অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंत्र (Intestine )

आंत्र (Intestine )

आंत्र (Intestine )

मानवी पचनसंस्था

जठराच्या निर्गमद्वारापासून गुदद्वारापर्यंतच्या भागाला आंत्र (आतडे) असे म्हणतात. अन्नपचनमार्गातील हा सर्वात लांब भाग आहे. आतड्याचे लहान आतडे (लघ्वांत्र) व मोठे आतडे (बृहदांत्र) असे दोन भाग असतात.

लहान आतड्याची लांबी सु. ६ मी. असते व ते पोटाच्या पोकळीत मध्यभागी वेटोळे करून असते. या पोकळ नळीचा व्यास सुरूवातीस सु. ५ सेंमी. असून तो कमी होत शेवटी ३.५ सेंमी. होतो. लहान आतड्याचे (१) आद्यांत्र, (२) मध्यांत्र व (३) शेषांत्र असे तीन भाग आहेत.

आद्यांत्र या लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाची लांबी सु. २५ सेंमी. असते. याचा आकार इंग्रजी सी (C) अक्षरासारखा असून ते स्वादुपिंडाभोवती असते. पित्ताशय व स्वादुपिंडातील स्राव त्यांच्या नलिकांद्वारे आद्यांत्रात सोडले जातात. मध्यांत्र या मधल्या भागाची लांबी सु. २.५० मी. असते. शेषांत्र हा शेवटचा भाग सु. ३.२५ मी. लांब असतो.

लहान आतड्याची संरचना चार स्तरांची असते. याचा सर्वांत आतला स्तर म्हणजे श्लेष्मपटल. या स्तरात पाचकरस स्रवणार्‍या ग्रंथी आपला स्राव सोडतात. श्लेष्मपटलाच्या वर्तुळाकार घड्या असून त्यात बोटासारखे उंचवटे असतात. यानंतरच्या स्तरात पाचक स्राव निर्माण करणार्‍या ग्रंथी तसेच अन्नघटक शोषणार्‍या पेशी असतात. या स्तरातील पेशी दर ३-५ दिवसांनी नव्याने निर्माण होत असतात. नंतरचा स्नायुस्तर हा क्रमसंकोची स्नायूंचा असतो. या स्नायूंच्या एकामागोमाग एक होणार्‍या पद्धतशीर आकुंचनामुळे अन्न पुढे ढकलले जाते. स्नायुस्तराच्या बाहेर संरक्षणात्मक कार्य करणारा बाह्यस्तर असतो.

लहान आतड्यात छोटे छोटे असे अनेक लसिकापेशीसमूह असतात. एकेका समूहात २०-३० लसिका ग्रंथी असतात. यांना पेअर क्षेत्रे (पेअर्स पॅचेस) असे म्हणतात. आतड्यातून होणार्‍या जीवाणुसंसर्गाचा प्रतिकार करणे हे या ग्रंथीचे मुख्य कार्य आहे.

अन्नाचे पचन व अन्नघटकांचे शोषण हे लहान आतड्याचे मुख्य कार्य होय. या ग्रंथीत निर्माण होणारे स्राव जठराकडून आलेल्या अन्नाबरोबर मिसळतात. स्रावातील विकरांमार्फत (एंझाइमांमार्फत) वेगवेगळ्या अन्नघटकांचे त्यांच्या मूल घटकांमध्ये रूपांतर होते व या मूल घटकांचे लहान आतड्यातील पेशींमार्फत शोषण होते.

लहान आतड्यातील स्रावांमुळे प्रथिनांचे विघटन अ‍ॅमिनो आम्लांत, कर्बोदकांचे साध्या शर्करेत (ग्लुकोज) व मेद घटकांचे मेदाम्लांत रूपांतर होते. दिवसभरात साधारणपणे दीड लीटर स्राव लहान आतडे, यकृत व स्वादुपिंड यांमध्ये तयार होऊन तो लहान आतड्यात अन्नपचनासाठी सोडला जातो.

आतड्याचा दुसरा भाग म्हणजे मोठे आतडे. मोठे आतडे १.५ मी. लांब असते  आणि  लहान आतड्याचा वेटोळ्यांभोवती कडीसारखे वसलेले असते. त्याची लांबी लहान आतड्यापेक्षा कमी असली तरी रूंदी बरीच जास्त असते. त्यामुळे पोकळीही मोठी असते. मोठ्या आतड्याचे पुढील सात भाग आहेत: (१) उंडुक (सु. ७.५ सेंमी.), (२) आरोही बृहदांत्र (सु. १५ सेंमी.), (३) अनुप्रस्थ बृहदांत्र (सु. ५० सेंमी.), (४) अवरोही बृहदांत्र (सु. २५ सेंमी.), (५) श्रोणीय बृहदांत्र (सु. ४० सेंमी.), (६) मलाशय (गुदांत्र; सु. १२ सेंमी.) व (७) गुदमार्ग
(३-४ सेंमी.).

शेषांत्र आणि बृहदांत्र यांना जोडणार्‍या अंधांत्र या भागात असलेली झडप लहान आतड्यातून आलेल्या अन्नाला परत जाण्यापासून रोखते. अंधांत्राचाच आंत्रपुच्छ हा भाग असतो. मानवाच्या शरीरात अंधांत्र अगदी लहान असते. अंधांत्र आणि आंत्रपुच्छ दोन्ही मानवाला उपयोगी नसतात. घोडा, गाय यांसारख्या तृणभक्षक प्राण्यांमध्ये अंधांत्र मोठे असते. कठीण, तंतुमय पदार्थांच्या पचनासाठी या प्राण्यांना त्याचा उपयोग होतो. या भागात मोठ्या संख्येने असलेले जीवाणू या पदार्थांचे पचन घडवून आणतात. लहान व मोठे आतडे यांभोवती दुपदरी उदराच्छादन असते. आतड्यांना रक्तपुरवठा करणार्‍या रोहिणी व नीला तसेच मज्जातंतू या दुपदरी उदराच्छादनात असतात.

जवळजवळ संपूर्ण पचन होऊन ज्यातील अन्नघटकांचे शोषण झालेले आहे असा अन्नाचा उर्वरित भाग बृहदांत्रात येतो. त्यातील पाणी व क्षार यांचे शोषण होते आणि मल तयार होतो. विसर्जनापूर्वी मल तात्पुरता मलाशयात साठविला जातो. जलशोषण, क्षारशोषण आणि मलनिर्माण ही मोठ्या आतड्याची मुख्य कार्ये आहेत. मोठ्या आतड्यात वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य जीवाणू असतात. त्यांचा के-जीवनसत्त्व आणि  जीवनसत्वातील फॉलिक आम्ल बनविण्यात मोठा उपयोग होतो. हे जीवाणू ज्याच्या शरीरात असतात त्याला ते अपायकारक नसतात.

बृहदांत्रातून खूप वेगाने टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले गेल्यास शरीरात पाणी योग्य प्रमाणात शोषले जात नाही आणि परिणामी अतिसार होतो. याकडे लक्ष न  दिल्यास  अतिसारामुळे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) होते. विशेषतः बालकांमध्ये क्षारांचे प्रमाण कमी झाल्यास अशी परिस्थिती प्राणघातक ठरू शकते. याउलट मोठ्या आतड्यात अन्नपदार्थ हळूहळू पुढे सरकल्यास, पाणी जास्त प्रमाणात शोषले जाते आणि बद्धकोष्ठता होते. सामान्यपणे, मलाशयात असलेल्या संवेदी चेताग्राही उद्दीपित झाल्यामुळे मलविसर्जनाची क्रिया सुरू होते. चेताग्राही गुंतागुंतीच्या प्रतिक्षिप्त क्रिया घडवून आणतात. यामुळे, मलाशय आणि गुदद्वार यांना जोडणारे संकोचक (स्पिंक्टर) स्नायू शिथिल होतात आणि मलविसर्जन होते.

कुलकर्णी, माधुरी आंत्रज्वर : पहा विषमज्वर.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate