जठर, लघ्वांत्र (लहान आतडे) व बृहदांत्र (मोठे आतडे) मिळून बनलेल्या अन्नमार्गाला जठरांत्र मार्ग म्हणतात. हा मार्ग व त्याचे विकार यांचा अभ्यास वैद्यकाच्या ज्या शाखेत केला जातो, तिला जठरांत्रविज्ञान म्हणतात. या मार्गावरील काही विशिष्ट भागांना स्वतंत्र नावे देण्यात आलेली असली, तरी तोंडापासून गुदद्वारापर्यंत असणाऱ्या सलग अशा पचन तंत्राचेच ते भाग आहेत. उदा., लघ्वांत्राच्या भागांना ग्रहणी, रित्कांत्र व शेषांत्र म्हणतात, तर बृहदांत्राच्या भागांना उंडुक, आरोही बृहदांत्र, अनुप्रस्थ बृहदांत्र, अवरोही बृहदांत्र, श्रोणीय वा अवग्रहाकृती बृहदांत्र, गुदांत्र व गुदमार्ग अशी नावे दिलेली आहेत [ आंत्र . अन्नाचे पचन, शोषण व त्यातील निरुपयोगी पदार्थांचे उत्सर्जन ही महत्त्वाची कार्ये जठरांत्र मार्गात चालतात. त्यासाठी या मार्गाची रचना विशिष्ट प्रकारची असून त्याच्या कार्याला साहाय्य करणारी यकृत, अग्निपिंड इ. अनेक इंद्रिये आहेत. जठरांत्र मार्गाच्या तपासणीकरिता बेरियम सल्फेटमिश्रित अन्न देऊन केलेल्या क्ष-किरण परीक्षेचा तसेच जठर परीक्षक, अवग्रहाकृती बृहदांत्र परीक्षक, गुदांत्र परीक्षक, पर्युदर परीक्षक (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पडद्यासारख्या आवरणाचा परीक्षक) इ. उपकरणांचा फार उपयोग होतो.
जठरांत्र मार्गाचे विकार
जठरांत्र मार्गात अनेकविध विकार संभवतात. या विकारांची विविध कारणे असून त्यांपैकी कित्येक विकारांची कारणे अजून अज्ञात आहेत. जठरांत्र मार्गाच्या विकारांपैकी काही विकारांची वर्णने इतरत्र आलेली आहेत [ → अंकुशकृमि रोग; अतिसार; आमांश; जंत; पट्टकृमि; मलावरोध; संग्रहणी वगैरे]. या मार्गातील महत्त्वाच्या आणि नेहमी आढळणाऱ्या इतर विकारांचेच त्रोटक वर्णन येथे केले आहे.
जठरांत्र मार्गाच्या विकारांत दिसणारी महत्त्वाची लक्षणे म्हणजे मळमळ, ओकारी, वेदना, मलावरोध, अतिसार वगैरे असून ती निरनिराळ्या रोगांत कमीअधिक प्रमाणात दिसतात. ज्वर, अशक्तपणा, पांडुरोग (अॅनिमिया) वगैरे लक्षणेही चिरकारी (दीर्घकालीन) विकारांत दिसतात.
या विकारांचे वर्णन विभागशः खाली दिलेले आहे.
जठरशोथ
(जठराची दाहयुक्त सूज). हा तीव्र व चिरकारी अशा दोन प्रकारांचा असू शकतो.
तीव्र जठरशोथ
हा प्रकार काही क्षोभक पदार्थ पोटात गेल्याने होतो. अपघाती किंवा स्वेच्छेने (आत्महत्येसाठी) घेतलेली तीव्र अम्ले वा क्षार (अल्कली), दूषित अथवा कदान्न, अत्यशन (अतिशय खाणे), मद्यपान वगैरे कारणांनी तीव्र जठरशोथ हा विकार होतो. या क्षोभक पदार्थांमुळे जठराच्या श्लेष्मकलेला (आतील पृष्ठभागावरील बुळबुळीत थराला) शोथ येऊन ते आवरण फुगलेले, लाल रंगाचे आणि जाड होते. त्यातील ग्रंथींचे कार्य बंद पडते.
तीव्र जठरशोथाची मुख्य लक्षणे म्हणजे उलट्या आणि वेदना ही होत. क्षोमक पदार्थ खाली आतड्यात उतरल्यास अतिसार होतो. अन्नद्वेष विशेष प्रमाणात असतो, परंतु सारखी तहान लागत राहते. क्षोमक पदार्थ उलटीवाटे पडून गेल्यानंतर आराम वाटू लागतो. तीव्र जठरशोथात बहुधा औषधांची जरूरी लागत नाही. पूर्ण विश्रांती देऊन जरूर तर क्षोभक पदार्थ बाहेर पडण्यासाठी उलटी होण्याकरिता गरम पाण्यातून मीठ अथवा सोडा देतात. पोटात पाण्याशिवाय दुसरे काही देत नाहीत. रोग्याला बरे वाटावयाला लागून जसजशी भूक वाढू लागेल तसतसे चहा, दूध, भात वगैरे पदार्थ हळूहळू वाढत्या प्रमाणात देऊन ४–६ दिवसांत नेहमीचा आहार देता येईल, अशी परिस्थिती येते.
चिरकारी जठरशोथ
तीव्र जठरशोथ वारंवार होत गेल्यास त्याचेच स्वरूप चिरकारी जठरशोथ असे होते. विशेषतः मदात्ययामध्ये (अतिशय मद्य पिण्यामुळे निर्माण होणाऱ्या अवस्थेमध्ये) हा प्रकार दिसतो. दंतरोगामध्ये (पायोरिया) हिरड्यांतील पू जठरात जात राहिल्यामुळे जठरातील श्लेष्मकलेला चिरकारी शोथ येतो असे मानतात. काही कारणांनी जठरनिर्गमद्वारामध्ये रोध उत्पन्न झाल्यास अन्न जठरामध्ये अधिक
काळपर्यंत साठून राहते. त्या अन्नामध्ये रासायनिक विक्रिया झाल्यामुळे अपायकारक आणि क्षोभक द्रव्ये तयार होतात, त्यांमुळेही चिरकारी जठरशोथ होतो. असा रोध निर्गमद्वाराजवळ कर्करोग अथवा पचनज व्रण (अम्लीय पाचक स्रावांमुळे झालेली जखम) झाल्यास होतो. जठरात अथवा ग्रहणीच्या पहिल्या भागात झालेला पचनज व्रण भरून येताना त्या ठिकाणी तंत्वात्मक ऊतक (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींचा समूह) उत्पन्न होते. त्या तंतूंची आकसण्याची प्रवृत्ती असल्यामुळे निर्गमद्वार संकुचित होऊन रोध उत्पन्न होतो. असा रोध झाला म्हणजे द्वारातून अन्न खाली आतड्यात उतरत नाही. त्यामुळे जठरविस्तार व चिरकारी जठरशोथ होतो. जठरशोथाची सर्वच कारणे अजून ज्ञात नाहीत.
चिरकारी जठरशोथात जठरश्लेष्मकला प्रथम लाल, सुजल्यासारखी जाड, अतिपुष्ट अशी दिसते. पुढे त्या आवरणाची अपपुष्टी होऊन ते अगदी पातळ, पांढुरक्या रंगाचे दिसते. प्राकृतावस्थेतील (सर्वसाधारण अवस्थेतील) त्या आवरणावरील सुरकुत्या नाहीशा होतात.
सुरुवातीस विशेष लक्षात येण्यासारखी लक्षणे नसतात. जेवणानंतर पोटात जडत्व, फुगवटी, ढेकरा येणे आणि अस्वस्थपणा एवढीच लक्षणे दिसतात. उलटी होऊन गेल्यानंतर रोग्याला तात्पुरते हलके वाटते. क्षुधामांद्य, सकाळच्या वेळी मळमळ आणि ओकारी ही मदात्ययामुळे होणाऱ्या चिरकारी जठरशोथाची विशेष लक्षणे दिसतात. बहुदा मलावरोध असतो.
चिरकारी जठरशोथ-चिकित्सेत प्रथम शक्यतर मूळ कारण शोधून काढून ते नाहीसे करणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मद्यपान, दंतरोग वगैरे कारणे नाहीशी करण्याचा प्रयत्न अगत्याचे आहे.जठरनिर्गमद्वार व्रणामुळे संकुचित झाले असल्यास शस्त्रक्रिया करून जठराचा रिक्तांत्राशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करावा लागतो. जठरनलिकेच्या साहाय्याने जठर सोड्याच्या पाण्याने दिवसातून एकदा धुतल्यास आराम वाटतो.
जठरव्रण
जठरव्रण हा पचनज व्रणाचा एक प्रकार आहे. या विकारात जठरात हायड्रोक्लोरिक अम्लाचे आधिक्य असते [ ⟶ पचनज व्रण].
जठर-कर्करोग
जठर-कर्करोग ४० वर्षांच्या पुढील वयातील पुरुषांत अधिक प्रमाणात दिसतो. त्याचे मूळ कारण अज्ञात असले, तरी पचनज व्रण आणि चिरकारी जठरशोथानंतर त्याचे प्रमाण अधिक दिसते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश