অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

छाती

छातीची पोकळी

मान व उदर यांच्या मधील धडाच्या भागास छाती म्हणतात. सस्तन प्राणी, पक्षी व सुसर वगैरे सरपटणाऱ्या प्राण्यांमध्येच उदर व छाती असे निरनिराळे शरीर भाग असतात. सस्तन प्राण्यात उदर पोकळी आणि छातीची पोकळी यांच्यामध्ये एक स्नायूचा पडदा असतो, त्याला मध्यपटल म्हणतात. काही पृष्ठवंशीय (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांमध्ये मध्यपटल नसते. उदा., बेडूक. छाती हा अस्थींचा बनलेला पिंजरा असून तिच्या पोकळीत श्वसनाची व रक्तपरिवहनाची महत्त्वाची इंद्रिये सुरक्षित असतात. कीटकांच्या शरीरातील तीन मुख्य भागांपैकी मधला भाग छातीचा असतो. त्याचे परत अग्र, मध्य व पश्च असे तीन उपविभाग होतात कीटक]. कवचधारी (क्रस्टेशियन) प्राण्यांत डोके व छातीचा पहिला भाग जोडलेला असतो.

छाती गोपुराकार असून वर निमुळती आणि खाली पसरट असते. आडव्या छेदात ती लंबगोलाकार असते. माणसात ती पुढून मागे दबलेली असते, तर इतर सस्तन प्राण्यांत ती दोन्ही बाजूनी दबलेली असते. छातीच्या वरच्या तोंडाला प्रवेशमार्ग म्हणतात व त्यातून श्वासनाल (फुफ्फुसांत हवा नेणारा मुख्य मार्ग), ग्रसिका (घशापासून उदरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग), नीला व तंत्रिका (मज्जा) छातीत प्रवेश करतात. मानवाच्या बाबतीत या प्रवेशमार्गाचा अग्रपश्च व्यास सु. पाच सेंमी व पार्श्व (बाजूचा) व्यास दहा सेंमी. असतो. यापुढील वर्णन फक्त मानवाच्या छातीसंबंधीचे दिले आहे. खालच्या तोंडाला निर्गममार्ग म्हणतात व तो मध्यपटलाने बंद केलेला असतो. मध्य़पटलातील छिद्रामधून ग्रसिका, महारोहिणी, तंत्रिका वगैरे छातीतून उदरात प्रवेश करतात, तर महानीला व लसीका महावाहिनी छातीत जातात.

छातीचा पिंजरा

छातीच्या भित्ती त्वचा, स्नायू, अस्थी व प्रावरणी (तंतुमय ऊतकाचा म्हणजे समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाचा पातळ थर) मिळून बनल्या आहेत. पुढची भित्ती मागच्या भित्तीपेक्षा आखूड असते. छातीतील अस्थींच्या विशिष्ट रचनेमुळे बनलेल्या कंकाल तंत्रास (हाडांच्या संरचनेस) छातीचा पिंजरा म्हणतात. या पिंजऱ्याचा मागील व मध्य भाग कशेरुक दंडाचा (पाठीच्या कण्यातील हाडांचा) आणि पुढील व मध्य भाग उरोस्थी (छातीच्या मध्यावरचे चपटे हाड) आणि उपास्थींचा (कूर्चांचा) बनलेला असतो. दोन्ही बाजूंस चक्राकार बरगड्या (फासळ्या) असतात व त्या पुढच्या बाजूला उरोस्थीला जोडलेल्या असतात. प्रत्येक बाजूस बारा बरगड्या असून त्यांपैकी खालच्या दोन, अकरावी व बारावी, लोंबत्या असतात. स्त्रियांमध्ये छाती लहान असून त्यांची उरोस्थी आखूड असते आणि वरच्या बरगड्या अधिक चलनक्षम असतात.

आ. १. छातीचा पिंजरा : (१) पृष्ठवंश, (२) उरोस्थी, (३) बरगड्या, (४) बाराव्या बरगड्या.
भित्तीतील स्नायूंपैकी प्रत्येक बाजूस वरची आणि खालची बरगडी जोडणारे स्नायू असतात. त्यांना आंतरापर्शुकी (दोन बरगड्यांमधील) स्नायू म्हणतात. यांशिवाय आणखी काही स्नायूही असतात. मध्यपटल आणि हे सर्व स्नायू यांच्या आकुंचन-प्रसरणाने छातीच्या पोकळीचे घनफळ कमीजास्त होते. फुफ्फुसांतील निरुपयोगी हवा बाहेर पडताच (उच्छ्‌वास) ते कमी होते आणि बाहेरील हवा फुफ्फुसांत शिरताच (अंतःश्वसन) ते वाढते. छातीच्या पोकळीच्या दोन बाजूंस दोन विस्तीर्ण आणि खोल भाग असून उजव्या बाजूस उजवे फुफ्फुस व डाव्या बाजूस डावे फुफ्फुस असते. प्रत्येक फुफ्फुसावरील ऊतकाच्या अतिपातळ आवरणाला परिफुफ्फुस म्हणतात. परिफुफ्फुसाचा भित्तीकडील भाग भित्तिक परिफुफ्फुस आणि फुफ्फुसाला चिकटलेला भाग इंद्रियिक परिफुफ्फुस म्हणून ओळखला जातो. दोन्ही भाग ओलसर रहात असल्यामुळे श्वसनक्रियेच्या वेळी त्यांच्यात घर्षण होत नाही. दोन्ही बाजूंच्या परिफुफ्फुसांमधील पोकळ जागेला मध्यावकाश म्हणतात. मध्यावकाशाचे ऊर्ध्व आणि अधो (वरचा व खालचा) असे भाग कल्पिले असून अधोमध्यावकाशाचे पुढचा, मधला आणि मागचा असे आणखी तीन विभाग कल्पिले आहेत.

आ. २. मध्यावकाश (डावीकडून) : (१) हृदय, (२) परिहृदय, (३) महारोहिणीचा चाप, (४) महारोहिणीचा अवरोही भाग, (५) ग्रसिका, (६) डावी फुफ्फुस रोहिणी, (७) डावी प्राणेशा तंत्रिका, (८) मध्यपटल.
ऊर्ध्व मध्यावकाश चौथ्या वक्ष कशेरुकापासून (छातीच्या पिंजऱ्याच्या मागच्या भागात समाविष्ट असलेल्या पाठीच्या १२ मणक्यांपैकी चौथ्या मणक्यापासून) वर आणि परिहृदयाच्या (हृदयावरील पातळ आवरणाच्या) वर असतो. त्यामध्ये मानेकडे जाणाऱ्या स्नायूंचे उगमस्थान, महारोहिणी चाप (हृदयापासून निघणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीच्या मार्गावरील खाली वळताना असणारे कमानीदार वळण) व त्यापासून निघणाऱ्या शाखा, मानेतील मुख्य आणि उपनीला, श्वासनीला व ग्रसिका हे भाग असतात. मुलांमध्ये यौवनलोपी ग्रंथीही (तरुणपणी नाहीशा होणाऱ्या वाहिनीविहीन ग्रंथी) याच भागात असतात. अधोमध्यावकाशाचा पुढचा भाग अगदी अरुंद असून त्याच्या दोन्ही बाजूंस परिफुफ्फुसांच्या कडा असतात. या भागात काही लसीका ग्रंथी, लहान रोहिण्या व नीला असतात. अधोमध्यावकाशाचा मधला भाग सर्वात रुंद आणि विस्तीर्ण असून त्यात हृदय, परिहृदय, महारोहिणी चापाचा आरोही भाग, ऊर्ध्वमहानीलेचा खालचा आणि अधो महानीलेचा वरचा भाग, श्वासनालाचे द्विभाजन स्थान आणि फुफ्फुसाकडे जाणाऱ्या व फुफ्फुसाकडून येणाऱ्या रक्तवाहिन्या, तंत्रिका व अनेक लहान लसीका ग्रंथी असतात. अधोमध्यावकाशाच्या मागील भागात मुख्य रोहिणीचा अवरोही भाग, प्राणेशा (मेंदूपासून निघणारी दहावी) तंत्रिका, उरोलसीका मार्ग व लहान लसीका ग्रंथी असतात.

 

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate