पायथॅगोरस (इ. स. पू. सु. ५७५–४९५) या ग्रीक तत्त्ववेत्त्यांच्या मूलघटकांच्या चार प्रमुख गुणधर्मांच्या (उष्ण, शीत, आर्द्र व शुष्क) सिद्धांतावर तसेच ⇨हिपॉक्राटीझ (इ. स. पू. सु. ४६०–३७०) यांच्या शरीरद्रव्य सिद्धांतावर ग्रीक वैद्यक आधारलेले होते. ग्रीक वैद्यकातील शरीराच्या आत्म-संरक्षण किंवा समायोजन क्षमतेच्या सिद्धांताप्रमाणे शरीर कोणताही विक्षोभ वैयक्तिक प्रवृत्तीच्या मर्यादेनुसार दूर करू शकते. मूलघटक व शरीरद्रव्ये एकमेकांशी संबंधित असून शरीरद्रव्यांचे योग्य व संतुलित मिश्रण म्हणजेच शरीर व मनाचे स्वास्थ्य आणि त्यातील बिघाड म्हणजेच रोग असा हा प्राचीन सिद्धांत होता. आकृतीत शरीरद्रव्ये (पीत पित्त, कृष्ण पित्त, श्लेष्मा अथवा कफ व खून अथवा रक्त), मूलघटक (तेज, पृथ्वी, जल व वायू) आणि त्यांचे गुणधर्म (उष्ण, शुष्क, शीत व आर्द्र) दर्शविले जातात.
युनानी वैद्यक याच प्रकारच्या सिद्धांतावर आधारलेले असून युनानी हकीम आपल्या औषधांनी शरीराची आत्म-संरक्षणाची क्षमता जागृत करण्याचा किंवा वाढविण्याचा प्रयत्न करतो.
रोमनांनी ग्रीकांचा पराभव केल्यानंतर पुढे एक हजार वर्षे ग्रीक वैद्यक अगदी खुंटलेल्या अवस्थेत होते. ⇨गेलेन (इ. स. १३१–२०१) या ग्रीक वैद्यांनी त्यांच्या काळातील सर्व उपलब्ध वैद्यकीय माहिती गोळा केली व तिची भक्कम पायावर सुबद्ध मांडणी केली. त्यांच्या अतिविस्तृत ज्ञानाची कल्पना त्यांच्याच अवाढव्य ग्रंथरचनेवरून करता येते. गेलेननंतर पुढे पंधरा शतके त्यांचे सिद्धांत सर्वमान्य आधार बनले. पुढे काही शतके वैद्यकीय व्यवसाय सर्वस्वी धर्माधिकाऱ्यांच्या ताब्यात होता.
नेस्टोरियन लोकांनी (कॉन्स्टँटिनोपल येथील पाचव्या शतकातील मूळ पुरुष नेस्टोरिअस यांच्या अनुयायांनी) पर्शियामध्ये काही वैद्यकीय शाळा सुरू केल्या व त्या वेळी ग्रीक वैद्यकीय लिखाणाचे सिरिअँक भाषेत भाषांतर केले गेले. यांपैकी एक शाळा युफ्रेटीस नदीकाठी होती व त्या शाळेकरिता ग्रीक वैद्यकाचे पहिले अरबी भाषांतर केले गेले.
ग्रीक व अरबी वैद्यक यांच्या दीर्घकालीन युतीमुळे ग्रीक वैद्यकाचे मूळ स्वरूप पार बदलले. ग्रीक वैद्य फक्त अनुभवसिद्धतेवर व गूढवादावर विसंबून असत. अरबांनी गणित, भौतिकी, रसायनशास्त्र, भूगोलशास्त्र, वनस्पतिशास्त्र व वैद्यक यांचे ज्ञान यूरोपला प्रदान केले. वैद्यकासंबंधीची ही परिस्थिती सु. सहाशे वर्षे अस्तित्वात होती, असे निश्चित सांगता येते.
ॲव्हिसेना ऊर्फ ⇨इब्न सीना (९८०–१०३७) बगदादच्या खलिफांचे वझीर व वैद्य होते. निरनिराळ्या विषयांवर त्यांनी शंभरपेक्षा जास्त ग्रंथ लिहिले होते. त्यांपैकी अल्-कानून फी अल्-तिब्ब या ग्रंथात संपूर्ण वैद्यकीय ज्ञान क्रमवार संग्रहित केले आहे. ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४–३२२) व गेलेन यांच्या वैद्यकीय तत्त्वांची व तत्कालीन वैद्यकीय तत्त्वांची जुळणी करण्याचा प्रयत्न या महान ग्रंथात केला असून मध्ययुगात तो एक आधार ग्रंथ बनला होता.
ग्रीक वैद्यकातील विखुरलेल्या ज्ञानाचे वर्गीकरण, उपरुग्ण वैद्यकाची सुरुवात आणि नव्या रोगवर्णनांची विकृतिविज्ञानातील भर ही अरबी वैद्यकाच्या प्रगतीची क्षेत्रे होती. इ. स. ७००–११०० या काळात अरबी भाषेत वैद्यकावर भरपूर ग्रंथलेखन झाले.
अरबी वैद्यक व आयुर्वेद यांचा संबंध हारुन-अल्-रशीद (७६४–८०९) यांच्या काळापासून प्रस्थापित झाला होता. काही आयुर्वेद शास्त्रज्ञांना बगदाद भेटीचे आमंत्रण दिल्याची घटना ऐतिहासिक सत्य आहे. भारतात युनानी हकीमांनी सुश्रुत, वाग्भट, शार्ङ्गधर इत्यादींच्या आयुर्वेदिक ग्रंथांतून योग्य त्या भागांचा उपयोग केला होता.
हा सिद्धांत समजण्याकरिता मूळ ग्रीक वैद्यकातील शरीरद्रव्य सिद्धांत समजला पाहिजे. (१) रक्त, (२) पीत पित्त, (३) कृष्ण पित्त व (४) श्लेष्मा या चार द्रव्यांचे संतुलित व योग्य मिश्रण म्हणजे स्वास्थ्य आणि असंतुलित मिश्रण म्हणजे अस्वास्थ्य अथवा रोग ही मूलभूत कल्पना आहे. यांशिवाय चार मूलघटक व चार प्रमुख गुणधर्म शरीर प्रवृत्ती बनवितात. तेज, पृथ्वी, जल व वायू आणि संनिकृष्ट गुणधर्म उष्ण, शुष्क, शीत व आर्द्र यांना समान अशी चार शरीरद्रव्ये पुढीलप्रमाणे आहेत.
उष्ण + सांद्र (आर्द्र) = रक्त; उष्ण + शुष्क = पीत पित्त;
शीत + शुष्क = कृष्ण पित्त; शीत + सांद्र (आर्द्र) = श्लेष्मा.
युनानीमध्ये ‘खून’, ‘बलगम’, ‘सफरा’ व सौदा’ अशी चार शरीरद्रव्ये (युनानीमध्ये यांना ‘खिल्त’ म्हणतात) मानली आहेत. चार शरीरद्रव्यांना मिळून अरब्लात-ए-अरब ‘अ’ असे म्हणतात.
ग्रीक व युनानी कल्पनांमधील प्रमुख फरक असे आहेत.
(१) सफरा: याचा अर्थ पित्त या यकृतस्रावापुरताच मर्यादित नसून शरीराच्या उष्णतोत्पादक क्रिया व पचनक्रियेशी पचनक्रियेसहित सर्व चयापचय (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी), रक्ताचा रंग, सर्व स्रावोत्पादन व उत्सर्जन यांचा त्यात समावेश होतो.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
रोगावरील चिकित्सा पद्धतींपैकी ही एक पद्धत आहे. या...
युनानी चिकित्सा पद्धती भारतात फार पुरातन काळापासून...
ही आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक शाखा असून तिच्यात...
हातांच्या उपयोगाने किंवा विशिष्ट उपकरणे वापरून शरी...