অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

श्वसन, कृत्रिम

श्वसन, कृत्रिम

श्वसन, कृत्रिम

वातावरणातील ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक जिवंत कोशिकेपर्यंत (पेशीपर्यंत) पोहोचविण्यासाठी अनेक प्रक्रियांची एक सुसंबद्ध मालिका सतत कार्यरत असते. श्वास आत घेणे व बाहेर सोडणे हा या मालिकेतील एक महत्त्वाचा घटक असतो. त्यासाठी आवश्यक अशी छातीच्या पिंजऱ्याची व त्याच्या तळाशी असलेल्या स्नायूंच्या पडद्याची हालचाल जेव्हा थांबते वा क्षीण होते तेव्हा ऊतकांमध्ये (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहांमध्ये) ऑक्सिजन-न्यूनता निर्माण होऊ लागते. हृदयाचे स्नायू आणि मेंदूमधील कोशिका अशी अवस्था फार वेळ सहन करू शकत नाहीत. त्यांच्यात अपरिवर्तनीय जैवरासायनिक बदल होऊन त्यामुळे संपूर्ण शरीराला धोका संभवतो. अशा रीतीने ओढवणारा धोका व मृत्यू टाळण्यासाठी कृत्रिम रीत्या श्वसनाची हालचाल घडवून आणणे अत्यंत निकडीचे असते. प्रथमोपचारातील हे एक महत्त्वाचे तंत्र आहे. [⟶ प्रथमोपचार].

श्वसनाच्या प्रत्येक हालचालीबरोबर पर्यावरणातील हवा श्वसनमार्गातून खोलवर फुप्फुसांतील वायुकोशांपर्यंत जाऊन पोहोचते; तेथील अतितलम अशा पटलांतून ऑक्सिजनाचे रेणू आरपार जाऊन रक्तात प्रवेश करतात व कार्बन डाय-ऑक्साइड वायू उलट दिशेने बाहेर येतो. यासाठी हवेत पुरेसा ऑक्सिजन असणे, धुरासारखे इतर प्रदूषक कमीतकमी असणे आणि श्वसनमार्गात द्रव, स्राव, अन्नपदार्थ यांसारखे अडथळे नसणे या गोष्टी आवश्यक असतात; परंतु कृत्रिम श्वसनाची आवश्यकता असणाऱ्या प्रसंगी (उदा., गुदमरणे, पाण्यात बुडणे, आग लागलेल्या ठिकाणी अडकून पडणे किंवा चुकून अन्नपदार्थ श्वासनलिकेत अडकणे) बऱ्याच वेळा याउलट म्हणजे श्वसनाच्या कार्यक्षमतेला मारक परिस्थिती आढळते. वायुकोशांमधून रक्तात पोहोचलेला ऑक्सिजन शरीरभर समाधानकारक प्रमाणात वितरित होण्यासाठी रक्तातील हीमोग्लोबिनाचे प्रमाण आणि गुणवत्ता तसेच रक्ताभिसरणाची सुस्थिती हे घटक महत्त्वाचे ठरतात. रक्तस्राव, कार्बन-मोनॉक्साइड विषाक्तता, हृदयावर घातक परिणाम करणारी द्रव्ये (औषधे) आणि कृत्रिम श्वसनाची मदत पोहोचण्यात झालेला विलंब यांसारख्या कारणांमुळे ऑक्सिजन वितरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. कृत्रिम श्वसनाचा उपचार करताना हे सर्व विरोधी घटक लक्षात घेऊन त्यांच्या निवारणासाठी प्रयत्नही करावे लागतात.

नैसर्गिक श्वसनक्रियेमध्ये दर मिनिटास सु. पंधरा वेळा श्वास घेतला व सोडला जातो. प्रत्येक अंतःश्वसनात पुढील हालचाली समाविष्ट असतात : (१) प्रत्येक बरगडीस तिच्या खालच्या बरगडीला जोडणारा स्नायू आकुंचन पावतो. अशा सर्व स्नायूंच्या एकत्रित आकुंचनामुळे छातीच्या पिंजऱ्याची पुढची बाजू वर उचलली जाते. (२) पिंजऱ्याच्या तळाशी असणारे घुमटाच्या आकाराचे स्नायुमय मध्यपटल आकुंचित होऊन जवळजवळ सपाट होते. ते खाली ओढले गेल्यामुळे उदरपोकळीमधील इंद्रिये खाली ढकलली जातात. (३) या दोन्ही हालचालींमुळे उरोपोकळी मोठी होते. वाढलेली ही जागा भरून काढण्यासाठी फुप्फुसांचे आकारमान वाढते, वायुकोश मोठे होतात व बाहेरील हवा नाक व तोंड यांतून श्वसनमार्गात शिरून फुप्फुसांपर्यंत पोहोचते. या क्रियेस मदत होण्यासाठी श्वासनाल, श्वसनी, श्वसनिका व त्यांच्या शाखोपशाखा विस्फारतात व हवेला होणारा प्रतिरोध कमी करतात. काही कारणांमुळे प्रतिरोध अधिक असून श्वसनास अडथळा होत असेल, तर मानेचे व पाठीचे काही स्नायूदेखील साहाय्यक म्हणून अंतःश्वसनात भाग घेतात. अंतःश्वसन पूर्ण झाल्यावर लगेच सर्व स्नायूंचे आकुंचन थांबून शिथिलीकरण सुरू होते. स्थितिस्थापक गुणधर्मामुळे छातीच्या पिंजऱ्याचे आकारमान पूर्ववत होऊ लागते व फुप्फुसांवर दाब पडून हवा बाहेर ढकलली जाते. कृत्रिम श्वसनामध्ये या सर्व हालचाली स्नायूंच्या आकुंचनाशिवाय कृत्रिम रीत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.

कृत्रिम श्वसनाचा उपचार सुरू करण्यापूर्वी आपद्‌ग्रस्त व्यक्तीला प्रथम मोकळ्या जागेत, स्वच्छ हवेच्या ठिकाणी आणून ठेवले जाते. उंचावरून पडल्यामुळे किंवा मान वेडीवाकडी झालेली दिसल्यास मानेतील मणक्यांना दुखापत असण्याची शक्यता गृहीत धरून उपचार करताना मान शक्यतो हलणार नाही अशी काळजी घ्यावी लागते. त्यामुळे मेंदूच्या खालील लंबमज्जा आणि महत्त्वाच्या तंत्रिका तंतूंना [मज्जातंतूंना; ⟶तंत्रिका तंत्र] अधिक इजा होण्याचा धोका टळतो. नंतर नाडी आणि हृदयाचे ठोके यांची तपासणी करून रक्ताभिसरणाची स्थिती अजमावली जाते. ते बंद असल्यास श्वसनोपचारापूर्वी छातीवर बुक्के मारून, हृदयाच्या ठिकाणी छातीवर दाब देऊन किंवा हृदयाच्या खालील बाजूच्या स्नायूंना चोळून हृदयाची क्रिया सुरू करण्याचा प्रयत्न प्रथम केला जातो. नंतर श्वसनाची स्थिती पाहिली जाते. ते चालू असल्यास शरीरातील ऊब राखून ठेवण्यासाठी पांघरूण घालून इतर उपचारांकडे लक्ष वळविले जाते, श्वसन क्षीण असल्यास किंवा थांबले असल्यास व्यक्तीचा डोक्याकडील भाग किंचित खालच्या पातळीवर येईल अशा पद्धतीने तिला झोपवून छातीमधील पाणी किंवा स्राव यांना बाहेर पडण्यास वाव दिला जातो. श्वसनमार्ग मोकळा व सरळ रेषेत येण्यासाठी हनुवटी वर उचलून डोके मागे झुकविले जाते. तसेच जिभ मागे पडून तिचा अडथळा श्वसनमार्गात होऊ नये म्हणून जिभेचे टोक चिमटीत धरून बाहेर ओढले जाते व मान एका बाजूस वळविली जाते. अनेकदा एवढ्या तयारीनंतर श्वसनमार्ग मोकळा होऊन क्षीण श्वसन पूर्ववत सुरू होते. तसे न झाल्यास व्यक्तीचे तोंड पूर्ण उघडून उपचारक आपली बोटे आत घालून तोंडातील कृत्रिम दात, माती किंवा अन्य कोणताही पदार्थ असल्यास तो बाहेर काढून टाकतो. जठरातून येणारे स्राव अंतर्गत दुखापतीमुळे तयार होणारी रक्ताची गाठ इत्यांदीसाठी व्यक्तीच्या शरीराची ‘डोक्याकडचा भाग खालच्या पातळीवर’ अशी स्थिती तशीच टिकवून कृत्रिम श्वसनाच्या हालचालींना त्वरित प्रारंभ केला जातो. त्या चालू असताना मधूनमधून थांबून श्वसन आणि हृदयक्रिया यांच्यात कितपत सुधारणा होत आहे, याचा अंदाज घेतला जातो.

कृत्रिम श्वसनाच्या अनेक पद्धती आहेत. कोणत्याही पद्धतीचे श्वसन दर मिनिटाला ८ ते १० या गतीने उपचारकाची दमणूक न होता केले जाते. हृदयाचे कार्य चालू आहे तोपर्यंतच शरीराला ऑक्सिजनाचा पुरेसा पुरवठा करून नैसर्गिक श्वसनक्रिया सुरू करून देणे हा मर्यादित उद्देश साधण्याचा प्रयत्न केला जातो. पुढील सर्व उपचार अर्थातच रूग्णालयात किंवा सुसज्ज रूग्णवाहिकेमध्ये केले जातील अशा अपेक्षा असते. त्यामुळे नैसर्गिक श्वसन सुरू होताच व्यक्तीला विश्रांत अवस्थेत-म्हणजेच पुनःप्राप्ति-अवस्थेत-ठेवले जाते. या अवस्थेत तिला एका कुशीवर वळवून आणि डोके शक्य तेवढे मागे झुकवून झोपवितात. श्वसनमार्ग मोकळा राहून स्राव किंवा उलटी झाल्यास तिच्यातील पदार्थ सहजपणे तोंडातून बाहेर येऊ शकतील, अशी व्यवस्था त्यामुळे होते.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate