(अपची). मानेतील लसीका ग्रंथींच्या (रक्तद्रवाशी साम्य असणारा द्रव म्हणजे लसीका वाहून नेणाऱ्या वाहिन्यांतील लसीका पेशींच्या ग्रंथिसद्दश समूहांच्या) चिरकारी (दीर्घकालीन) शोथाला (दाहयुक्त सूजेला) ‘गंडमाळा’ महणतात.
गंडमाळा बहुधा क्षय जंतुसंसर्गामुळे होतात. गिलायू (टॉन्सिल्स), नासागिलायू (नाकाच्या घशाकडील द्वाराजवळ असलेला लसीका ग्रंथिसद्दश गोळा) आणि दातांची मुळे या ठिकाणी क्षयरोग जंतूंचा प्रवेश झाल्यास ते जंतू लसीकाप्रवाहाबरोबर मानेतील गाठीत जाऊन तेथे शोथ उत्पन्न करतात.
क्षयरोग जंतूच्या गोजातीय (बोव्हाइन) प्रकाराच्या संसर्गामुळे गंडमाळा होतात, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु या जंतूंच्या मानवातील प्रकारामुळेच गंडमाळा अधिक प्रमाणात दिसतात, असे आता सिध्द झालेले आहे. संसर्गित दुधामुळे हा रोग लहान मुलांत दिसतो. म्हणून दूध चांगले उकळून अथवा पाश्चरीकरण (सु. ३० मिनिटे ६०° से. तापमानास तापविण्याची क्रिया) करून घेण्याची प्रवृत्ती वाढत असल्यामुळे या विकाराचे प्रमाण आता कमी होत चालले आहे.
प्राकृताअवस्थेत (नेहमीच्या अवस्थेत) मानेतील लसीका ग्रंथी हाताला लागत नाहीत पंरतु गंडमाळा या विकारात सुरुवातीपासूनच त्या हाताला लागू लागतात; त्यावेळी त्या गाठी दुखत नाहीत किंवा स्पर्शासह्यही नसतात. एकाच वेळी अनेक गाठी मोठ्या होऊन त्यांची एक साखळीच जणू हाताला लागू लागते. काही काळानंतर गाठी अधिकाधिक मोठ्या होऊन त्यांच्या अंतर्भागात पू तयार होतो.
पुवाने भरलेला हा ग्रंथिविद्रधी (ग्रंथीतील गळू) कालांतराने फुटून त्वचेवर जखम तयार होते. गाठी एकमेकींना घट्ट चिकटल्यासारख्या होऊन त्यांचे झुपके मानेत दिसू लागतात.
अनेक गाठी फुटल्यामुळे मानेत अनेक लहानलहान जखमा आणि नाडीव्रण (पन्हाळीसारख्या जखमा) दिसू लागतात; जखमांतून पांढरट पिवळा स्त्राव वाहत राहतो. या गाठींमधील शोथ आपोआप बरा होण्याची प्रवृत्ती असल्यामुळे गाठींच्या भोवती तंत्वात्मक (तंतुमय) उतक (समान रचना व कार्य असलेल्या पेशींचा समूह) तयार होऊन मानेवर अनेक व्रण दिसू लागून त्वचा सुरकुतलेली दिसते. ज्वर अगदी थोडा वा मुळीच नसतो.
अलीकडे क्षयजंतूंविरुद्ध अनेक प्रभावी औषधे उपलब्ध झालेली असून त्यांच्या उपयोगाने गाठी फुटण्याच्या आधीच बऱ्या होऊ शकतात. अगदी क्वचितच शस्त्रक्रियेने गाठी काढाव्या लागतात.
लेखक - वा. रा. ढमढेरे
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/3/2020
गळ्यात मध्यभागी असलेल्या अषटू ग्रंथीची कोणत्याही क...
मान व उदर यांच्या मधील धडाच्या भागास छाती म्हणतात....
वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या शरीरात विविध प्रकार...
घर्मग्रंथि : (स्वेद ग्रंथी). घाम उत्पन्न करणाऱ्या ...