प्रत्येक स्त्रीच्या जननमार्गाचे काही प्राकृतिक (स्वाभाविक) स्त्राव असतात. योनिमार्ग प्रकोष्ठावर (प्रवेशद्वाराजवळील पोकळीवर) असलेल्या बार्थोलिन ग्रंथीचा (सी. बार्थोलिन या डॅनिश शरीरविज्ञांच्या नावावरुन ओळखण्यात येणाऱ्या ग्रंथीचा) स्राव, गर्भाशयाच्या ग्रीवेतील (मानेसारख्या भागातील) ग्रंथींचा स्त्राव, योनिभित्तीतील ग्रंथींचा स्त्राव व गर्भाशय-भिंत्तीचा स्त्राव हे सर्व प्राकृतिक स्त्राव होत. त्यांचा उद्देश जननमार्ग ओलसर ठेवण्याचा असतो आणि त्यांची स्त्रीस जाणीवही नसते. गर्भाशय ग्रीवेच्या स्त्रावाचे प्रमाण निरनिराळे असते व प्रत्येक स्त्रीमध्ये ऋतुचक्राप्रमाणे त्यात बदल होतो. गर्भारपण, लैंगिक व मानसिक उद्दीपन आणि अंडमोचनाच्या (परिपक्व अंड म्हणजे प्रजोत्पत्तिक्षम पेशी अंडकोशातून बाहेर पडण्याच्या) वेळी स्त्रावाधिक्य आढळते. या शरीरक्रियात्मक स्त्रावामुळे योनिमार्गाच्या संमुख भित्तीचे पृष्ठभाग एकमेकांजवळ असूनही घर्षणविरहित राहतात. याशिवाय या स्त्रावाची अम्लता [pH मूल्य ४; ⟶ पीएच मूल्य] सूक्ष्मजंतूची वाढ रोखण्यास मदत करते. योनिमार्ग-भित्तीच्या उपकला अस्तराच्या (पातळ अस्तराच्या) कोशिकांचे (पेशींचे) सतत विशल्कन (झडून पडणे) चालू असते. या कोशिकांतील ग्लायकोजेनापासून योनिमार्गात नेहमी असणारे डीडरलीन सूक्ष्मजंतू (ए. डीडरलीन या जर्मन स्त्रीरोगतज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणारे सूक्ष्मजंतू) लॅक्टीक अम्ल तयार करीत असतात. ही क्रिया रक्तातील ⇨ स्त्रीमदजन या हॉर्मोनामुळे (उत्तेजक स्त्रावामुळे) नियंत्रित केली जाते. लहान मुली व वयोवृद्ध स्त्रियांमध्ये लॅक्टिक अम्लाचे संरक्षण कमी पडल्यामुळे या वयोगटात योनिमार्गशोथाची (योनिमार्गाला दाहयुक्त सूज येण्याची) शक्यता अधिक असते.
अस्वच्छता, कुतूहल (बोटे घालणे वगैरे), बाह्य पदार्थ (उदा., पाटीपेन्सिलीचे किंवा काडीचे तुकडे) व घाण योनिमार्गात शिरणे जंतुसंक्रामणास कारणीभूत होतात. आंत्रमार्गातील (आतड्यातील) परोपजीवींची (जंत वगैरेंची) वाढ, रक्तक्षय (अॅनिमिया) आणि योनिमार्गाचा स्त्राव हे पुष्कळ वेळा एकाच वेळी आढळतात. यांशिवाय हस्तमैथुनाची सवय व आतून घालावयाच्या गलिच्छ चड्ड्या कारणीभूत असतात. विकृतिस्थान (रोगस्थान) बहुधा भग (जननेंद्रियाचा बाह्य भाग) हे असते. योनिच्छद अभंग असल्यास व बाह्य पदार्थाची शंका नसल्यास किंबहुना या वयातच जननेंद्रियाची प्रत्यक्ष तपासणी शक्य तो टाळावी.
(अ) योनिमार्ग : सूक्ष्मजंतु-संक्रामण : (१) अविशिष्ट सूक्ष्मजंतु-संक्रामण (स्टॅफिलोकोकाय, स्ट्रेप्टोकोकाय, एश्वेरिकिया कोलायइत्यादींमुळे होणारे संक्रामण), (२) गोनोकोकाय (परमा), (३) ट्रिकोमोनास व्हजायनॅलिस, (४) कॅन्डिडा अल्बिकान्स (मोनिलियासीस), (५) हीमोफायलस व्हजायनॅलिस, (६) उपदंशविरहित चामखीळ.
बाह्य पदार्थ : (१) पेसरी (नेहमीची जागा सोडून मागे झुकलेल्या गर्भाशयास पूर्वस्थितीत ठेवण्याकरिता वापरण्यात येणारे व्हल्कनाइटाचे बांगडीसारखे उपकरण), (२) कापसाचा किंवा चिंधीचा बोळा.
रसायनजन्य : (१) योनिमार्ग फवारण्याकरिता वापरलेली पूतिरोधक (सूक्ष्मजंतूची वाढ रोखणारी) औषधी द्रव्ये; (२) योनिमार्गात ठेवण्याची संततिप्रतिबंधक औषधे. अर्बुदजन्य (नवीन कोशिकांची अत्याधिक वाढ झाल्याने होणाऱ्या गाठीमुळे उत्पन्न होणारा) व्रण.
शस्त्रक्रियापश्च (शस्त्रक्रियेनंतर उत्पन्न होणारे) : कणोतक (जखम भरून आल्यानंतर तयार होणारा रक्तवाहिन्यायुक्त कोशिकासमूह).
(आ) गर्भाशय ग्रीवा : (१) ग्रैव अपक्षरण (गर्भाशयाच्या बाह्य मुखाभोवतील कोशिकारचना बदलल्यामुळे लाल दिसणारा भाग) (२) चिरकारी (दिर्घकालीन) ग्रीवाशोथ.
(इ) गर्भाशय : (१) गर्भपातानंतर आत राहिलेल्या गर्भधारणेचा अंश, (२) पूयगर्भाशय (गर्भाशयाच्या पोकळीत पूसंचय होणे), (३) कर्करोग.
(ई) सार्वदेहिक : अस्थिमार्दव (या विकृतीत प्रदर हे एक प्रमुख लक्षण असते.)
(उ) मनोनिर्मित : (१) वैवाहिक सलोख्याचा अभाव, (२) गर्भधारणेची भिती, (३) गुप्तरोगाची भीती, (४) कर्करोगाची भिती.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
बटाटा पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, ...