आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्लोबल झालेले जग आता कला, शिक्षण, आरोग्य सुविधा अशा कितीतरी क्षेत्रात एक – एक पाऊल पुढे टाकत आहे. या प्रगतीच्या वाटेवर अनेक संकटे मानव जातीवर येत आहेत. यातील काही संकटे आपल्या बुद्धी कौशल्याने मानवाने परतवून लावली आहेत. तर काही आजही मानवासमोर यक्षप्रश्न बनुन उभे आहेत. यातील मानवासमोर आव्हान बनून ठाकलेला प्रश्न म्हणजे एडस् हा आजार आणि त्यावरील उपचार... होय. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राने एडस् प्रसारात शून्य गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
एड्स म्हणजे "अक्वायर्ड इम्यूनो डिफीशियेंसी सिंड्रोम" (एच.आय.व्ही) विषाणूच्या संसर्गामुळे होणारी एक स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते. एड्स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. एच.आय.व्ही रक्तातील रोगप्रतिकारक पेशी लिम्फोसाईट्सवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी, खोकल्यासारखे साधे तसेच क्षयासारखे भयंकर रोग होण्याची शक्यता असते. त्यावर इलाज करणेही अवघड होते. एच.आय.व्ही. संसर्गापासून एड्स होईपर्यंत 8 ते 10 वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एच.आय.व्ही. ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकते.
एड्सच्या संसर्गाची तीन मुख्य कारणे आहेत. यात ‘असुरक्षित लैंगिक संबंधातून’, ‘बाधित रक्तातून’, तसेच ‘बाधित आईकडून अर्भकाला’ आदींचा समावेश आहे. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम आणि यूएनएड्स यांच्यानुसार भारतात 80 से 85 टक्के संसर्ग असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरत आहे. अजूनही एड्सवर इलाज सापडलेला नसल्याने जगभरातील संशोधक त्यावर काम करत आहेत. एड्सवर सध्या कोणतेही औषध वा लस नाही. त्यामुळे एड्सला पूर्णपणे रोखणे सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून ‘प्रतिबंध’ हाच महत्वाचा उपाय ठरतो.
एच.आय.व्ही.चा संसर्ग झाल्यानंतर बहुतेक रोग्यांत बरेच दिवस कोणतेही लक्षण दिसून येत नाही. दीर्घ काळापर्यंत विषाणू वैद्यकीय चाचण्यांमध्येही दिसून येत नाहीत. एड्स झालेल्या अनेक लोकांना विषाणुजन्य ज्वर होतो पण त्यातून एड्सची निष्पत्ती होत नाही. एड्सबाबतची काही लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि भूक कमी होणे, लसिकांची सूज, नागीण, वजन कमी होणे (6 महिन्यात 10 किलोपेक्षा जास्त), वारंवार तोंड येणे, वारंवार जुलाब, वारंवार आजारी पडणे ही सर्व लक्षणे साध्या रोगात दिसून येतात. त्यामुळे वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे संक्रमण निश्चित ओळखता येत नाही.
एडस् टाळण्यासाठी एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळा. लैंगिक संबंधाच्यावेळी निरोधचा वापर करा, असुरक्षित यौनसंबंध टाळा. तुम्हाला एड्स झाला असेल तर तुमच्या साथीदाराला त्याची कल्पना द्या. असुरक्षित संबंध ठेवू नका, त्यामुळे एड्स तुमचा साथीदार किंवा मुलांना होण्याची शक्यता असते. जर तुम्ही एच.आय.व्ही. ने संक्रमित असाल तर रक्तदान करू नका. रक्त चढविण्यापूर्वी ते एच.आय.व्ही.मुक्त आहे याची खात्री करून घ्या. इंजेक्शन घेताना प्रत्येक वेळी नवीन सुईचा वापर करा. या गोष्टींची काळजी घेतल्यास आपण एड्सला प्रतिबंध घालू शकतो.
एड्स प्रतिबंधासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेने 2011 ते 2015 या काळासाठी विशेष रणनीती आखली आहे. याअंतर्गत लैंगिक संबंधाद्वारे होणारा एच.आय.व्ही.प्रसार, एड्स संबंधातील माता मृत्यूचे प्रमाण, टी.बी.ने होणारे मृत्यू निम्म्यावर आणणे तसेच अंमली पदार्थ सेवनातून होणारे एच.आय.व्ही. प्रसारास प्रतिबंध करणे, एच.आय.व्हीसह जगणाऱ्या आणि उपचाराच्या माध्यमातून बरे होऊ शकणाऱ्या लोकांना एन्टीरेट्रोव्हायरल थेरेपी उपलब्ध करुन देणे या व इतर उद्देश साध्य करुन एड्सचा प्रसार थांबविण्याचे लक्ष संयुक्त राष्ट्र संघाने ठेवलेले आहे.
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर एड्स प्रतिबंधाचा शून्य गाठण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न होत असताना आपण देखील सहभाग नोंदवायला हवा. एड्सचा प्रसार होणार नाही याची काळजी घेतानाच एड्ससह जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत भेदभाव टाळणे. एड्सच्या प्रसाराबाबत इतरांमध्ये जनजागृती केल्यास तो प्रयत्नदेखील एड्स प्रतिबंधातील योगदान ठरणार आहे. अशा छोट्या योगदानातूनच एड्स प्रसाराचा शून्य गाठणे शक्य होणार आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी
माहिती स्रोत: महान्यूज,सोमवार, ०१ डिसेंबर, २०१४.
अंतिम सुधारित : 10/7/2020
हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो.