অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मूळव्याध

मूळव्याध (मोड किंवा पाईल्स) म्हणजे गुदद्वाराच्या तोंडाशी असलेल्या नीलांना सूज येऊन रक्त साठून राहणे. ही सूज कमीजास्त असेल त्याप्रमाणे मोड अथवा कोंब येतात. मधूनमधून या मोडांना इजा होऊन रक्त बाहेर येते. या सूज येण्यामुळे तिथला भाग नाजूक होऊन शौचाच्या वेळेस आग होणे, दुखणे वगैरे तक्रारी निर्माण होतात.

मूळव्याध हा बहुधा मध्यमवयानंतर येणारा आजार आहे. गरोदरपणातदेखील असे मोड येतात, पण बाळंतपणानंतर ते बरे होतात.

ज्यांना कायम बध्दकोष्ठ असेल त्यांना कुंथण्यामुळे रक्तवाहिन्या दाबल्या जाऊन मूळव्याध होण्याची शक्यता असते.

रोगनिदान

 

मूळव्याधीचे मोड दिसत असल्यास इतर तपासणीची आवश्यकता नसते. पण काही वेळा हे मोड आतच राहतात. यासाठी गुदद्वाराची एका लहान नळीमधून तपासणी करावी लागते. कधी कधी मोडाच्या मागे आत गुदद्वारव्रण असण्याची शक्यता असते. बाहेर फक्त रक्तस्राव दिसतो. या तपासणीसाठी डॉक्टरकडे पाठवावे.

उपचार

आधी बध्दकोष्ठ असल्यास त्याचा उपचार करावा. मूळव्याध हा चिवट आजार आहे.

- मूळव्याध दुखत असताना वेदनाशामक मलम लावल्यास तात्पुरता आराम मिळतो. गरम पाण्यात बसून शेक घेतल्याचाही फायदा होतो.

मूळव्याधीवर तज्ज्ञांकडून तपासणी करून शस्त्रक्रियेबद्दल सल्ला घ्यावा. दोरा किंवा रबरबँडने मोड बांधणे, मोड शस्त्रक्रियेने काढून टाकणे किंवा सुजलेल्या वाहिन्यांमध्ये इंजेक्शन देणे, इत्यादी उपाय केले जातात.

आयुर्वेद

 

मूळव्याध या आजारावर इलाज करताना त्याची कारणे समजावून त्यांचे निराकरण करणे आवश्यक असते. ब-याच वेळा मूळव्याधीचे कारण म्हणजे भूक नसताना केवळ चमचमीत पदार्थाच्या ओढीने खाणे, पचनशक्ती कमी असताना तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ, विशेषत: डाळी, गहू व मांसाहारी पदार्थ सतत खाणे असते. मळ कडक होऊन बध्दकोष्ठ होणे हेही कारण असू शकते. मूळव्याधीच्या मागे ही कारणे असतील तर त्यांचे नियंत्रण आधी आवश्यक आहे.

पेरू, पपई, केळे, इत्यादी फळे रात्रीच्या जेवणानंतर घेण्याची सवय ठेवावी.

मळाचा कडकपणा कमी होण्यासाठी बहाव्याच्या शेंगेतला मगज लहान आकाराच्या गोटीइतका (तीन ग्रॅ.) करून पेलाभर पाण्यात कुस्करून रात्री घ्यावा.

वात प्रवृत्ती व्यक्तींनी त्रिफळा चूर्णासारखी विरेचक औषधे तुपाच्या बरोबर घ्यावी, नाही तर अन्नमार्ग कोरडा पडतो.

सुरण आणि ताक हे पदार्थ मूळव्याधीच्या प्रवृत्तीला थांबवणारे आहेत. चांगला शिजलेला सुरण आहारात असणे उपयोगी ठरते. भरपूर घुसळलेले ताक (200-250मि.ली.) जेवणानंतर घेणे चांगले.

पचनशक्ती सुधारण्यासाठी अर्शोघनवटी हे औषध किंवा गोळया घ्याव्यात. यात बिब्बा हा घटक असतो.

कांकायनवटी हे औषध बिन रक्तस्रावाच्या मूळव्याधीत उपयोगी असते, याची 250मि.ग्रॅ. ची गोळी दिवसातून 2 वेळा 7 ते 10 दिवस द्यावी.

मूळव्याधीबरोबर रक्त पडत असेल तर कुटजघनवटी 500 मि.ग्रॅ. सकाळी व सायंकाळी रक्त थांबेपर्यंत रोज द्यावी.

किंवा याऐवजी नागकेशर 500 मि.ग्रॅ. दिवसातून तीन वेळा 4 ते 5 दिवस द्यावे. नागकेशरामुळे बहुधा 24 तासांत रक्त थांबते. (नागकेशर हा नागचाफ्याच्या फुलावरील केसर असतो.)

होमिओपथी निवड

 

नायट्रिक ऍसिड, आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, सीना, हेपार सल्फ, लॅकेसिस,लायकोपोडियम, मर्क्युरी कॉर, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, पोडोफायलम,पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर, थूजा.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 5/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate