शहरातील घरांमध्ये आता संडास अनिवार्य आहे. त्याशिवाय घराचा आराखडा मंजूरच होत नाही. असेच आता खेडयांमध्येही झाले पाहिजे. संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये अनेक गावांमध्ये घरगुती संडास झाले आहेत.
शहरात सर्व घरांना सेप्टिक टँक अनिवार्य आहेत. त्यात मैलापाणी साठून काही प्रमाणात निर्जंतुक होते व त्यानंतर त्याची विल्हेवाट होते. ज्या शहरात मैलापाणी योजना आहे तिथे सेप्टिक टँक त्याला जोडलेले असतात. या बंद भुयारी गटारातून मैलापाणी (काळसर रंगाचे) वाहून जाते. शहराबाहेर ते प्रक्रिया केंद्रावर आणून निरुपद्रवी केले जाते. यानंतर त्यातला घनभाग वेगळा काढून वाळवला जातो. द्रवभाग शेतीसाठी वापरला जातो. मात्र या द्रवरुप भागात काही प्रमाणात जंतांची अंडी व काही जंतू असतातच. पण शेतात हळूहळू ते मरतात किंवा निष्क्रिय होतात. काही शहरात मात्र मैलापाणी नदीत सोडले जाते. पालिकेने हा गुन्हा केलेला असतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण नुसार असे करणे अपराध आहे.
मात्र सेप्टिक टँक पुरेसे उंच असतील तरच त्यातील घाण निर्जंतुक होते.
शहरांमधील संडासांचा एक मोठा प्रश्न म्हणजे फ्लशमध्ये वाया जाणारे पाणी. एकूण पाणी बचतीची गरज असल्यामुळे संडास - लघवीनंतर 5 ते 10 लिटर पाणी फ्लशसाठी लागणे हे गैर आहे. यासाठी आता संडासची भांडी छोटी करणे तसेच 5 लिटरचा फ्लश वापरणे आवश्यक आहे. तसेच काही फ्लश टाक्यांमध्ये लघवीसाठी वेगळया लहान फ्लशची (1 लिटर पाणी) सोय असते. या फ्लशच्या टाकीला दोन बटने असतात. लहान बटन लघवीचे (1 लिटर) असते व मोठे बटन (5 लिटर) संडासचे असते.
ग्रामीण भागात मलमूत्र व्यवस्थापनासाठी अनेक तांत्रिक सुधारणा करणे शक्य आहे. यात खड्डयांचे संडास, जलबंदा ऐवजी झडप, स्वस्त मलपात्र व स्वस्त आडोसा अशी अनेक तंत्रे आहेत. याशिवाय संडास गोबर गॅसला जोडणेही शक्य आहे. यासाठी पुढे वेगळे प्रकरण दिले आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/27/2020
उघडयावर संडास केल्यामुळे अनेक रोगांचा एका माणसाकडू...
निर्मळता हा मानवी संस्कृतीचा आणि आरोग्याचा पाया आह...
संडासमध्ये कमीत कमी पाणी वापरुन स्वच्छता करण्यासाठ...