गांजाप्रमाणे अफू हेही मुळात एक औषध म्हणून उपयुक्त आहे. ते गांजापेक्षा जास्त प्रभावी आहे. अफूची झाडे उत्तर भारतात जास्त आहेत. याच्या बोंडापासून निघालेला चीक सुकल्यानंतर अफू होते. बोंडेपण वापरली जातात, तसेच त्यातले बी (खसखस) खूप वापरले जाते. अफूमध्ये वेदनाशामक आणि तापशामक अशी दोन द्रव्ये असतात. यांतील पहिले द्रव्य(मॉर्फिन) हे अत्यंत उपयुक्त आहे. याने मेंदूवर सुरुवातीस उत्तेजन पण नंतर निद्रा आणणारा परिणाम होतो. एकूण वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. उत्साह,कामवासना, विचारशक्ती इ. वाढतात पण हे सगळे कमी मात्रा दिल्यावर. जास्त मात्रा दिल्यावर श्वसनक्रिया, हृदयक्रिया बंद पडून मृत्यू येण्याचा संभव असतो, कारण यामुळे मुख्य म्हणजे मेंदूचे काम थंडावते.
औषध म्हणून अफू पचनसंस्थेच्या अनेक आजारांवर उपयुक्त आहे. जुलाब उलटी थांबवण्यासाठी त्याचा उपयोग होतो पण आतडयाचे चलनवलन थंडावणे ही त्याच्या कामाची पध्दत आहे, यामुळे दुष्परिणामही होतात. अफूमुळे मलावरोधाचा परिणाम होतो. अफूने कोरडा खोकला कमी होतो. अफू सर्व इंद्रियांमध्ये दाह विरोधी काम करते, त्यामुळे सूज कमी व्हायला मदत होते.
या सगळया कारणांमुळे आणि विशेषतः मानसिक आनंद, कैफ, कामवासना वगैरे गोष्टींसाठी अफूचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. हळूहळू याचे व्यसन लागते. खूप जास्त डोस दिला गेला तर वर सांगितल्याप्रमाणे मृत्यू येऊ शकतो.
लहान मुलांना जास्त रडू नये म्हणून, अफू देऊन शांत केले जाते. मुलांना असे झोपवून काही आईबाप कामावर निघून जातात. या पध्दतीने मूल हळूहळू क्षीण होऊन कुपोषित होते. जास्त मात्रा झाल्यास डोळयांच्या बाहुल्या अगदी बारीक होतात. ही याची मुख्य खूण आहे. याबरोबर रक्ताभिसरण कमी झाल्याने त्वचा, जीभ, ओठ निळसर दिसतात आणि सर्वत्र खाज सुटते.
हे अफूपासूनच बनवलेले अत्यंत मादक द्रव्य आहे. शुध्द स्वरूपात ते पांढरे असते. अफू/गर्द खाल्ली जाते किंवा ओढली जाते. हेरॉईन ओढले जाते किंवा इंजेक्शनवाटे घेतले जाते.
गर्द - हेरॉईनमुळे तीन पाय-यांत परिणाम होतात. आधी त्या व्यक्तीस उत्तेजित वाटते, उल्हास वाटतो, त्याची बडबड वाढते व एकूण अवस्था 'पोचल्याची' असते. व्यसन या अवस्थेसाठीच केले जाते. पुढच्या पायरीत खूप पेंग व झोप येते. या अवस्थेत डोळयांच्या बाहुल्या लहान होतात व त्वचेवर/ओठावर निळसर झाक येते, तसेच त्वचेला जागजागी खाज सुटते. तिस-या पायरीत अगदी गाढ झोप, (उठवून उठत नाही अशी) शरीराचे तपमान उतरून हातपाय थंडगार पडणे, नाडी व श्वसन मंदावणे, इ. परिणाम दिसतात. या पायरीवर मृत्यू येऊ शकतो.
अफूबाधित व्यक्तींना प्रथमोपचार म्हणून मीठ-पाण्याने उलटी करवावी. याने पोटात गेलेली अफू बाहेर पडायला मदत होते. पूर्वी उलटी करण्यासाठी मोरचूद 10 गुंजा पाण्यातून दिली जायची. उलटी नंतर कडक कॉफी प्यायला द्यावी. नॅलॉर्पीन इंजेक्शनने मॉर्फिनचा परिणाम उलटवता येतो.
दीर्घकाळचे अफूचे व्यसन असल्यास हळूहळू भूक मंदावत जाते, अशक्तपणा, वजन कमी होते, कामवासना नष्ट होते, मानसिक गोंधळ व विकृती निर्माण होतात. व्यसन सोडण्यासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. कारण अफू दिली नाही तर होणारा त्रास बराच असतो.
हेरॉईन इंजेक्शनची सवय लागल्यावर इतर अनेक आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात. इंजेक्शनसाठी सिरींज व सुई तीच तीच वापरली जाते व स्वच्छता राहत नाही. यामुळे जंतुदोष होऊ शकतो, एकमेकांच्या सुया वापरल्याने एड्स, कावीळ, इ. रोग पसरतात व भारताच्या आसाम-मणिपूर भागात यामुळे एड्सचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 4/22/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...