हर्पिस हा आजार विषाणूंमुळे होतो. त्याचे दोन प्रकार असतात. लहान मुलांना ताप वगैरे आल्यावर तोंडाभोवती 'ज्वर' उठतो तो एक प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे मोठया माणसांत लिंगसांसर्गिक मार्गाने जननेंद्रियाभोवती होणारा आजार. या दुस-या प्रकारच्या आजारात रोगाच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे शिश्नावर, योनिमुखाभोवती किंवा योनिमार्गात पुरळ येतात. संबंधानंतर 2 ते 14 दिवसांत हे पुरळ उमटतात. हे पुरळ (अगदी लहान) पाणी भरलेल्या फोडांच्या रूपात असतात. असे अनेक लहान फोड एकत्रित दिसतात. हे दुखरे असतात. त्यावरील त्वचेचा थर निघून गेल्यावर लहान जखमा दिसतात. याबरोबर अवधाण, डोकेदुखी, मानदुखी व ताप ही लक्षणे असू शकतात. लघवीस जळजळ होते. परंतु 3 आठवडयात हे फोड आपोआप बरे होतात.
मात्र याचे विषाणू शरीरात चेतासंस्थेत कायमचे सुप्त राहतात.
काही कारणांनी शरीरावर ताण पडल्यास व प्रतिकारशक्ती कमी झाल्यास शरीरातील झोपलेले विषाणू जागे होऊन पुन्हा याच प्रकारच्या पुरळाचा त्रास होऊ शकतो. सर्वसाधारणपणे पाच-सहा वेळा असे पुरळ येऊन गेल्यावर हळूहळू हा आजार आपोआप थांबून जातो. एड्स आजारात हे एक प्रमुख लक्षण असते.
आजाराची लक्षणे (फोड) दिसत असताना शरीरसंबंध टाळावेत. इतर वेळी शरीरसंबंधाने संसर्गाचा धोका नसतो. लैंगिक संबंधात 'निरोध' वापरल्यास संसर्गाचा धोका बराच कमी होतो.
फोड असताना स्वच्छता राखणे महत्त्वाचे असते. त्यासाठी दिवसातून दोन-तीन वेळा साबणाच्या सौम्य द्रवाने जखमा धुवाव्यात. सुंता करण्याचे ऑपरेशन हा या आजारावरील उपचार नाही. याबरोबर इतर कोणताही लिंगसांसर्गिक आजार नाही याची खात्री करणे आवश्यक असते. असायक्लोव्हीर मलम व गोळया या आजारात उपयुक्त ठरू शकतात. यासाठी 7 दिवस उपचार घ्यावे लागतात.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/7/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...