घोरणे हा आजार आहे असे अनेक लोक मानत नाहीत. वयस्कर स्त्री पुरुषांपैकी 20 ते25% लोक झोपेत घोरतात. वयाप्रमाणे घोरणा-या स्त्री -पुरुषांची संख्या वाढतच जाते. घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ, इ. स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे. मात्र हा हवेच्या मार्गात अडथळा असल्याने झोपेत शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच याचे वैद्यकीय महत्त्व आहे. हवेच्या अडथळयाच्या प्रमाणानुसार शरीरातील रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण निम्म्याच्या खाली जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ब-याच जणांना झोपेत घोरण्यामुळे श्वास अडून आचके येतात.
काही लोक यामुळे उठून बसतात किंवा काहीजण कुस बदलून झोपतात. कुस बदलल्यामुळे बहुधा हा अडथळा थांबून श्वास सुरळीत होतो. घोरण्याबरोबर अनेक आजारांशी नाते आढळून येते. घोरणा-या व्यक्तींना अतिरक्तदाब,हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूचा आघात झाल्याने पक्षाघात होऊ शकतो. घोरण्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. घोरणे हे काही अंशी आनुवंशिक असू शकते. मात्र लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, मान जाड असणे, गरोदरपणा,उतारवय, नाकातील मार्गामध्ये अडथळा, थायरॉईड संप्रेरकांची कमतरता, इ. निरनिराळी कारणे यामागे असतात. वयानुसार स्नायूंमध्ये ढिलाई येते व घोरणे सुरु होते. लठ्ठपणामध्ये स्नायूंमध्ये चरबी साठून स्नायू दुबळे होतात. हे आजार नसतील तर उतारवयातील घोरण्यापासून ही व्यक्ती मुक्त असू शकते.
घोरण्यामुळे श्वास अडून आचके येत असतील तर डॉक्टरकडे नक्की दाखवले पाहिजे. यासाठी काही तपासण्या करून घोरण्याचे कारण आणि प्राणवायू प्रमाणाची कमतरता निश्चित करता येते. छातीच्या डॉक्टरकडून तपासणी केल्यास रात्रभराचा घोरण्याचा आलेख व कार्डिओग्राम (ईसीजी) काढता येतो. यावरून निश्चित निदान करता येते. यातील बहुतेक लोकांना जीभ जडावल्यामुळे घोरण्याचा त्रास होत असतो. कारणाप्रमाणे यावर वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. जीभ जागच्या जागी रहावी म्हणून प्लॅस्टिकची आधारपट्टी किंवा शस्त्रक्रियेने घोरणे दुरुस्त करता येते. योग्य आहार, व्यायाम, प्राणायामाचे काही प्रकार (उज्जायी व भस्त्रिका) वजन कमी करणे, कुशीवर झोपणे, या साध्या साध्या उपायांनी घोरण्याचा त्रास बराच कमी होऊ शकतो. यातून उपाय न झाल्यास व त्रास जास्त असल्यास डॉक्टरकडे आवश्य गेले पाहिजे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 8/24/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...