मुख-पोकळी दोन भागांत विभागलेली असते : (१) ओठ व गालांचा आतील पृष्ठभाग पुढे व त्यास लागून मागे असलेल्या दात व हिरड्यांच्या कमानी यांमधील विभागाला 'मुख-कोटर' म्हणतात; (२) दात व हिरड्यांच्या कमानीमागे असेलेला मुख्य मुख-पोकळी भाग. गाल फुगवले असता मुख-कोटराचे आकारमान वाढते. तोंड धुताना खळखळून चुळा टाकताना पाणी प्रामुख्याने मुख-कोटरातच असते. वरच्या आणि खालच्या ओठांमधील फटीला मुखरंध्र म्हणतात व ते बाह्य वातावरणात उघडते. मुख-पोकळीची मागची बाजू घशात मुख-ग्रसनी सेतूद्वारे [⟶ ग्रसनी] उघडते. मुख्य पोकळीचे छत कठीण व मृदू तालूचे बनते आणि तळभाग प्रामुख्याने जिभेमुळे बनतो. दोन्ही ओठांच्या आतील भागी मध्यरेषेवर श्लेष्मकलेचे उभे बंध असतात, त्यांना ओष्ठबंध म्हणतात.
जीभ, दात, लाला ग्रंथी हे शरीरभाग मुख-पोकळीशी निकट संबंधित आहेत व त्या सर्वांवर विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. मुख-पोकळीचा तळभाग पूर्णपणे मऊ ऊतकाचा (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहाचा) बनलेला असून त्याचा बहुतांश भाग जिभेने व्यापलेला असतो. संपूर्ण मुख-पोकळी (दोन्ही भाग) श्लेष्मकलाच्छादित असते. ओठांच्या कडांवर ही श्लेष्मकला चेहऱ्यावरील त्वचेशी सलग होते. मुख्य पोकळी अंशत; श्लेष्मकलेमुळे व अधिकांश लाळेमुळे ओलसर ठेवली जाते.
मुखाच्या भ्रूणविज्ञानाविषयी माहिती 'पचन तंत्र' या नोंदीत दिली आहे.
मुख हा पचन तंत्राचा (पचन संस्थेचा) सुरुवातीचा भाग असल्यामुळे बाह्य वातावरणातील अन्नपदार्थ प्रथम तेथे शरीरात प्रवेश करतात. कधीकधी नाकाऐवजी श्वासोच्छ्वासातील हवा तोंडावाटे आत-बाहेर टाकली जाते. या कारणामुळे सुक्ष्मजंतूंच्या संसर्गाविरुद्ध काही नैसर्गिक योजना असूनही मुखाला संसर्गजन्य रोगांचा सतत धोका असतो. काही प्रमुख मुखरोगांची माहिती खाली दिली आहे.
परिसर्प व्हायरस प्रकार-१ चा साधा संसर्ग अथवा परिसर्प साधा संसर्ग : बालवयात दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी विशिष्ट व्हायरस संसर्गामुळे उद्भवणाऱ्या या तीव्र रोगात तोंड व घसा लाल होणे, हिरड्या सुजणे, श्लेष्मकलेवर फोड येणे व व्रण तयार होणे आणि ताप येणे ही लक्षणे उद्भवतात. सर्वसाधारण भाषेत याला 'तोंड येणे ' असे म्हणतात. निद्रानाश, अस्वस्थता व क्षुधानाश अर्भकात त्रासदायी असतात. अंथरुणात झोपवून विश्रांती, मऊ अन्नपदार्थाचे सेवन व द्रव पदार्थांचा भरपूर पुरवठा यांवर विशेष भर देतात. झोपेकरिता योग्य शामके व श्लेष्मकलेवर लावण्याकरिता प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार देतात. सर्वसाधारणपणे ७ ते १४ दिवसांत रोग बरा होतो.
व्हिन्सेंट हिरडीशोथ अथवा तीव्र व्रणोत्पादक हिरडीशोथ : (जे. एच्. व्हिन्सेंट या फ्रेंच वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारा व हिरडीला दाहयुक्त सूज येणारा रोग). हा रोग सूक्ष्मजंतुजन्य असल्याचे सर्वंमान्य असले, तरी कारणीभूत असलेल्या सूक्ष्मजंतूच्या प्रकाराबद्दल एकमत नाही. बहुधा काही सूक्ष्मजंतूंची अंतर्विषे यास कारणीभूत असावीत. सूक्ष्मजंतूंशिवाय तोंडातील काही स्थानिक दोष रोगोत्पादनास मदत करतात. उदा., मुखाची अस्वच्छता, दातावरील सूक्ष्मजंतुजन्य पापुद्रे सर्वसाधारण रोगप्रतिकारशक्ती कमजोर होणे वगैरे. बहुतकरून तंबाखू ओढणाऱ्या तरुणांत वेदनामय हिरड्यांतून रक्तस्त्राव होणे व तोंडास विशिष्ट दुर्गंधी येणे या लक्षणांनी रोगाची सुरुवात होते. मानेतील संबंधीत ⇨ लसीका ग्रंथीची वाढ व शरीराचे तापमान ३९° से. पर्यंत वाढणे ही लक्षणे उद्भवतात. रोग्यास अतिशय अस्वस्थता व अशक्तता जाणवते. तीव्र रोग बरा झाल्यानंतर तोंडाच्या आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास रोग पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. चिरकारी (दीर्घकालीन) प्रकार झाल्यास कायम मुख दुर्गंधी व हिरड्यांतील रक्तस्त्राव त्रासदायी असतात. या कारणामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला व उपचार करणे फायद्याचे असते.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
अन्नमार्गाचा जो भाग नासागुहा (नाकातील पोकळी). मुख ...
अन्नपचनाचे कार्य करणारी प्राण्यांतील संस्था.आदिजीव...