31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.
आपली जबाबदारी
व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.
लेखक: अनिल आलुरकर
जिल्हा माहिती अधिकारी, बीड
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/29/2020
वैद्यकीय दृष्टिकोनातून व्यसनाधीनतेच्या चार पाय-या ...
निकोटीन हे तंबाखूतले रसायन अत्यंत विषारी आहे. ते ल...
मानसिक आनंद, कैफ, कामवासना वगैरे गोष्टींसाठी अफूचा...
गांजाचा परिणाम मेंदू, चेतातंतू, पचनसंस्था, मूत्रजन...