नाकाच्या पश्चभागी व मृदुतालूच्या (तोंडातील छताच्या मऊ भागाच्या) वर असलेल्या ग्रसनी भागास नासा-ग्रसनी म्हणतात. हा भाग नेहमी उघडा असतो कारण त्याच्या मृदुतालूशिवाय इतर भित्ती अचर (न हलणाऱ्या) असतात. दोन पश्च नासाछिद्रे याच भागात असतात. प्रत्येक छिद्र २५ मिमी. X १२·५ मिमी. आकाराचे असते. नासापटालाचा (नाकाची पोकळी विभागणाऱ्या उभ्या पडद्याचा) पश्च भाग दोन्हींच्या मधे असतो. नासा-ग्रसनी विभागात काही ठिकाणी लसीकाभ ऊतकाचे (विशिष्ट पांढऱ्या पेशींचा समूह असलेल्या जाळीदार ऊतकाचे) गोळे बनलेले असतात, त्यांना ग्रसनी-गिलायू (टॉन्सिल), नलिका-गिलायू व नासा-गिलायू अशी नावे असून या सर्वाना मिळून व्हाल्डियर यांचे (व्हाल्डियर या शास्त्रज्ञांच्या नावावरून) वलय म्हणतात. हे वलय सूक्ष्मजंतू संक्रामणापासून संरक्षण देण्याचे कार्य करते.
मृदुतालूच्या खालपासून अधिस्वरद्वाराच्या (स्वरयंत्राच्या प्रवेशमार्वरील झाकणासारख्या संरचनेच्या) वरच्या कडेपर्यंतच्या ग्रसनी भागास मुख-ग्रसनी म्हणतात. मुख आणि ग्रसनी यांमध्ये असलेला हा अरुंद भाग (सेतुमार्ग) जिव्हेच्या पश्चभागी असतो. त्याच्या दोन्ही बाजूंस दोन वल्या (घड्या) असतात. त्यांपैकी पुढील वलीस तालू–जिव्हा वली व मागील वलीस तालु–ग्रसनी वली म्हणतात. दोन्ही वल्यांच्या मध्ये जिव्हेच्या कडेजवळ जी त्रिकोणाकृती पोकळी असते तिला गिलायु-गुहा म्हणतात. जिवंत माणसाचा मुख-ग्रसनी भाग व गिलायु-गुहेतील गिलायु सुजलेल्या असतात त्याही संपूर्ण दिसतात.
अधिस्वरद्वाराच्या वरील कडेपासून मुद्रिका उपास्थीच्या (श्वासनालाच्या वर असलेल्या अंगठीच्या आकाराच्या मजबूत व लवचिक कूर्चेच्या) खालच्या कडेपर्यंतच्या ग्रसनी भागास स्वरयंत्र ग्रसनी म्हणतात. हा भाग स्वरयंत्राच्या पश्चभागी व अवतीभोवती असतो. त्याच्या अग्रभित्तीत वरून खाली अनुक्रमे स्वरयंत्र प्रवेशिका, कुंभ उपास्थींचा (स्वरयंत्रामागे असलेल्या दोन कूर्चाचा) पश्चभाग आणि मुद्रिका उपास्थी असतात. कुंभ-स्वरद्वार वलीच्या पार्श्व बाजूस असलेल्या लहान गुहेसारख्या ग्रसनी भागास पलांडुरूप (कांद्याच्या आकारासारखी) गुहा म्हणतात. या गुहेच्या श्लेष्मकला अस्तराखालून (बुळबुळीत पातळ पटलाखालून) अंतस्थ स्वरयंत्र तंत्रिका (मज्जा) जाते. गुहेत अडकलेला एखादा बाह्यापदार्थ काढताना या तंत्रिकेस इजा न होण्याची काळजी घ्यावी लागते. स्वरयंत्र ग्रसनीच्या पश्चभागी मानेतील तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा हे कशेरुक असतात.
(१) बाह्य किंवा स्नायु- थर : रेखांकित (पट्टे असलेल्या) स्नायूंचा हा थर असून ते स्नायू ऐच्छिक असतात.
(२) मध्य किंवा तंतुमय थर : बाहेरील स्नायु–थर व आतील श्लेष्मकला थर या दोहोंमध्ये तंतुमय थर असतो. हा थर करोटीच्या तळाजवळ जाड असतो व त्या ठिकाणी स्नायु-थर अपुरा असतो. तंतुमय थराच्या या भागाला ‘ग्रसनी करोटिस्तल प्रावरणी ’ म्हणतात. त्याचा वरचा भाग करोटीच्या पश्च कपालास्थीला (कानशिलाच्या हाडांना) व शंखास्थीला (मध्य व अंतर्कर्ण ज्यात आहेत असे करोटीच्या तळाचे हाड) जोडलेला असतो. वरून खाली हा थर विरळ होत जातो. मागच्या बाजूस मध्य रेषेत त्याचा जो उभा व जाड भाग असतो तो ‘ग्रसनी संधिरेखा ’ म्हणून ओळखला जातो व त्या ठिकाणी ग्रसनीचे समाकर्षणी स्नायू (वरचा, मधला व खालचा असे प्रत्येक बाजूस असणारे व ग्रसनीच्या आकुंचनाच्या वेळी कार्यान्वित होणारे स्नायू) जोडलेले असतात.
(३) अंतःस्तर किंवा श्लेष्मकला थर : ग्रसनीची श्लेष्मकला ही संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकाचा जाड थर, स्थितिस्थापक ऊतकाची जाळी व उपकला (अस्तरासारखे पातळ पटल) मिळून बनलेली असते. ती मुख, नासा गुहा, कर्ण-ग्रसनी नलिका आणि स्वरयंत्र यांच्या श्लेष्मकलेशी सलग असते. नासा-ग्रसनीतील उपकला स्तंभाकार लोमश (केस असलेल्या) पेशींची बनलेली असते. मुख-ग्रसनी व स्वरयंत्र-ग्रसनीतील उपकला बहुस्तरीय शल्की (खवलेदार) पेंशींची बनलेली असते. ग्रसनीच्या वरच्या भागात व कर्ण-ग्रसनी नलिकेच्या छिद्राजवळ श्लेष्मग्रंथी भरपूर असल्यामुळे श्लेष्मकलेचा नासा-ग्रसनीतील भाग नेहमी ओलसर राहतो.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/19/2020
पचनमार्गाच्या सुरुवातीच्या शरीरभागास 'मुख' म्हणतात...
अन्नपचनाचे कार्य करणारी प्राण्यांतील संस्था.आदिजीव...
श्वसनमार्गाच्या प्रारंभी व घसा संपल्यानंतर सुरू हो...