অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मर्दन चिकित्सा


हातांच्या उपयोगाने किंवा विशिष्ट उपकरणे वापरून शरीरातील ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या−पेशींच्या−समूहांची) योग्य हालचाल करून ज्या चिकित्सेत रोगोपचार करतात तिला ‘मर्दन चिकित्सा’ म्हणतात. या उपचारांचा उल्लेख ‘मालिश’ किंवा ‘चंपी’ असाही केला जातो. तेल किंवा उटणे (बाहेरून अंगाला लावण्याचे सुगंधी चूर्ण) वापरून जेव्हा ही क्रिया करतात तेव्हा तिला ‘अभ्यंग’ ही संज्ञा लावतात. महाराष्ट्रात दीपावली उत्सवात अभ्यंगस्नालनाचा एक खास दिवस असतो.

इतिहास

मर्दन अथवा मालिश हा उपचार मानवाला अनादिकाळापासून ज्ञात असावा. शरीराच्या इजा झालेल्या किंवा वेदनोत्पादक भागावर तो अंतःस्फूर्तीने चोळण्याचा, दाबण्याचा, थोपटण्याचा अवलंब करीत आला असावा. प्राचीन रोमन व ग्रीक लोकांमध्ये मर्दन हा एक ऐषरामाचा भाग होता. चिनी, ईजिप्शियन व जपानी लोक, तसेच तुर्कस्तानातील लोक हजारो वर्षे मर्दनाचा उपयोग करीत आले आहेत. प्राचीन चिनी व हिंदू लिखाणातून मर्दन चिकित्सेचा एक वैद्यकीय उपचार म्हणून उल्लेख आहे.

अभ्यङमाचरेन्नित्यं स जरा श्रमवातहा ।

दृष्टिप्रसादपुष्टयायु: स्वप्न सुत्वक्‌त्वदादर्यकृत ।

शिरः श्रवणपादेषु तं विशेषेण शीलयेत् ।।

नित्य नियमाने अंगाला तेल चोळून लावल्यास तारूण्य व ताकद दीर्घकाळ टिकते आणि वातविकार नाहीसा होतो. विशेषतः डोके,तळपाय व कान यांना तेल लावल्यास दृष्टी, पुष्टी व सुखनिद्रा आणि त्वचा सुधारणा इ. प्राप्त होतात. चरकांनी सर्वांग अभ्यंगाचे फायदे आपल्या संहितेत सविस्तर वर्णिले आहेत. वाग्भटांनी अंगास उटणे लावण्याचा उल्लेख ‘उद्वर्तनं’ असा केला असून त्याचे फायदे सांगितले आहेत. अष्टांगसंग्रहात ऋतुमानप्रमाणे कोणती तेले वापरावीत, हे सुचविले आहे. बाळंतिणीच्या अंगाला तेल मर्दन करण्यामागे स्नायू शैथिल्य घालविण्याचा हेतू असतो.

पाश्चात्य वैद्यकात हिपॉक्राटीझ यांनी मर्दन चिकित्सेच्या फायद्यांचे सविस्तर वर्णन केले असून ती कोणत्या रोगाकरिता वापरावी,हेही सुचविले आहे. इतिहासपूर्व काळापासून ज्ञात असलेली ही चिकित्सा मात्र अगदी अलीकडील काळापर्यंत दुर्लक्षितच राहिली. या चिकित्सेच्या परिणामकारकतेची निश्चित वैद्यकीय माहिती उपलब्ध नसणे, हे याचे प्रमुख कारण असावे.

आधुनिक काळात या चिकित्सेचे पुनरूज्जीवन करून ती वृद्धिंगत करण्याचे श्रेय पी. एच्‌. लिंग (१७७६−१८३९) या स्विडिश व्यायामपटूंना द्यावे लागते. त्यांनी अठराव्या शतकात या चिकित्सेला पद्धतशीर स्वरूप दिले. त्यांनी उपयोजिलेल्या व उपकरण न वापरता करावयाच्या विशिष्ट व्यायाम पद्धतीला त्यांच्या नावावरून ‘लिंगीझम’ असे नाव मिळाले होते. काही काळ ॲम्स्टरडॅम व नंतर व्हीस्बाडेन येथील रहिवासी मेझगेन या प्राध्यापकांनी मर्दन चिकित्सेची शास्त्रीय पायावर उभारणी करून रोगोपचारातील एका शाखेचे स्थान तिला प्राप्त करून दिले. दुसऱ्‍या महायुद्धानंतर या चिकित्सेला बरेच महत्व प्राप्त झाले. मर्दन चिकित्सा आता रूढ झालेल्या भौतिकी चिकित्सेचा एक आवश्यक भागच बनली आहे.

मर्दन या अर्थाचा मूळ इंग्रजी ‘मसाज’ (massage) असून तो मूळ ग्रीक भाषेतील ‘तिंबणे’ किंवा ‘हाताळणे’ या अर्थाच्या शब्दावरून झाला असावा. फ्रेंच भाषेतील masser या ‘चोळणे’ हा अर्थ असलेल्या शब्दावरून तो अलीकडे रूढ झाला असावा. या चिकित्सेतील काही क्रिया आजही फ्रेंच शब्दांनी दर्शविल्या जातात. उदा., Petrissage हा फ्रेंच शब्द ‘तिंबणे’ (नीडींग) या क्रियेकरिता वापरतात.

तंत्र

पूर्वी केवळ हातांचा उपयोग करून करावयाच्या या चिकित्सापद्धतीत काळानुरूप काही

बदल झाले आहेत. त्यामुळे हिचे दोन प्रकार आढळतात : (१) हस्तसाधित आणि (२) यांत्रिक (उपकरणे वापरून केलेला उपचार). बहुतांश वैद्यकीय मर्दन चिकित्सा हस्तसाधितच असते आणि ती खास शिक्षण घेतलेल्या प्रशिक्षित चिकित्सकाकडूनच केली जाते.

या चिकित्सेतील चिकित्सकाच्या हातांच्या प्रमुख हालचालींचे वर्गीकरण पुढे दिल्याप्रमाणे केले जाते : (१) थोपटणे : याला फ्रेंच शब्दeffleurage असा वापरतात. मराठीत चाकचोपी किंवा चाकी चोपी करणे असेही म्हणतात. हातां

नी दाब देत लयबद्ध रीतीने केलेले मर्दन असे याला म्हणता येईल. (२) मळणे किंवा तिंबणे : स्नायू विशिष्ट प्रकारे दाबणे वा तिंबणे (३) घर्षण : मालिश करणाऱ्याच्या बोटांची, विशेषेकरून रूग्णाच्या सांध्यावर किंवा जेथे नैसर्गिक अस्थी उंचवटा असेल तेथे, गोलाकार जलद हालचाल. (४) ठोकणे : (फ्रेंच tapotment) स्नायू किंवा इतर मऊ ऊतक निरनिराळ्या तीव्रतांच्या ठोक्यांनी हलविणे. (५) कंपन : मालिश करणाऱ्‍याच्या बोटांनी किंवा तळहातांनी कंप उत्पन्न होईल अशी ऊतकांची हालचाल.

वरीलपैकी कोणतेही तंत्र वापरण्यापूर्वी मालिश करणाऱ्‍यास ते कोणत्या शरीरभागावर व किती वेळ वापरावयाचे वगैरे संपूर्ण ज्ञान असावयास हवे. याशिवाय त्याला शरीररचनाशास्त्र व शरीरक्रिया-विज्ञानासंबंधी थोडीफार माहिती असणे आवश्यक असते.

यांत्रिक मर्दन चिकित्सेकरिता विद्युत्‌ चलित्राने (मोटारीने) चालणारी कंपनयंत्रे, लाटणी (दंडगोलाकार रूळ) व पट्टे उपलब्ध असून त्यांचे विविध प्रकार मिळतात. तथापि कोणतेही यांत्रीक उपकरण हस्तसाधित मर्दनाची बरोबरी करू शकत नाही. निष्णात मालिश करणाऱ्‍याच्या हस्तकौशल्यामुळे रूग्णास जे समाधान मिळू शकते, ते यांत्रिक उपचारांनी मिळत नाही.

शरीरक्रिया वैज्ञानिक परिणाम

मर्दनाचे त्वचा, वसा (स्नितग्ध पदार्थयुक्त) ऊतक, स्नायू, रक्ताभिसरण, लसीका प्रवाह (उतकांकडून रक्तात जाणाऱ्‍या व रक्तद्रवांशी साम्य असणाऱ्या द्रव पदार्थाचा प्रवाह) व तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) यांवर परिणाम होतात. नियंत्रित व लयबद्ध थोपटण्याने त्वचेवर प्रत्यक्ष परिणाम होतो. अतिस्त्रावामुळे साचलेले पृष्ठस्थ पदार्थ कमी केले जातात. त्वचेचे तापमान २० ते ३० से. ने वाढवता येते. शरीरातील अवास्तव वसा संचय (उदा., स्थूलता) मर्दनाने घालवता येतो, हा मात्र गैरसमज आहे. मर्दनाचा स्नायूवर प्रत्यक्ष आणि प्रतिक्षेपी क्रियेने (बाह्य उद्दीपनाने निर्माण होणाऱ्‍या अनैच्छिक प्रतीसादाने) असा दुहेरी परीणाम होत असावा. त्यामुळे स्नायूतील रक्ताभिसरण वाढते. व्यायामाने स्नायूत लॅक्टिक अम्लाचे उत्पादन होते. तसे ते मर्दनात होत नाही; तसेच मर्दन व्यायामाप्रमाणे स्नायूंची ताकदही वाढवत नाही. पेटके येणे, अंगग्रह (स्नायूचे आकस्मिक,जोरदार व अनैच्छिक आकुंचन होणे) व आचके येणे यांसारख्या स्नायु-विकृतींवर मर्दन उपयुक्त असते.स्नायूंच्या अंतर्भागात उत्पन्न झालेले विकृतीजन्य बंध मर्दनाने सैल करता येतात.

हातापायांची सूज पुष्कळ वेळा त्यांच्या स्नायूंची नैसर्गिक क्रियाशीलता बंद पडण्यामुळे उद्‌भवते. नीलांतील रक्ताभिसरण व लसीका प्रवाह नीट न झाल्यामुळे ही सूज येते. अशी सूज कमी करण्याकरिता मर्दनाचा उपयोग होतो. मर्दनामुळे रक्तवाहिनीच्या भित्तीवर प्रत्यक्ष परिणाम तर होतोच, शिवाय त्वचाजन्य प्रतिक्षेपी क्रियांमुळे रक्तवाहिनीच्या भित्तीतील स्नामयूंचे योग्य आकुंचन व प्रसरण होतो.

स्नायू व रक्तवाहिन्यांवरील परिणामाशिवाय मर्दन केंद्रीय तंत्रिका तंत्रावर [⟶ तंत्रिका तंत्र] परिणाम करते. मर्दनाने पुष्कळांना मानसिक ताण व चिंता दूर होऊन शांत वाटू लागते.

मर्दन चिकित्सा सार्वदेहिक किंवा स्थानीय स्वरूपाची असू शकते.मूळ विकृतीवर तिचे स्वरूप अवलंबून असते. काही विकृतींमध्ये इतर उपचारांबरोबरच मर्दन चिकित्सा उपयुक्त ठरते. अशा वेळी वैद्यकीय सल्ल्यानुसार चिकित्सकाने उपचार करावयाचे असतात. मर्दन ही एक कला आहे व प्रत्यक्ष पाहून व कृती केल्याशिवाय ती आत्मसात करता येत नाही. अडाणी व्यक्तीने केलेले मर्दन कधीकधी हानिकारक असते.

 

संदर्भ : 1. Jussawala, J.M Healing From Within, Bombay, 1966.

२. नानल, म.पु. ; गद्रे, र.कृ. मर्दनशास्त्र, पुणे, १९५९

भालेराव, य.त्र्यं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate