অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मलोत्सर्ग

अन्नाचे पचन व अभिशोषणया क्रिया आंत्रमार्गात (आतड्यांच्या मार्गात) जवळजवळ पूर्ण झाल्यानंतर, त्यातील उरलेला निरूपयोगी भाग ज्या शरीरवैज्ञानिक क्रियेने शरीराबाहेर टाकला जातो तिला‘मलोत्सर्ग’ अथवा ‘मलविसर्जन’ अथवा ‘मलोत्सर्जन’ म्हणतात. बृहदांत्राच्या (मोठ्या आतड्याच्या समीपस्थ अर्ध्या भागात पाणी व विद्युत्‌ विश्लेष्य (विद्युत्‌प्रवाहाने ज्यातील घटक अलग होऊ शकतात असे) पदार्थ अभिशोषिले जातात. दूरस्थ अर्ध्या भागात उरलेल्या पदार्थांचा ते उत्सर्जित होईपर्यंत संचय केला जातो. या दोन्ही कार्याकरिता तीव्र हालचालींची गरज नसल्यामुळे बृहदांत्राची हालचाल मंद असते. तरीही त्यात मिश्रणोत्पादक व प्रचालक (आतील पदार्थ पुढे ढकलणे) या दोन्ही हालचालींचा समावेश असतो. मिश्रणोत्पादक हालचालीत आतड्याच्या वर्तुळाकार व उभ्या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे छोटे छोटे कोश तयार होतात. याला कोशोत्पादक म्हणतात. या कोशांत उरलेले पदार्थ ढवळले जातात. हालचालीमुळे ते बृहदांत्राच्या आतील पृष्ठभागावर पसरले जाऊन त्यातील पुष्कळसे पाणी अभिशोषिले जाते.

बृहदात्रांच्या सुरूवातीच्या भागात म्हणजे उंडुकात अथवा अंधनालात (पिशवीसारख्या भागात) सु. ४५० मिली. जलमिश्रित अर्धपचन झालेला अन्नांश दररोज येतो. त्यापैकी बहुतांश जलशोषणानंतर फक्त ८० मिली. भाग मलातून टाकला जातो. उंडुकात येणारा भाग बहुतांश द्रव असतो आणि तो पुढे जाताना अर्ध−द्रव, मऊ, अर्ध−मऊ, धन व (मोठ्या प्रमाणात पाणी अभिशोषिले गेल्यास) अतिघन या अवस्थांतून जातो. हालचालींमुळे उंडुकातींल मल आरोही (वरच्या दिशेला जाणाऱ्या ) बृहदांत्रात व तेथून अनुप्रस्थ (आडव्या) बृहदांत्रात ढकलला जातो.

बृहदांत्राच्या हालचालींचा प्रारंभ दोन प्रतिक्षेपी क्रियांमुळे (बाह्य उद्दीपनामुळे निर्माण झालेल्या स्नायू यंत्रणेच्या अनैच्छिक प्रतिसादांमुळे) होतो :

  1. जठक बृहदांत्र प्रतिक्षेपी क्रिया आणि
  2. ग्रहणी-बृहदांत्र प्रतिक्षेपी क्रिया. जठरात आणि ग्रहणीत (लहान आतड्याच्या सुरूवातीच्या सु. २५ सेंमी. लांबीच्या भागात) अन्न शिरल्यानंतर हे प्रतिक्षेप निर्माण होतात.

प्रतिक्षेपी क्रिया

मलोत्सर्ग हीसुद्धा एक प्रतिक्षेपी क्रियाच आहे. गुदांत्रात अथवा मलाशयात मलाचा प्रवेश होताच गुदांत्राच्या भित्ती फुगून ताणल्या जातात. सर्वसाधारणपणे ३० ते ४० मिमी. पाऱ्याच्या स्तंभाइतका दाब पुरेसा असतो. भित्तींतून अभिवाही संवेदना निघतात व त्या आंत्रबंधाच्या तंत्रिका (मज्जा) जालातून पसरून अवरोही बृहदांत्र, अवग्रहाकारी बृहदांत्र व गुदांत्र भित्तीत क्रमसंकोच निर्माण करतात. त्यामुळे मल पुढे गुदमार्गाकडे ढकलला जातो. ही प्रतिक्षेपी क्रिया अतिशय कमजोर असल्यामुळे आणखी एका प्रतिक्षेपी क्रियेने तिला पुष्टी दिली जाते.

गुदांत्र भित्तीत निर्माण होणाऱ्या अभिवाही संवेदना मेरूरज्जूतही (पाठीच्या कण्यातून जाणाऱ्या तंत्रिकांच्या दोरीसारख्या जुडग्यातही) पोहोचतात व तेथून प्रतिक्षेपाने अवरोही बृहदांत्र, अवग्रहाकारी बृहदांत्र, गुदांत्र व गुदमार्ग यांकडे परानुकंपी तंत्रिकामार्फत [⟶ तंत्रिकातंत्र] परत येतात. या परानुकंपी संवेदना क्रमसंकोचाचा जोर वाढवितात व मुळच्या कमजोर मलोत्सर्ग प्रतिक्षेपात भर घालून जोरदार मलोत्सर्ग क्रिया सुरू होते.

कधी कधी या हालचाली एवढ्या जोरदार असतात की अवरोही बृहदांत्राच्या सुरूवातीपासून,प्लीहावळणापासून (अनुप्रस्थ बृहदांत्राला प्लीहेपाशी−पानथरीपाशी−खाली व पुढे आलेल्या वळणापासून) थेट गुदांत्रापर्यंत मल ढकलला जातो. याच वेळी अभिवाही संवेदनांमुळे खोल श्वास घेणे, स्वरद्वार बंद होणे, उदरभित्तीच्या स्नायूंचे जोरदार आकुंचन व श्रोणितळाच्या (धडाच्या तळाशी असलेल्या हाडांनी वेष्टीत असलेल्या पोकळीच्या तळाच्या) योग्य हालचाली घडवून आणल्या जातात.

वरील जोरदार प्रतिक्षेपी क्रियांशिवाय प्रत्यक्ष मलोत्सर्गाकरिता आणखी काही गोष्टींची जरूर असते. प्रथम गुदांत्रातील अंतःस्थ परिसंकोची (गुदांत्रातील छिद्र बंद करणारा कडीसारखा अंतःस्थ स्नांयू) शिथिल पडतो व गुदांत्रात मल पुढे सरकताच बाह्यस्थ परिसंकोची घट्ट आकुंचित होऊन मलविसर्जन तात्पुरते थोपवले जाते. यानंतर [लहान मुले (एक वर्ष वयाखालील) व मानसिक असमर्थता असणाऱ्या व्यक्ती सोडल्यास] मेंदूच्या बाह्यकातील (सर्वात बाहेरच्या करड्या रंगाच्या भागतील) विशिष्ट भागात प्रथम जाणीव होते व मलोत्सर्गाचा ऐच्छिक भाग कार्यान्वित होते. त्यानुसार बाह्यस्थ परिसंकोची शिथिल होण्याचे किंवा आकुंचित राहण्याचे ठरते. उदा.,मलोत्सर्गास योग्य जागा किंवा परिस्थिती नसल्यास परिसंकोची आंकुचितच राहतो.

परिणामी काही मिनिटांनंतर मलोत्सर्ग प्रतिक्षेप निष्प्रभ बनतो व पुन्हा अधिक मल गोळा होईपर्यंत सुरू होत नाही. मलोत्सर्गास योग्य जागा असल्यास अनुकूल परिस्थितीत कधीकधी मलोत्सर्ग प्रतिक्षेप खोल श्वसनाने मध्यपटल (उदर व वक्ष यांना अलग करणारे स्नापयुमय पटल) खाली सरकवून व उदरभित्तीच्या स्नायूंचे जोरदार आकुंचन करून, उदग्गुहेतील दाब वाढवून सुरू करता येतो; परंतु या प्रकारची क्रिया नैसर्गिक प्रतिक्षेपाएवढी परिणामकारक कधीही नसते. या कारणामुळे ज्या व्यक्ती नैसर्गिक क्रिया वारंवार ऐच्छिक प्रतिरोधनाने थोपवतात, त्यांना गंभीर मलावरोधाचा धोका असतो.

लहान मुलात किंवा अपघाताने मेरूरज्जूचा आडवा छेद झाल्यास मलोत्सर्ग स्वयंचलित होतो कारण छेदामुळे बाह्यस्थ परिसंकोचीच्या तंत्रिका पुरवठ्यात बिघाड झालेला असतो. बाह्यस्थ परिसंकोची ऐच्छिक स्नायू असून त्याला तंत्रिका पुरवठा मेरूरज्जूच्या दुसऱ्यास ते चौथ्या त्रिक्‌-खंडातून (मेरूरज्जूतील मलोत्सर्ग केंद्रातून) निघणाऱ्या गुह्य तंत्रिकांतून होतो. वयाच्या दुसऱ्या वर्षापासून मलोत्सर्गाचा ऐच्छिक भाग कार्यान्वित होतो. लंबमज्जाय भागात [मेरूरज्जूच्या वरच्या टोकाशी संलग्न असलेल्या भागात; आणखी एक मलोत्सर्ग केंद्र असावे.

मानवी मल

मानवात व मांसाहारी गणाच्या प्राण्यांमध्ये सेवन केलेल्या अन्नपदार्थाचे ते उंडुकात शिरण्यापूर्वीच जवळजवळ पूर्ण पचन व अभिशोषण झालेले असते. शेषांत्र-उंडुक झडपेतून (शेषांत्रातून म्हणजे लहान आतड्याच्या तिसऱ्या शेवटच्या भागातून उंडुकात जाणारे पदार्थ पुन्हा शेषांत्रात येऊ नयेत यासाठी असलेल्या झडपेतून) उंडुकात शिरणारा द्रव पदार्थ जठररस, अग्निपिंडरस,आंत्ररस, श्लेष्मल (बुळबुळीत) द्रव, श्लेष्मकलास्तर कोशिका (आतड्यांच्या आतील पृष्ठभागावरील बुळबुळीत पातळ अस्तरातील पेशी) व रक्तातील श्वेतकोशिका यांचा बनलेला असतो. उंडुकात बरेचसे जलशोषण होते आणि सूक्ष्मजंतू व काही धन पदार्थाची भर पडते. सर्व मिळून जो अर्ध-घन पदार्थ बनतो तो मल होय. थोडक्यात अन्नाच्या उरलेल्या भागापेक्षा मलामध्ये आंत्रमार्गाच्या क्रियांमुळे निर्माण होणाऱ्या पदार्थांचा भाग बराच मोठा असतो. पुढील गोष्टी या विधानास पुष्टी देतात :

  1. मलात विद्राव्य (विरघळणारी) कार्बोहायड्रेटे किंवा प्रथिने नसतात;
  2. मांसाहारानंतर त्यात स्नायुतंतू आढळत नाहीत;
  3. अन्नात जर सेल्युलोज नसेल, तर आहाराचा प्रकार मलाच्या रासायनिक घटकांवर परिणाम करीत नाही आणि (४) संपूर्ण उपवासातही मलनिर्मिती चालूच असते व त्या वेळी त्याच्या रासायनिक संघटनेत बदल होत नाही.

चौवीस तासांतील उत्सर्जित होणाऱ्या मानवी मलातील प्राकृतिक घटक खालीलप्रमाणे असतात.

1. संपूर्ण वजन :

मिश्रान्न : ३३.० – १९७.५ ग्रॅ.

दीर्घ उपवासानंतर : ९.५ ० २२.० ग्रॅ.

पूर्ण मांसाहार : ५४−६४ ग्रॅ.

पूर्ण शाकाहार : ३७० ग्रॅ.

2. शुष्क वजन : ३४ ग्रॅ.

3. घटक :

वसा (स्निकग्ध पदार्थ) : ३−५ ग्रॅ.

नायट्रोजन : १−२ ग्रॅ.

युरोबिलीनोजेन : ३०−३०० मिग्रॅ.

प्रोटोपॉर्फिरीन : ०.९५५ मिग्रॅ.

कॉप्रोपॉर्फिरीन : ०.४२२ मिग्रॅ.

यांशिवाय पुष्कळ सूक्ष्मजंतू, काही खनिजे (कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह) इ. पदार्थही मलात असतात व ६५ ते ७५% पाणी असते.

 

संदर्भ : 1. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology, Tokyo, 1976.

2. Houssay, A . B. and others, Ed., Human Physiology, Tokyo, 1955.

3. Scott, R. B and others, Ed., Price's Textbook of the Practice of Madicine, Oxford, 1978.

लेखक : श्यामकांत कुलकर्णी / य. त्र्यं. भालेराव

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate