मूल जन्मले की ते आईसारखे दिसते का बापासारखे दिसते, तसेच त्याचा रंग वगैरे गोष्टींची आपण चौकशी करतो. रंगरूपाप्रमाणेच स्वभाव, बुध्दिमत्ता, रोगप्रतिकारशक्ती व इतर अनेक गुण मुलांना आईबापांकडून मिळतात.
मुलगा की मुलगी होणार हेदेखील बापाकडून येणा-या पेशींवर अवलंबून असते. हे कसे होते हे आपण थोडक्यात बघू.
प्रत्येक रंगसूत्र खास अशा अनेक गुणसूत्रांचे मिळून बनलेले असते. त्या गुणसूत्रांमुळे (म्हणजेच जीन किंवा जनुक) त्या त्या माणसाचे गुणधर्म, प्रतिकारशक्ती, रंगरूप, उंची, स्वभाव आनुवंशिक आजार, इत्यादी गोष्टी ब-याच प्रमाणात निश्चित होतात. अशा प्रकारे संततीला आपल्या आईवडिलांकडून एक प्रकारचा 'ठेवा' मिळत असतो. योग्य परिस्थिती मिळाली तर गुणधर्माचा विकास होतो, नाही तर ते दबून जातात. उदा. खाणे नीट मिळाले तर उंची वाढेल. नाहीतर मूल खुरटेल.
थोडक्यात, शेतामध्ये योग्य बियाणे व योग्य परिस्थिती मिळाली तर जसे चांगले पीक येते, तसेच योग्य आनुवंशिक वारसा व चांगली परिस्थिती लाभली तर जीवन निरोगी होते. आनुवंशिक दोष टाकून निरोगीपणा राखण्यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घेता येते.
रंगसूत्रे आणि गुणसूत्रे यांतूनच मानववंश पिढयान् पिढयात संक्रमित होत आहे. मानवी पेशीत रंगसूत्रांच्या 23 जोडया असतात. (म्हणजे एकूण 46 रंगसूत्रे). ही रंगसूत्रे पेशीकेंद्रात असतात. पेशीचे विभाजन होते तेव्हा विशिष्ट अवस्थेत रंगसूत्रे ठळक दिसू शकतात. सूक्ष्मदर्शकाने यांचे फोटो काढल्यास प्रत्येक रंगसूत्र हे इंग्रजी X आकाराचे दिसते. मात्र प्रत्येक रंगसूत्र थोडे थोडे वेगळे ओळखता येते. लांबी, जोडणबिंदूची जागा, इत्यादी वैशिष्टयांवरुन हे वेगळेपण दिसून येते. रंगसूत्रे (आणि गुणसूत्रे हे त्यांचे घटक) हाच आनुवंशिकतेचा पाया आहे.
रंगसूत्रांमध्ये काही 'दोष' असल्यास एक तर तो जीव गर्भावस्थेत मृत होतो किंवा जगलाच तर सदोष राहतो. 'मोंगोलिझम' हे अशाच एका आजाराचे नाव आहे. या आजारात रंगसूत्रांच्या 21व्या जोडीत नेहमीच्या दोनऐवजी तीन रंगसूत्रे असतात. काही प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगांत विशिष्ट रंगसूत्रे 'आखूड' असतात असे आढळले आहे.
रंगसूत्रे ज्या घटकांनी बनलेली असतात त्यांना 'गुणसूत्रे' असे म्हणतात. गुणसूत्रांची रचना विशिष्ट जैवरसायनांनी बनलेली असते. प्रत्येक रंगसूत्र ही साखळी मानली तर प्रत्येक गुणसूत्र कडी असते. गुणसूत्रे नावाप्रमाणेच विशिष्ट गुणधर्माचे प्रतिनिधित्व करतात.शरीरातील सूक्ष्म तपशील व प्रक्रिया गुणसूत्रांवर अवलंबून असतात. गुणसूत्रांमधील दोष हेही अनेक आजारांना कारणीभूत ठरतात. काही आजार एखाद्या गुणसूत्रावर अवलंबून असतात. काही आजार अनेक गुणसूत्रांवर अवलंबून असतात. (उदा. मधुमेह, रक्तदाब). गुणसूत्रे एका पिढीतून दुस-या पिढीत उतरतात. म्हणून अशा आजारांना आपण'आनुवंशिक' आजार म्हणतो. अनेक आजारांमध्ये आनुवंशिकतेचा भाग कमी अधिक प्रमाणात असतो.
संगणकात आज्ञावली (प्रोग्राम) असतो. तसेच रंगसूत्रे आणि गुणसूत्रे ही जैवरासायनिक आज्ञावली असते. प्रत्येक कामासाठी वेगवेगळी आज्ञावली असते. आता तर बायोटेक्नॉलॉजीमुळे गुणसूत्रांमध्ये बदल करणे शक्य झाले आहे. काही गुणसूत्रे (जीन) बदलणेही शक्य होईल. यापुढे वैद्यक विज्ञानात या तंत्रज्ञानाने मोठी क्रांती संभवते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत...
सुप्रजाजननशास्त्र : (यूजेनिक्स). आपली अपत्ये सुदृढ...