एच.आय.व्ही. तपासणी सदोष (पॉझिटिव्ह) आहे हे रुग्णाला सांगणे हे फार जबाबदारीचे व कौशल्याचे काम आहे. यामुळे जाणकार व्यक्तीला प्रचंड मानसिक धक्का बसू शकतो. पण काय काय करता येते याबद्दल नीट माहिती टप्प्याटप्प्याने द्यायला हवी. आजार लगेच होत नाही, त्याला अद्याप वेळ आहे हेही सांगायला हवे.
बाधित व्यक्तीच्या पती/पत्नीस (किंवा लैंगिक जोडीदारास) या संसर्गाची/आजाराची बातमी देणे आवश्यक आहे; अन्यथा प्रतिबंधक काळजी घेताच येणार नाही. मात्र हे सांगताना मानवी सहानुभूती, धीर देणे, योग्य काळजीसाठी (निरोध) नीट सल्ला देणे, इ. अनेक अंगे सांभाळावी लागतात. रुग्ण स्वतः हे करू शकल्यास उत्तमच; पक्ष समुपदेशकाची या कामात मदत घ्यायला पाहिजे.
प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे वारंवार होणा-या इतर आजारांवर उपचार करणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच हा दुर्धर आजार झालेल्या रुग्णास मानसिक आधाराची गरज असते, हे ओळखून त्याच्याशी सहानुभूतीने वागणे जरूरीचे असते.
एड्ससाठी अजून चांगली विषाणू-विरोधी औषधे नाहीत. काही औषधे उपलब्ध आहेत त्याने आजार लांबू शकतो. त्यांचा खर्च सध्या जास्त आहे व त्यांचे काही दुष्परिणामही होतात. एकूण यात फायदेतोटे पाहून, खर्चाचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो.
रुग्णालयात वा घरी रुग्णाची काळजी घेत असताना इतरांनी त्यापासून दूर राहण्याची काही गरज नाही. मात्र वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. तसेच रुग्णाचे कपडे,अंथरुण वगैरेंवर रक्त सांडले असेल किंवा ते दूषित झाले असल्यास निर्जंतुक करून घ्यायला हवे.
एड्स आजार असताना क्षयरोग होण्याची शक्यता फार असते. कारण रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे एड्सच्या प्रसाराबरोबर क्षयरोगही वाढायची भीती असते.
एड्ससाठी हल्ली बहुविध औषधोपचार पध्दती प्रचलित आहेत. यात तीन औषधे असतात. आता एकाच गोळीत तिन्ही औषधे असलेली उपचारपध्दती उपलब्ध आहे.
HAART म्हणजे अत्यंत परिणामकारक उपचारपध्दती. ही तीन औषधांची उपचारपध्दती असल्याने विषाणूभार वेगाने कमी होतो आणि सीडी 4 प्रमाण वाढते. या औषधोपचाराचा खर्च महिना हजार-बाराशे पर्यंत जातो. सर्वांना मोफत औषधोपचार अद्याप शक्य झालेला नाही.
काही रुग्णांच्या बाबतीत औषधोपचारांचा अपेक्षित फायदा होत नाही किंवा दुष्परिणाम जाणवायला लागतात. अशांच्या बाबतीत औषधे बदलावी लागतात. याशिवाय इतर आजारांसाठी उपचार करावा लागतो.
मातेपासून पोटातल्या गर्भाला संसर्ग होऊ नये म्हणून औषधोपचार - सुमारे1% गरोदर स्त्रियांना एचायव्ही-एड्सची बाधा आढळते. अशावेळी गर्भपात करायचा की गर्भ वाढू द्यायचा याबद्दल निर्णय घ्यावा लागतो. गर्भ वाढू द्यायचा असल्यास औषधोपचाराने गर्भाचा संसर्ग टाळता येतो. मात्र यात 50% यश मिळते. काही बाबतीत यश मिळत नाही.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 4/28/2020
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...