सर्व दारूंमध्ये एथिल अल्कोहोल (मद्यार्क) कमी अधिक प्रमाणात असते. यात अनेक प्रकार आहेत. देशी दारू आणि घरगुती किंवा हातभट्टीची दारू- जास्त प्रमाणात घेतली जाते.
वाईन्स - यापैकी घरगुती वाईन ही कमी मद्यार्क असल्यामुळे (म्हणजे 5-10टक्केपर्यंत) इतर दारूप्रमाणे तिचे फारसे दुष्परिणाम होत नाहीत. घरगुती वाईन द्राक्षे,मोहाची फुले, तांदूळ, गूळ,काकवी, काजू, इ. कोणत्याही गोडसर वस्तूपासून तयार केली जाते. वाईन हा प्रकार मुरवलेल्या पदार्थापासून बनवतात. त्यात पाणी व इतर पदार्थही असतात म्हणून मद्यार्काचे प्रमाण सौम्य असते. आपल्याकडे अनेक आदिवासी समाजांमध्ये अजूनही वाईन्स लोकप्रिय आहेत आणि त्यांना स्थानिक नावे आहेत.
दारूचे इतर प्रकार हे बाष्पीभवन करून (यालाच 'गाळणे' असे म्हणतात) तयार करतात. त्यात मद्यार्क जास्त असते. देशी दारूत 40-50% मद्यार्क असतो. अर्थात ही 'कडक' दारू असते. हातभट्टीची दारूही यासारखीच कडक असते पण त्यात 'किक' येण्यासाठी आणखी काही पदार्थ (नवसागर, बॅटरी सेल, इ.) असतात. देशी दारू बहुधा मळीपासून बनवतात.
इंग्लिश या नावाने ओळखली जाणारी दारू ही जास्त काटेकोरपणे बनवलेली व व्यापारी कंपन्यांची लेबले लावून येते. रम, व्हिस्की, ब्रँडी इ. प्रकार जास्त मद्यार्काचे असतात. (सुमारे 40%). या सर्व प्रकारांचे व्यसन लागू शकते. त्यामुळे ती अंतिमत: देशी दारूप्रमाणेच घातक मानायला पाहिजे. भारतात सुमारे 21% पुरुष कमीअधिक प्रमाणात दारू घेतात असे आढळते.
वाईन्स सौम्य म्हणून कौटुंबिक पातळीवर वापरल्या जातात. त्यांचा मादक परिणाम सौम्य असतो. त्यामानाने दुष्परिणाम अल्प असतात व कमी वेळ टिकतात. मात्र जास्त मद्यार्कामुळे इतर प्रकारांची सवय लागण्याची शक्यता अधिक. बाजारू दारूमुळे जास्त व्यापक सामाजिक दुष्परिणाम होतात. तरीही आपल्या देशात कोणतीही दारू (वाईन असो किंवा नसो) घातक आहे असे मानले जाते. काही सामाजिक कार्यकर्ते सौम्य व कडक असा भेद न करता पूर्ण दारूबंदीची भूमिका घेतात.
जागतिक आरोग्य संघटनेने मात्र सौम्य मद्यार्काचा शरीराला काही प्रमाणात औषधी उपयोग होतो अशी भूमिका घेतलेली आहे.
मद्यार्काचे मेंदूवरील परिणाम रक्तातल्या प्रमाणानुसार आणि वेळ जाईल तसे बदलत जातात. सुरुवातीस मन शांत वाटणे, त्यावरचा दबाव नाहीसा होणे इतकाच परिणाम जाणवतो. संवेदना कमी वेगाने होणे किंवा बोथटणे, क्रियांचा वेग मंदावणे, निद्रा आणि एक प्रकारची मुक्तता यांचा अनुभव येतो. भीतिमुक्ततेमुळे इतरांवर हल्ला करणे, बेदरकार वागणे, बोलणे इ. दुष्परिणाम होऊ शकतात. स्नायूंची क्रिया मंदावल्याने हालचाली सैल व उशिरा होतात. यामुळे वाहनचालकांकडून अपघात होऊ शकतात. लहान मेंदूवर झालेल्या परिणामाने तोल सांभाळणे अवघड जाते.
वाईन (60 मिली.) बीअर (350मिली), तीव्र पेय (30 मिली) या मापास एक पेय /ड्रिंक म्हणता येईल.
दारूच्या व्यसनाचे शरीरावर 60 प्रकारचे दुष्परिणाम वैद्यकीय शास्त्राने सिध्द केलेले आहेत. यातले मुख्य दुष्परिणाम जठर, यकृत, पचनसंस्था, प्लीहा, रक्तवाहिन्या, हृदय, मेंदू,चेतातंतू, स्नायू, गर्भ, रक्त, जननसंस्था, इ. अनेक अवयवांवर होतात. एकूण अपघातात20% अपघात दारूच्या प्रभावाने होतात. गुन्ह्यांमागे दारू हा एक महत्त्वाचा घटक असतो. व्यक्तिगत व कौटुंबिकदृष्टया दारूमुळे अतोनात नुकसान होते. परिणामी सामाजिक नुकसान होते.
हृदयाला थोडया मद्यार्काचा फायदा होतो असे दिसले आहे. मात्र मात्रा वाढेल त्याप्रमाणे नुकसान होत जाते. अतिरक्तदाब, हृदयविकार, रक्तवाहिन्या फुटणे इ. धोका मद्यार्काच्या जादा मात्रेप्रमाणे वाढत जातो.
अनेक व्यक्ती कमीअधिक प्रमाणात मद्यप्राशन करतात. हे प्रमाण जास्ती आहे की सौम्य आहे हे ओळखणे व वेळीच त्यांना सावध करणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यासाठी एकनिदान तालिका केलेली आहे. यात 10 प्रश्न विचारायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 0,1,2,3,4 याप्रमाणे गुणपर्याय दिले आहेत. एकूण गुण 8 पेक्षा अधिक झाल्यास मद्यप्राशन जास्त प्रमाणात आहे म्हणजे एक समस्या आहे असे समजावे.
दारूच्या व्यसनांमुळे अनेक अपघात, खून, भांडणे, आत्महत्या, घरातल्यांना मारहाण इ. प्रकार होतात. घरात बायकांना मारहाण होते. अनेक नवरे दारूच्या आहारी गेलेले असतात असे आढळते. गरिबी आणि कुपोषणाच्या दुःखात दारूमुळे प्रचंड भर पडते, कारण बराच पैसा या व्यसनात खर्च होतो. समाजाच्या उत्पादकतेवरही याचा उलटा परिणाम होतोच.
दारूत होणा-या भेसळीची वेगळीच समस्या आहे. दारूत अनेक प्रकारचे पदार्थ भेसळ केले जातात. दवाखान्यात लागणा-या स्पिरिटमध्ये थोडे मेथिल अल्कोहोल मिसळलेले असते. यामुळे अंधत्व, झटके आणि मृत्यू येऊ शकतो. खोपडी, अरक, लट्ठा, नवटांक वगैरे प्रकारांनी दरवर्षी शेकडो मृत्यू होतात. आयुर्वेदिक औषधे म्हणून कडक दारू खपवण्याचा प्रयत्न बरीच वर्षे चालू होता. त्याने अनेक मृत्यू झाले आहेत.
अल्कोहोल हे मूळचे औषध खरे, आणि अनेक कलावंतांची ती प्रेरणाही असते. पण आता ते एक सामाजिक संकट म्हणून उभे आहे. प्रगती खुंटलेल्या गरीब समाजात तर त्याचा जाच आणि प्रभाव वाढतच जातो.
दारूबंदी चळवळीचा संबंध महात्मा गांधींपासून आहे. गांधीजींनी दारूबंदी ही अनिवार्य मानली, सत्याग्रह केले, म्हणून स्वातंत्र्यानंतर लाक्षणिकरित्या गुजरातमध्ये दारूबंदी चालू झाली. महाराष्ट्रात सुरुवातीस वर्धा व आता गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. हरयाना,आंध्र प्रदेश व तामीळनाडू येथे काही काळ दारूबंदी होती. पण शासकीय दारूबंदीचे एकूण चरित्र संशयास्पद असते. दारूबंदी केवळ कागदावर होते. दारूचे दुकान उघडता येत नाही पण चोरटी दारू चालूच राहते. त्यासाठी पोलिस खाते आणि राजकारण भ्रष्ट होत जाते असा सर्वत्र अनुभव आहे. दारूचे अबकारी उत्पन्न 'बुडाल्याने' काही काळानंतर सरकार दारूबंदी उठवून मोकळे होते. बेकायदा दारूधंद्यावर स्थानिक गुन्हेगारी व भ्रष्टाचाराची विषवल्ली जोर धरते. हे सत्य पाहता दारूबंदी बरी की मोकळीक हवी हा वाद न मिटणारा आहे.
धार्मीक चळवळी आणि स्त्रीचळवळींनी दारूबंदी (दारूपासून मुक्ती) आंदोलनात मोठी भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र-गुजरातमधल्या स्वाध्याय चळवळीने लाखो लोकांना दारूपासून सोडवले. वारकरी चळवळीने देखील अनेकांना माळ घालून 'दारू सोडणे' हे चांगले असल्याचा मानदंड निर्माण केला. महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर काळात शेतकरी महिला आघाडीने दारू दुकान बंदी चळवळ मोठया प्रमाणावर उघडली आणि ग्रामपंचायत ठराव करील त्या गावात दारूदुकान बंद झाले पाहिजे असा दबाव तयार केला. मात्र दारूवर उत्पन्नासाठी अवलंबून असल्याने आणि स्थानिक राजकारणात दारूचे विशेष महत्त्व असल्याने सरकारने हा विषय आतापर्यंत टाळत आणलेला आहे. ज्या गावात महिला बहुसंख्येने संमती देतील तिथेच दारू दुकान उघडण्याची मुभा असावी. असा पवित्रा अनेक संघटनांनी घेतला आहे.
देशात सर्वत्र दारू पिण्यासाठी परवाना घ्यावा लागतो अशी कायदेशीर तरतूद आहे खरी,पण यांचे पालन अभावानेच होते. वैद्यकीय कारणावरून, चिरीमिरी दिल्यावर परवाने सहज मिळतात. या परवान्यांचा वापर स्वतः पिण्यापेक्षा इतरांना दारू पुरविण्यासाठी जास्त होतो. विनापरवाना दारू प्यायल्यास शिक्षेची तरतूद आहे.
दारू पिणे गुन्हा असो वा नसो, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, वाहन चालवणे हे प्रकार तर निश्चितच शिक्षेस पात्र आहेत. वाहनचालकांनी दारू पिऊन वाहन चालवू नये ही कोणाचीही अपेक्षा असणार आणि पोलिसांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. महामार्गावरच्या ढाब्यांमध्ये, हॉटेलातून दारू सर्रास मिळते. विशेष प्रयत्न केल्याशिवाय हे सर्व थांबणार नाही.
दारूडया इसमाला जेव्हा वैद्यकीय तपासणीसाठी आणले जाते तेव्हा त्याचे रक्त घेऊन मद्यार्क तपासणीसाठी पाठवले जाते. प्रत्यक्ष शरीरतपासणीत या खाणाखुणा आढळतात: डोळयांच्या बाहुल्या मोठया होणे, श्वासाला दारूचा वास, चालताना तोल जाणे, दारूडयाची विशिष्ट चाल यावरून वैद्यकीय अहवाल दिला जातो. आता श्वासावरून दारूचे प्रमाण मोजण्याचे उपकरण उपलब्ध आहे. याचा वापर करून जागेवरच निर्णय देता येतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/26/2020
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लो...
निकोटीन हे तंबाखूतले रसायन अत्यंत विषारी आहे. ते ल...
गर्भधारणा झाल्यानंतर प्रसूती होईपर्यंतच्या मधल्या ...
वैद्यकीय दृष्टिकोनातून व्यसनाधीनतेच्या चार पाय-या ...