मनुष्य जातीची सुधारणा केवळ आनुवंशिकता सुधारुन होणार नाही तर पर्यावरणातही योग्य ते बदल घडवून आणावे लागतील. ह्या दृष्टीने विचार करणाऱ्या सुप्रजाजननशास्त्राच्या शाखेला ‘ सुजीवनविज्ञान ‘ (यूथेनिक्स) म्हणतात. मनुष्याच्या विकासात कोशिका आणि रेणूमध्ये बदल घडवून इच्छित ते परिवर्तन करणाऱ्या किमयेस ‘ जनुक-कार्यकिमया’ (यूफेनिक्स) म्हणतात. जनुक-कार्यकिमयेचा उपयोग मानवी जीवन सुधारण्यासाठी करता येणे शक्य आहे.
गॉल्टन यांनी अनेक विख्यात कुटुंबांच्या वंशावळींचा अभ्यास करून बुद्घिमत्ता हा गुण आनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसरीकडे येतो असा निष्कर्ष काढला. त्यासाठी त्यांनी आपल्या अभ्यासास संख्याशास्त्रीय विश्लेषणाची जोड दिली, तसेच समरुप (समबीज) जुळ्यांचा समावेश आपल्या संशोधनात केला. परंतु माणसाच्या आसपासच्या परिस्थितीला व परिपोषणाला (पालनपोषणाला) महत्त्व देणाऱ्या शास्त्रज्ञांकडून बराच विरोध झाला. गॉल्टन यांच्याकडून (१९११) लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजला सुप्रजाजननशास्त्र या विषयाचे अध्यासन निर्माण करण्यासाठी बरीच मोठी देणगी मिळाली. गॉल्टन यांचे अनुयायी आणि प्रख्यातजीवमापनशास्त्रज्ञ कार्ल पीअर्सन यांनी या अध्यासनावर दीर्घकाळ (१९११–३३) काम केले. या काळात गॉल्टन यांची सामग्री वापरुन पीअर्सन यांनी राष्ट्रीय अधोगतीचा अभ्यास ही प्रकाशनमालिका (१९०६–२४) प्रसिद्घ केली. त्यानंतर त्यांनी अॅनल्स ऑफ यूजेनिक्स या नियतकालिकाची स्थापना करुन त्याचे संपादकत्व मृत्युकाळापर्यंत (१९२५–३६) सांभाळले.
सुप्रजाजननशास्त्राच्या शास्त्रशुद्घ आणि वस्तुनिष्ठ अभ्यासात प्रारंभीच्या काळात बऱ्याच अडचणी आल्या. या शास्त्राच्या नावाखाली जर्मनीमध्ये व अमेरिकेत आणि इतरत्र वंशश्रेष्ठतेचे राजकीय सिद्घांत प्रचारात येऊन वंशविद्वेषात भर पडली. त्यामुळे अभ्यासक संस्थांनी सुप्रजाजनन शास्त्राविषयी आपली ध्येयधोरणे अधिक स्पष्ट व शास्त्रशुद्घ केली. इंग्लंडमधील संस्था यूजेनिक्स सोसायटी या नावाने १९२६ पासून ओळखली जाऊ लागली. अमेरिकेतील संस्थेचे नाव सोसायटी फॉर स्टडी ऑफ सोशल बायॉलॉजी असे १९७१ मध्ये बदलण्यात आले. मानवी प्रजनन, आरोग्य आणि विकास यांना अनुकूल अशा जीवशास्त्रीय, आनुवंशिकी,सामाजिक, सांस्कृतिक इ. घटकांच्या संशोधनास चालना देणे असा आधुनिक प्रजाजननशास्त्राचा उद्देश आहे असे म्हणता येईल. त्यामुळे वैद्यकीय आनुवंशिकी, गर्भवतीचे आरोग्य व पोषण, रोगप्रतिबंध, स्त्रीशिक्षण, समाजप्रबोधन यांसारख्या अनेकविध क्षेत्रांना हे शास्त्र स्पर्शून जाते.
आनुवंशिक विकारांची निर्मिती आईवडिलांपैकी एका किंवा दोघांकडून सदोष जनुके अपत्यास प्राप्त झाल्यामुळे होत असते. सदोष जनुकामुळे घडणारा परिणाम ते जनुक दुसऱ्या जनक व्यक्तीकडून ( माता अथवा पिता ) मिळणाऱ्या जोडीदार-जनुकाच्या तुलनेत प्रभावी आहे अथवा अप्रभावी आहे यावर अवलंबून असते [⟶ आनुवंशिकी ]. अप्रभावी जनुकाचा परिणाम एखाद्या पिढीमध्ये प्रकट झाला नाही तरी तो गुणधर्म ( गुण ) त्याच्या पुढील पिढीकडे संक्रामित होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुप्रजाजननात किमान दोन-तीन पिढ्यांचा तरी विचार करणे आवश्यक ठरते. तसेच विशिष्ट दोषास (विकारास) जबाबदार असलेले जनुक हे ४६ गुणसूत्रांपैकी लिंगनिर्धारक गुणसूत्रावर ( एक्स आणि वाय) आहे अथवा इतर ४४ पैकी एखाद्या अलिंग गुणसूत्रावर आहे, याचीही माहिती असावी लागते. काही विकार आनुवंशिक असले तरी त्यांची लक्षणे आहार, विषाणुसंक्रामण व परिसरातील प्रदूषण यांसारख्या घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे ती दीर्घकाळानंतर (साधारण वयाच्या चाळीशीनंतर) दिसू लागतात. याउलट काही उपजत दोषांमागे जनुकीय कारणे असली, तरीही ती केवळ त्या पिढीत एखाद्या गुणसूत्रास विभाजनाच्या वेळी झालेल्या इजेमुळे किंवा विभाजन दोषामुळे उद्भवलेली असतात.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 2/24/2020
अनेक गुण मुलांना आईबापांकडून मिळतात.
एक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत...