परमा किंवा गोनोरिया हा जिवाणूंमुळे होणारा आजार असून संसर्गानंतर एक-दोन दिवसांतच याचा परिणाम दिसतो.
पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये याचे स्वरूप थोडे वेगवेगळे असते.
पुरुषांमध्ये परमा असल्यास हमखास मूत्रनलिकादाह असतो. सकाळी लघवी करताना आधी एक-दोन थेंब पू येणे ही तक्रार यात सामान्यपणे दिसते. कधीकधी यापेक्षा अधिक प्रमाणात वारंवार पू येणे दिसून येते. वेळीच उपचार न झाल्यास मूत्रमार्गाचा दाह तसेच वीर्यकोश (प्रॉस्टेट ग्रंथी) व क्वचित बीजांडापर्यंत आजार पोचण्याची शक्यता असते. असे झाल्यास मूत्रमार्गदाहाची किंवा जननसंस्थेच्या दाहाची लक्षणे दिसतात. 'पू' जास्त प्रमाणात येणे, मूत्रनलिकेच्या मुळाशी दुखरेपणा, इत्यादी त्रास आढळतो.
स्त्रियांमध्ये परमा असल्यास मूत्रनलिकादाह आणि गर्भाशयाच्या तोंडाचा दाह होतो व त्यातून पू येतो. उपचार न झाल्यास आजार गर्भनलिकेमध्ये आणि त्यानंतर ओटीपोटात पोचण्याची शक्यता असते. गर्भनलिकांना सूज आली तर नंतर गर्भनलिका आकसून बंद होण्याची शक्यता असते. परमा स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे हे महत्त्वाचे कारण आहे.
परमा झालेल्या स्त्रीपुरुषांमध्ये अपु-या उपचारांमुळे मूत्रनलिकेचा आकार बिघडून लघवी अडकण्याचा संभव असतो.
रोगनिदान
पुरुषांमध्ये परमा आजाराचे रोगनिदान करणे सोपे असते. स्त्रियांमध्ये मात्र योनिमार्ग व गर्भाशयाची आतून तपासणी केल्यावरच निदान होऊ शकेल. गर्भाशयाच्या,मूत्रनलिकेच्या तोंडातून 'पू' येणे ही महत्त्वाची खूण आहे. आजार मूत्राशयात किंवा गर्भाशयातून ओटीपोटात गेला असेल तर ओटीपोटात दुखरेपणा आढळतो. शंका वाटत असेल तर पुवाची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करून खात्री केली जाऊ शकते.
उपचार
परमा किंवा गोनोरियामध्ये सिप्रो (सिप्रोफ्लॉक्सॅसीन) गोळयांचा 1 ग्रॅम डोस हा सर्वात चांगला उपाय आहे. हे औषध नसल्यास कोझाल आठ गोळया (एकदम) किंवा रोज एक गोळी याप्रमाणे तीन दिवस दिल्यास आजार बरा होतो. नुसते पेनिसिलीनही चांगले लागू पडते. याबरोबर मूत्रमार्ग किंवा गर्भाशयात आजार पोचला असेल तर तज्ज्ञाकडून अधिक उपचार करणे आवश्यक आहे. याबरोबर लिंगसांसर्गिक रोगांचे आणखी काही प्रकार नाहीत याची खात्री करणे आवश्यक असते. यासाठी प्राथमिक उपचार देऊन तज्ज्ञाकडे पाठवावे हे चांगले.