसबंदी

या शस्त्रक्रियेत बेंबीच्या खाली एक-दोन इंच लांबीचा छेद घेतात. यातून ओटीपोटातल्या गर्भनलिका धागा बांधून बंद करण्यात येतात. हेही ऑपरेशन सोपे असते. परंतु निदान सहा-सात दिवस रुग्णालयात राहावे लागते.

लॅपरोस्कोपी (बिनटाक्याची- दुर्बिणीतून होणारी शस्त्रक्रिया) प्रकाराच्या शस्त्रक्रियेत पोटावरचा छेद लहान असतो. त्यातून नळी घालून गर्भनलिका रबरी धाग्याने बंद करतात. या शस्त्रक्रियेनंतर चार-सहा तासांत घरी जाता येते.

बिनटाक्याची स्त्री शस्त्रक्रिया ही झटपट शस्त्रक्रिया आहे. मात्र आधी सांगितलेल्या मोठया छेदाच्या शस्त्रक्रियेपेक्षा ती थोडी कमी भरवशाची असते. याची शिबिरे भरवली जातात. या शिबिरात एका दिवसात वीसपेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्या जाऊ नये असा नियम आहे. मात्र घाईत केलेल्या शस्त्रक्रियांत अनेक धोके संभवतात.

नसबंदी शस्त्रक्रिया उलटवणे

स्त्री-नसबंदी किंवा पुरुष-नसबंदी या कायम स्वरूपाच्या उपाययोजना आहेत. कधी कधी काही जोडप्यांना बालमृत्यूच्या घटनेनंतर गर्भधारणा परत होण्याची गरज वाटू शकते. यासाठी नस जोडण्याची शस्त्रक्रिया करून यश मिळू शकते. अशी शस्त्रक्रिया अवघड असते. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होते.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate