অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योनिमार्ग

स्त्री शरीराच्या जननेंद्रियातील संभोग सुलभ व ज्या मार्गाने अपत्याचा जन्म होतो त्या भागाला ‘योनिमार्ग’ म्हणतात. दोन लघुभगोष्ठांमधील (बाह्य जननेंद्रियाच्या ओठांसारख्या भागांमधील) फटीपासून गर्भाशयाच्या ग्रीवेपर्यंत (मानेसारख्या भागापर्यंत) तंतुमय ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा-पेशींचा-समूह) व स्नायू यांनी मिळून बनलेला हा भाग चंबूच्या आकाराचा असून त्याचा रुंद भाग गर्भाशयाकडे असतो. स्त्री सामोरी उभी आहे अशी कल्पना केल्यास योनिमार्गाच्या अग्रभागी मूत्राशय व मूत्रमार्ग आणि पश्चभागी मलाशय अथवा गुदांत्र (मोठ्या आतड्याच्या शेवटच्या दोन भागांपैकी पहिला भाग) असते. त्याची दिशा वर व मागे गेलेली असून तो गर्भाशयाशी ९०° पेक्षा जास्त कोनात मिळतो. कोनाचे तोंड पुढील बाजूस असून त्याचा कमीजास्तपणा मूत्राशय व मलाशय यांच्या स्थितीवर (भरलेली किंवा रिकामी) अवलंबून असतो.

योनिमार्गाच्या भित्ती सर्वसाधारणपणे एकमेकींशी संलग्न असतात. त्याच्या खालच्या भागाचा छेद इंग्रजी H या अक्षरासारखा आणि मधल्या भागाचा छेद आडव्या भेगेसारखा दिसतो. अग्रभित्तीची लांबी सु. ७·५ सेंमी व पश्चभित्तीची सु. ९ सेंमी. असते आणि तो खालून वर रुंदावत जातो. योनिमार्गाचा वरचा भाग गर्भाशयास जोडलेला असून त्या ठिकाणी ग्रीवा व अग्रभित्ती यांमधील पोकळीला ‘अग्र योनि-चापिका’, पश्चभित्तीकडील पोकळीला ‘पश्च योनि-चापिका’ आणि दोन्ही बाजूंकडील पोकळ्यांना ‘पार्श्व योनि-चापिका’ म्हणतात. योनिमार्गाच्या पश्चभित्तीचा वरचा एक चतुर्थांश भाग श्रोणिगुहेकडील (धडाच्या तळाशी हाडांनी वेष्टित असलेल्या पोकळीकडील) बाजूस पर्युदराने (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पटलाने) आच्छादित असतो. मलाशय व पश्चभित्ती यांमधील पोकळीला जेम्स डग्लस या स्कॉटिश शारीरविज्ञांच्या नावावरून ‘डग्लस कोष्ठ’ म्हणतात. योनिमार्गाच्या मुखाजवळ पातळ पडदेवजा श्लेष्मकलेचे (बुळबुळीत पटलाचे) आच्छादन असते व त्यामुळे योनिमार्ग जवळजवळ बंद असतो. या पडद्याला ‘योनिच्छद’ अथवा ‘योनि-पटल’ म्हणतात. योनिच्छदाचे निरनिराळे प्रकार असून त्यांपैकी काही आ. १ मध्ये दर्शविले आहेत.

योनिमार्गाच्या भित्तीची तीन थरांची रचना

  1. आतला श्लेष्मकलास्तर,
  2. मधला अरेखित (ज्यातील घटक तंतूंवर आडव्या रेखा नसतात अशा) स्नायूचा थर आणि
  3. बाह्य तंतुमय ऊतक थर.

स्नायुथराच्या बाहेर अवकाशोतक (अनियमित, सैलसर रचना असलेले ऊतक) असून त्यात रक्तवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. यौवनावस्थेपूर्वी श्लेष्मकलास्तर पातळ आणि सपाट असतो. स्त्रीमदजन (इस्ट्रोजेन) स्रावाच्या उद्दीपनामुळे तो जाड बनतो आणि योनिमार्ग स्राव क्षारधर्मी (अल्कधर्मी) न राहता अम्लधर्मी होतो. जननक्षम वयात स्रावाचे pH मूल्य सर्वसाधारणपणे ४·५ असते. योनिमार्गात कोणत्याही ग्रंथी नाहीत. मुखाशी असलेल्या बार्थोलिन ग्रंथींचा (कॅस्पर बार्थोलिन या डच शारीरविज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणाऱ्या ग्रंथींचा) स्राव व गर्भाशय ग्रीवेतील स्राव योनिमार्ग ओलसर ठेवतात. संभोगाच्या वेळी भित्तीतील रक्तवाहिन्यांतील रक्ताधिक्य वंगणक्रियाकारक असते.

तारुण्यावस्थेत श्लेष्मकलास्तरात अधिक ग्लायकोजेन असते व त्यावरील डॉडरलेन सूक्ष्मजंतूंमुळे (ए. डॉडरलेन या जर्मन स्त्रीरोगतज्ञांनी शोधून काढलेल्या सूक्ष्मजंतूंमुळे) किण्वनक्रियेने (आंबण्यासारख्या क्रियेने) स्राव अम्लधर्मी बनतो. हे सूक्ष्मजंतू नवजात स्त्री अर्भकात जन्मानंतर १५ तासांत योनिमार्गात सापडतात. ते हानिकारक नसून इतर रोगकारक जंतू वाढू देत नाहीत.

योनिमार्ग स्रावाची सूक्ष्मदर्शकीय तपासणी करून काही माहिती मिळते; उदा., गर्भाशय ग्रीवेच्या कर्करोगाचे लवकर निदान होऊ शकते. काही हॉर्मोनांचा उपचार चालू असल्यास त्यांच्या परिणामांची माहिती मिळू शकते.

विकृती

योनिमार्गाच्या नेहमी आढळणाऱ्या ‘प्रदर’ या विकृतीविषयी स्वतंत्र नोंद दिलेली असून इतर काही विकृतींविषयी खाली थोडक्यात माहिती दिली आहे.

योनिव्रण

ही विकृती क्वचित आढळते व बहुधा बाह्य वस्तूमुळे निर्माण झालेली असते. उदा., हॉज पेसरी (नेहमीची जागा सोडून मागेझुकलेल्या गर्भाशयास पूर्वस्थितीत ठेवण्यासाठी योनिमार्गात वरच्या बाजूस बसवावयाचे व एच्‌. एल्‌. हॉज या अमेरिकनस्त्रीरोगतज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारे कचकड्याच्या बांगडीसारखे उपकरण). हा व्रण पश्चभित्तीवर वरच्या बाजूस असतो.अशा व्रणातून कर्करोग उत्पन्न होण्याचा धोका असतो. काही व्रण गुप्तरोगजन्य किंवा क्षयरोगजन्य असतात.

योनिशोथ

(योनीची दाहयुक्त सूज). याचे दोन प्रकार ओळखले जातात : (१) विशिष्ट व (२) अविशिष्ट.

  1. विशिष्ट : यामध्ये गुप्तरोगजन्य, ट्रिकोमोनासजन्य व मोनिलिया (किंवा कॅन्डिडा) याप्रजातीतील कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) उद्भवणारा यांचा समावेश होतो.
  2. अविशिष्ट  : या प्रकारात रसायने ,  औषधे ,  डुश ( औषधोपचारासाठी वापरण्यात येणारा पाणी ,  बाष्प वा वायू यांचा झोत प्रवाह) ,  पेसरी ,  बोळे इ. बाह्य वस्तू कारणीभूत असतात. उदा. ,  संततिप्रतिबंधक जेली. योनिमार्ग स्राव क्षारधर्मी बनल्यामुळे रोगकारक सूक्ष्मजंतू बळावतात. यामुळे प्रसूतीनंतरच्या काळात हा प्रकार अधिक आढळतो.

आ. २. रक्तपूरित योनी : (१) रक्तसंचय, (२) फुगलेला योनिच्छद, (३) गर्भाशय, (४) मूत्राशय. आ. २. रक्तपूरित योनी : (१) रक्तसंचय, (२) फुगलेला योनिच्छद, (३) गर्भाशय, (४) मूत्राशय. योनिमार्गाची अविवरता अथवा अच्छिद्रता : सर्वसाधारणपणे योनिमार्ग अतिशय अरुंद बनण्याला योनिमार्ग ‘अविवरता’ म्हणतात. ही विकृती मुखाशी, अंश भागात किंवा पूर्ण मार्गात असू शकते. लघुभगोष्ठ एकमेकांस चिकटलेले असल्यास त्याला ‘लघुभगोष्ठ समूहन ’ म्हणतात. आफ्रिकेत ,  काही जमातींतील स्त्रियांची सुन्नत अथवा खतना करण्याच्या पद्धतीमुळे भयंकर इजा होऊन योनिमार्ग अविवरता उत्पन्न होते. ईजिप्त व सूदान या देशांनी या प्रकारावर बंदी घातली आहे. अपसामान्य व कष्ट प्रसूतीनंतर योनिभित्तीस झालेली इजा बरी होताना वण-ऊतक निर्माण झाल्यामुळे अविवरता उद्भवते . काही देशांतील विचित्र पद्धतींमुळे ही विकृती उत्पन्न होते. उदा. ,  अरबस्तानातील बेदूहन जमातीत प्रसूतीनंतर दुसऱ्या ते पंधराव्या दिवसापर्यंत योनिमार्गात एक किंवा अधिक अंड्याच्या आकाराचे सैंधवाचे खडे बसवून ठेवतात. नायजेरियाच्या काही भागातील जमाती प्रसूतीनंतर विशिष्ट झाडपाला योनिमार्गात ठेवतात. त्यापासून टॅनिने निर्माण होऊन भित्ती आकुंचन करण्याचा हेतू असावा. या सर्व प्रयोगांचा हेतू योनिमार्ग अरुंद बनून संभोग सुख मिळवून देणे हा असतो. मात्र यात पुष्कळ वेळा अविवरता निर्माण होते. अविवरतेमुळे संभोग-अशक्यता ,  कष्ट-संभोग तसे कष्ट-प्रसूती हे उपद्रव संभवतात व पुष्कळ वेळा शस्त्रक्रिया उपचार करावे लागतात.

रक्तपूरित योनी

अच्छिद्र योनिच्छदामागे मासिक पाळीचा स्राव तुंबल्यामुळे होणाऱ्या विकृतीला ‘रक्तपूरित योनी ’ म्हणतात. वयात आलेल्या मुलीस मासिक पाळी येण्यास विलंब झाल्यामुळे बहुधा माता वैद्यकीय सल्ला घेते. कधीकधी मूत्रावधारण झाल्यामुळेही वैद्याकडे जावे लागते. काही महिने स्रावसंचयामुळे मोठी अ र् बु द वजा ( नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठीसारखी) गाठ श्रोणिगुहा व्यापून वर खालच्या पोटात हातास लागू शकते. योनिमार्ग तपासणीत काळपट रक्तसंचयाने फुगोटी आलेला योनिच्छद स्पष्ट दिसतो. योनिच्छद छेदन हा या विकृतीवर एकमेव उपाय आहे.

इतर विकृती

यांमध्ये काही अर्बुदे ,  कर्करोग ( प्राथमिक किंवा दुय्यम) ,  गर्भाशय- अं तः स्तर अस्थानता ( योनिमार्ग भित्तीवर अं तः स्तर ऊतकाची वाढ होणे) इत्यादींचा समावेश होतो. या सर्व क्वचित आढळणाऱ्या विकृती आहेत.

 

संदर्भ  : 1. Howkins, J: Bourne, G., Ed., Shaw’s Textbook of Gynaecology. Edinburgh, 1976.

2. Lawson, J. B.; Stewart. D. B. Obstetrics and Gynaecology in the Tropics and Developing Countries, Edinburgh, 1974.

3. Masani, K. M. A Testbook of Gynaecology, Bombay, 1982.

 

लेखक : कमल य. भालेराव / य. त्र्यं. भालेराव

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate