অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांधेहृदयताप


हा आजार खूप विचित्र आहे. यात एका विशिष्ट जिवाणूंमुळे घशाला सूज येते. काही काळाने याचाच पुढचा भाग म्हणून सांधे व हृदयाला सूज येते. यातूनच पुढे हृदयाच्या झडपांचे आजार तयार होतात. सांधे आणि हृदय या दोन्ही वेगवेगळया अवयवांना होणारा आजार म्हणून आपण या आजाराला सांधेहृदयताप म्हणू या. हा एक दीर्घकालीन आजार आहे. यांत सांधेसूज कालांतराने थांबते पण हृदयाला कायमची इजा होते.

गरिबीचा आजार

भारत व इतर अविकसित देशांमध्ये सांधेहृदय तापाचे प्रमाण खूप (5 ते 15 वर्षे वयोगटात दर हजारी 6 इतके) आहे. हृदयाच्या एकूण सर्व आजारांत या आजारामुळे येणा-या झडपांच्या विकारांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. हृदयासंबंधीच्या आजारांत सांधेहृदय तापामुळे होणा-या हृदयविकाराचे प्रमाण 30 ते 40 टक्के आहे. ज्या ठिकाणी लोक दाटीवाटीने राहतात (उदा. गरीब वस्त्या, झोपडपट्टया) त्या ठिकाणी याचे प्रमाण जास्त आढळते. वेळीच निदान व उपचार झाल्यास त्यातून येणारा हृदयाच्या झडपांचा बिघाड बराचसा टाळता येतो. एकदा झडपांचे काम बिघडले, की शस्त्रक्रिया करावी लागते. लहान वयात या रोगाचे लवकर निदान व उपचार होणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.

रोगनिदान

या आजाराच्या जिवाणूंमुळे 5 ते15 वर्षे वयोगटातील मुलामुलींना आधी ताप व घसादुखी होते. मग या मुलांना सांधेदुखी व हृदयातील झडपांचा आजार या क्रमाने त्रास होतो. आधी काही वर्षे मधूनमधून घसादुखी व त्यानंतर पाठोपाठ येणारी सांधेसूज हाच प्रमुख घटनाक्रम असतो. अशावेळी बारीक किंवा मध्यम ताप राहतो. त्यानंतर सांधेदुखी व सांधेसूज येते ती बहुधा मोठया सांध्यामध्ये यात गुडघा,घोटा, मनगट, कोपरा, इ. सांधे सुजतात. कधीकधी लहानलहान सांधेही सुजतात (उदा. हातापायाच्या बोटांतले सांधे). सांधेसूज 'फिरती' असते. म्हणजे आता हा सांधा तर अचानक दुसरा सांधा सुजतो. एकाच वेळी अनेक सांधेही दुखू शकतात. काही दिवसानंतर सांधेसूज बरी होते, पण ती परत परत येते.

या बरोबर कधी विचित्र (अनैच्छिक) हालचाली, सूज नसलेली सांधेदुखी, कातडीच्या खाली गाठी, इत्यादी लक्षणे आढळतात. सांधेसूज व ताप मधूनमधून येत राहतो.

हृदय सूज आणि झडपांचा बिघाड

हळूहळू हृदयावर रोगाचा परिणाम दिसायला लागतो. हृदयाच्या स्नायूला सूज येते व हृदयाच्या झडपांनाही सूज येते. हृदयाला सूज आल्यावर छातीत डाव्या बाजूला दुखणे, दम लागणे, छातीत धडधडणे अशी लक्षणे दिसतात. हृदयाला वारंवार सूज किंवा खूप सूज आल्यास झडपांवर कायमचा परिणाम होतो. झडपांची सूज ओसरल्यावर त्या आखडतात व बरोबर मिटत नाहीत. त्यामुळे रक्तप्रवाहात गळतीमुळे उलटसुलट गती निर्माण होते (उदा. रक्त एका कप्प्यातून दुस-या कप्प्यात नको असताना मागेपुढे घुसणे). रक्तप्रवाहात येणा-या उलटसुलट गतीमुळे छातीवर प्रत्येक ठोक्याबरोबर सूक्ष्म थरथर होते. छातीला हात लावून किंवा आवाजनळीने ती स्पष्टपणे कळते. हृदयाच्या ठोक्याबरोबर हा आवाज झडपांचा बिघाड दाखवतो.

हृदयाच्या झडपांचा बिघाड जास्त असेल तर रक्त ढकलण्याचे काम अवघड होते. यामुळे हृदयाची गती वाढते, आणि हृदयाचा आकार थोडा वाढतो.

याबरोबर पायावर सूज येते, कारण रक्तप्रवाह मंद झाल्यामुळे रक्तातील पाणी सूक्ष्म केशवाहिन्यांबाहेर पडते. पाय हा शरीराचा सर्वात खालचा भाग असल्याने ही सूज पायांत दिसते. रक्तातल्या वायूची श्वसनसंस्थेत जी देवाणघेवाण होते त्यात अडथळा होतो. यामुळे रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जीभ व नखे निळसर दिसतात.

रक्त साठल्यामुळे यकृत व प्लीहा नेहमीपेक्षा मोठे होतात व नंतर जलोदर होतो. काही काळाने रक्तप्रवाह मंद झाल्याने फुप्फुसात पाणी जमते. अशावेळी आवाजनळीने तपासल्यास फुप्फुसाच्या खालच्या भागात सूक्ष्म बुडबुडयांचे आवाज (क्रेप) ऐकू येतात.

सुरुवातीला 2-3 वर्षात सांधेदुखी मात्र आपोआप बरी होते. नंतर त्याचा काहीही परिणाम उरत नाही. अनैच्छिक हालचालीही आपोआप बंद होतात, फक्त हृदयावरचे परिणाम कायम राहतात. रुग्ण विशेष करून झडपांच्या बिघाडाच्या वेळी औषधोपचारासाठी येतो, कारण ब-याच वेळी ताप व सांधेसूज हे जुजबी असतात. ही दुखणी अंगावर काढणे शक्य असते, पण नेमकी चूक इथेच होते. झडपा खराब झाल्या, की शस्त्रक्रियेने त्या बदलाव्या लागतात. ही नाजूक, धोक्याची व महागडी शस्त्रक्रिया न झाल्याने अनेक रुग्ण दगावतात.

तापाबरोबर सांधेसूज, हृदयसूज (झडपांचे बिघडलेले आवाज) याबरोबरच रक्ततपासणीवर निदान अवलंबून असते. योग्य उपचारांसाठी जोड लक्षणावरून लवकरात लवकर हा आजार ओळखणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे. शाळकरी वयात ताप आणि बदलती सांधेदुखी या वरून ताबडतोब शंका घेऊन आपण डॉक्टरकडे पाठवावे.

उपचार

या आजारात पूर्ण विश्रांती, पेनिसिलीन इंजेक्शन, ऍस्पिरिन, इत्यादी औषधोपचारांची गरज असते.

महत्त्वाचे म्हणजे पुढे घसासूज-सांधेदुखी येऊ नये म्हणून दर महिन्यास पेनिसिलीनचे एक इंजेक्शन द्यावे लागते. यामुळे झडपांचे नुकसान टळू शकते. सांधेहृदय तापामुळे झडपांचे नुकसान टाळण्यासाठी दर महिन्याला पेनिसिलीनचे इंजेक्शन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

पण सांधेहृदयतापाचे समाजातले प्रमाण कमी होण्यासाठी राहणीमान सुधारणे हाच सर्वात परिणामकारक उपाय आहे.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate