मूळव्याध : गुदद्वार, गुदमार्ग व गुदांत्राचा खालचा २ ते ३ सेंमी. लांबीचा भाग यांच्याशी संबंधित उपकलास्तराच्या (पातळ पटवमय अस्तराच्या) खाली असलेल्या नीलांच्या जाळ्यातून सुरू होणाऱ्या नीलांच्या अपस्फीतीला (विस्फारणे, गाठाळणे व पीळ पडणे) ‘मूळव्याध’ किंवा ‘अर्श’ म्हणतात.
बाह्य प्रकारात मूळव्याधीवर त्वचेचे आच्छादन असते, तर अंतःस्थ प्रकारावर श्लेष्मकलास्तराचे (बुळबुळीत पातळ पटलाचे) आच्छादन असते. एकाच वेळी दोन्ही प्रकार आढळल्यास त्यांचा उल्लेख ‘अंतर्बाह्य’ असा करतात. अंतःस्थ मूळव्याध जेव्हा गुदमार्गाबाहेर पडते तेव्हा ‘मूळव्याध-भ्रंश’ असा उल्लेख करतात. मूळव्याधीतील रक्तवाहिनीत जेव्हा अंतर्क्लथन होते (रक्ताची गुठळी अडकते) तेव्हा तिला अंतर्क्लथित मूळव्याध म्हणतात.
ही व्याधी पुरुषांपेक्षा स्त्रियांत, विशेषतः जास्त वेळा प्रसूती झालेल्या स्त्रियांत, अधिक प्रमाणात आढळते.
ऊर्ध्व, मध्यस्थ व अधःस्थ नीलांचे गुदमार्गस्तंभाखाली अधःश्लेष्म्यामध्ये जे जाळे असते त्याची अपस्फीती अंतःस्थ मूळव्याधीस कारणीभूत असते.
बाह्य मूळव्याध बहुधा लक्षणविरहित असते. क्वचितच परिगुद त्वचाक्षोभ व खाज ही लक्षणे आढळतात. कधीकधी अंतर्क्लथन झाल्यानंतर वेदनांमुळे बाह्य मूळव्याध असल्याचे समजते.
अंतःस्थ मूळव्याधीचे पहिले लक्षण मलोत्सर्जनापूर्वी किंवा नंतर लालभडक वेदनारहित रक्तस्त्राव होणे हे असते. रूग्ण ‘शौचाच्या वेळी रक्त थेंब थेंब गळले’ अशा शब्दात बहुधा वर्णन करतो. मूळव्याध भ्रंश असल्यास परिगुद भाग सतत ओलसर राहतो. गुदमार्गात काहीतरी जड पदार्थ असल्याचा सतत भास होतो. सुरुवातीस भ्रंशित मूळव्याध आपोआप परत जागेवर जाते. परंतु हळूहळू चिरकारी (दीर्घकालीन) अवस्था येऊन भ्रंश कायम राहतो. वेदना हे साध्या मूळव्याधीचे लक्षण नसते; परंतु शोथ (दाहयुक्त सूज) व अंतर्क्लथन तसेच गुदविदर, गुदांत्रशोथ, गुदमार्ग कर्करोग वगैरे रोग असल्यासच वेदना होतात.
सार्वदेहिक परिणामामध्ये चिरकारी रक्तस्त्रावामुळे पांडुरोग (ॲनिमिया) उत्पन्न होतो. स्थानीय सूज, पूयीभवन, व्रणोत्पादन हे उपद्रव संभवतात. याशिवाय अंतर्क्लथन व पाशग्रस्तता (अभिसरणाला रोध होणे) हे गंभीर उपद्रव होण्याची शक्यता असते. अंतर्क्लथित मूळव्याधीत सूक्ष्मजंतु-संसर्गामुळे शोथ होतो व विद्रधी (गळू) तयार होतो. भ्रंशित मूळव्याध गुदमार्ग भित्तीतील आकुंचन स्नायूंच्या आकुंचनामुळे पाशग्रस्थ होऊन वेदना व सूज येऊन निळी पडते. या अवस्थेत रोहिणीतील रक्तपुरवठा पूर्णपणे थांबल्यास कोथ (शरीर भाग मृत होऊन सडू लागण्याची क्रिया) उत्पन्न होऊन, कधी कधी संपूर्ण मूळव्याधीचे मृतोतक (मृत कोशिकांचा समूह) बनून, ते गळून पडते आणि त्या जागी व्रण उत्पन्न होतो.
लक्षरहित मूळव्याधीवर उपचारांची गरज नसते. सौम्य लक्षणे असल्यास मलोत्सर्जन सवयीचा नियमितपणा, आहारातील चोथा वाढवणे. जादा वेळ कुंथत न बसणे इ. उपचार उपयुक्त असतात. बाजारात निरनिराळी मूळव्याधीवरील मलमे, ती वापरण्याच्या सूचना व लावावयाच्या उपकरणासहित मिळतात. त्यांचा उपयोग वैद्यकीय सल्ल्यानुसार करावा.
मुळव्याधीवरील उपचारांमध्ये स्थानीय अंतःक्षेपण (इंजेक्शन) व रबरी पट्टीने बांधणे या दोन निरनिराळ्या उपचारांचा बाह्यरुग्ण विभागातही उपयोग करता येतो. दोन्हीमध्ये भूल देण्याची गरज नसते.
शीत चिकित्सा नावाच्या उपचारामध्ये द्रव नायट्रोजन अथवा नायट्रस ऑक्साइड एका सळईत अभिसारित करून ती मूळव्याधीवर फिरवून तेथील ऊतक तीव्र शीत बनवितात. तापमान -२०० से. पेक्षा खाली गेल्यावर केशवाहिन्या (सूक्ष्म रक्तवाहिन्या), रोहिणिका व छोट्या नीला यांचा ऊतकमृत्यू होतो आणि मूळव्याध गळून पडते. पूर्वी हा उपचार बाह्य रुग्ण विभागात करीत; परंतु पुढे त्याचे वेदना आणि मृतोतकातील अतिस्त्राव हे दुष्परिणाम आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करूनच ही चिकित्सा करतात. याशिवाय या उपचारामुळे गुदमार्ग परिसंकोचीस (गुदमार्गाचे छिद्र बंद करणाऱ्या वलयासारख्या स्नायूस) इजा होऊन रुग्णास असंयत मलोत्सर्जनाचा उपद्रव होण्याची शक्यता असते.
मूळव्याध-उच्छेदन (कापून काढण्याची) शस्त्रक्रिया गुणित अंतर्क्लथित मोडावर आणि बंध उपचार न करता येणाऱ्या भ्रंशित मोडावर गंभीर लक्षणे असल्यास करतात.
थोडक्यात अर्शाला कारण म्हणजे अग्नी व अपान वायूची दुष्टी प्रमुख असून अर्शाची चिकित्सा प्रामुख्याने अग्निदीपन या वायूचे अनुलोमन करणे, मलप्रवृत्ती सुखाने होईल असे करणे आणि आमवृद्धी न होता सम्यक मलप्रवृत्ती व्हावी म्हणून अग्निदीपन करणे अशी आहे. वाढलेले मांसांकुर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया, डाग देणे, क्षारलेपन-रक्तस्त्रुति-धूपण औषधांचा व उपनाह स्वेदनाचा उपयोग जरूरीप्रमाणे आवश्यक आहे. पैकी औषधोपचार शेकडा ८० मूळव्याधींना बरा करणारा आहे. या विचाराने मूळव्याधीवर सिद्धौषधे सांगितलेली आहेत.
सहज अर्श हे असाध्य स्वरूपाचे असतात. अर्शचिकित्सा करताना शुष्क (न वाहणारे) व स्त्रावी म्हणजे रक्तस्त्रावी अर्श, तसेच गाढ वर्चस्व व शिथिल वर्चस्त्व (मलप्रवृत्ती कठीण व सैल होणे) असे भेद लक्षात घेऊन चिकित्सा करावी. रक्तस्त्रावी अर्शात एकांत स्त्रावी वातानुबंधी अगर कफानुबंध असा विचार करावा लागतो. गाढवर्चस् असणाऱ्या अर्शात मलप्रवृत्ती सुखाने होईल असे हरितकी, निशोत्तर इ. योग वापरावेत. सर्वसामान्यपणे ताक हे अर्शावर अत्युत्तम द्रव सांगितले आहे. शुष्कार्शावर भल्लातक, सुरण, चित्रक इ. द्रव्यांचा उपयोग करावा. अभयारिष्ठ, कुटजारिष्ट, सुरणादि, चित्रकादि वटी, कुटजावलेह, करंजासव इ. सिद्धौषधे अवस्थांनुसार उपयुक्त होतात. अर्शकुठार नावाचे औषध सर्व प्रकारच्या मूळव्याधींवर उपयोगी आहे. दररोज तीन वेळा ४/४ गुंज प्रमाणात पाण्याबरोबर घ्यावे. त्याने वातानुलोमन होईल. मूलव्याधीमध्ये मुख्यतः वातानुलोमन औषधे व आहार घ्यावयाचा असतो. त्या दृष्टीने हे औषध नावाप्रमाणे कार्य करणारे आहे.
कफ विशिष्ट मूळव्याधीमध्ये मुळाचा आकार मोठा असला, तर त्यावर भल्लातकादितैल लावावे. याचा पिचू गुदद्वारात ठेवावा. तसेच भोजनाच्या मध्ये (अर्धे भोजन झाल्यावर) गरम पाण्याबरोबर सामुद्रादि चूर्ण १/२ ते १ मासा द्यावे. जेवणातही वातानुलोमक पदार्थ असावेत. अर्शकुठार चालू ठेवावे. पित्तज व रक्तज मूळव्याधींमध्ये सर्वसाधारण औषधे सारखीच असतात. पित्ताचा क्षोभ असताना पित्तशामक व वातानुलोमक असे कामदुधा १-१ मासा पित्त व वात कालांत दुधातून अगर मोरावळ्यातून अगर तुपातून द्यावे. शौचाला साफ होण्यासाठी अभयारिष्ट जेवताना द्यावे.
प्रत्येक वेळी २-२ तोळे समभाग पाणी मिसळून द्यावे. वातज अर्शामघ्ये ठणका फार असतो. रोगी फारच बेचैन असतो. त्यावर महायोगराज गुग्गुळ २-२ गुंजा बारीक करून तूपसाखरेतून अगर सहचरादि तेलातून जेवणापूर्वी चाटावे. अभयारिष्ट जेवणानंतर समभाग पाण्यातून २-२ तोळे द्यावे. वातज मूळव्याधीत सिंहनाद गुग्गुळाचाही उपयोग ठणका थांबविण्यासाठी, वातानुलोमनासाठी व मलशुद्धीसाठी चांगला होतो. सहज अर्शासाठी प्रकृती स्थापनी चिकित्सा (रसायन) करावयास पाहिजे. लघुमालिनीवसंत ताज्या लोण्याबरोबर (२ तोळे) सकाळी द्यावे व भूक लागल्यावर तूपभात, दूधभात असाच आहार द्यावा. वसंतकुसुमाकर सुद्धा याच पद्धतीने द्यावा. अनुपानासाठी दुधाची साय व साखर द्यावी.
अर्शोद्भव होऊ नये यासाठी मलमूत्रावरोध, मैथून, सायकलवर फार बसणे, जागरणे इ. विशर कटाक्षाने टाळावा.
लेखक : वेणीमाधवशात्री जोशी
संदर्भ : 1. Cutler. B. S. and others, Manual of Clinical Problems in Surgery. Tokyo, 1984.
2. Harmer, M.; Taylor, S., Ed., Rose and Carless’ Manual of Surgery, London, 1960.
3. Rains, A. J. H,; Ritchie, H. D. Ed., Baily and Love’ s Short Practice of Surgery, London, 1977.
4. Sabiston, D. C. Textbook of Surgery, Tokyo, 1972.
5. Schwariz, S. I. and others, Ed., Principles of Surgery. Singapore, 1984.
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
मूळव्याध (मोड किंवा पाईल्स) म्हणजे गुदद्वाराच्या त...
बृह्दांत्राच्या (मोठ्या आतड्याच्या) शेवटच्या दोन ...