অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मूत्रपिंडविकार

मूत्रपिंडविकाराची कारणे व प्रकार खूप आहेत. पण मुख्य मुद्दा म्हणजे या सर्वात लघवीचे प्रमाण कमी होते. लघवीत प्रथिने उतरतात आणि रक्तातील निरनिराळया घटकांचे प्रमाण बदलते, रक्तदाब वाढतो, शरीरात पाणी व क्षार साठल्याने सर्वत्र सूज येते. या सर्वांचा अर्थ असा, की मूत्रपिंडाचे काम मंदावत आहे.

ह्या सर्व रोगांचे तज्ज्ञांकरवीच निदान व उपचार होणे आवश्यक आहे. मात्र वेळीच शंका घेणे व योग्य डॉक्टरकडे पाठवणे एवढे मात्र आपण करू शकतो. शरीरावर सूज असलेल्या रुग्णाला लघवीचे प्रमाण विचारा. हे प्रमाण कमी आढळल्यास ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. खरे म्हणजे शरीरावर सूज असेल तर बहुधा गंभीर आजार असतोच.

मूत्रपिंडावरचे उपचार गुंतागुंतीचे आणि दीर्घकाळ चालणारे असतात. त्यात येणारे यश मर्यादित असते. बिघडलेल्या मूत्रपिंडावर जास्त ताण येऊ नये म्हणून खाण्यापिण्यावर अनेक नियंत्रणे येतात. मीठ-पाण्याचे प्रमाण कमी करणे व इतर औषधोपचार हाच मुख्य उपाय असतो. यासाठी लघवीचे प्रमाण लक्षात घ्यावे लागते. कधीकधी कृत्रिम डायलिसीस करावे लागते. डायलिसीस म्हणजे रक्तातून टाकाऊ पदार्थ धुऊन काढण्यासाठी कृत्रिम व्यवस्था असते.

डायलिसीसमुळे मूत्रपिंडे बंद पडलेल्या रुग्णांना जीवनदान मिळालेले आहे. मूत्रपिंडाचा आजार तात्पुरता असेल तर डायलिसीस नंतर बंद करता येते. मात्र कायमच्या आजारात डायलिसीस नियमितपणे करावे लागते.

डायलिसीस (रक्ताची धुलाई-गाळणे)

डायलिसीस म्हणजे मूत्रपिंडाचे काम कृत्रिमरित्या करणे. म्हणजे रक्तातील युरिया, इ. पदार्थ धऊन टाकणे. यासाठी वेगवेगळी तंत्रे उपलब्ध आहेत.

पेरिटोनियल (पोटाचे) डायलिसीस - पोटात आतडयांवर सर्वत्र एक सूक्ष्म पदर असतो. याचा वापर करून रक्तातले नको असलेले काही पदार्थ बाहेर आणता येतात. यासाठी पोटाच्या या आवरणात द्रवपदार्थ 20-30 मिनिटे सोडला जातो. रक्तातले काही पदार्थ भौतिकशास्त्राच्या नियमानुसार या द्रवात येतात. मग हा द्रव काढून टाकला जातो. यानंतर ही प्रक्रिया काही वेळा परत परत केली जाते. कोणत्याही छोटया रुग्णालयात हा उपचार करता येतो. त्यात काही धोका असतो पण योग्य प्रशिक्षणाने तो कमी होतो. नवीन तंत्रे उपलब्ध झाल्याने हे तंत्र थोडे मागे पडले आहे.

पोटाचे सततचे डायलिसीस

रुग्णालयापासून दूर राहणाऱ्या रुग्णांना याचा विशेष उपयोग आहे. यासाठी एक टेफ्लॉन नळी कायमची पोटाच्या पोकळीत बसवली जाते. यात 2 लिटर द्रवपदार्थ सोडतात आणि 6 तासांनी तो काढून घेतात. यानंतर परत ताजा द्रवपदार्थ भरला जातो व परत 6तासांनी काढला जातो. ही प्रक्रिया परत परत केली जाते. 24 तासांत 4 वेळा असे करतात. रोजच ही प्रक्रिया केली जाते. यामुळे रुग्ण आपले बाकीचे कार्यक्रम ठरवून पार पाडू शकतो. कधीकधी यात पोटात जंतुदोष होऊ शकतो. या उपचाराचा मासिक खर्च रु.15-25000 पर्यंत जाऊ शकतो.

रक्ताचा डायलिसीस

यामध्ये रक्ताचा प्रवाह बाहेर आणून एका यंत्रात फिरवला जातो. याच यंत्रात दुसऱ्या बाजूला एक द्रवपदार्थ फिरत असतो. रक्त व द्रव एकमेकात मिसळू शकत नाहीत, कारण त्यात एक आधी पातळ पडदा बसवलेला असतो. रक्तातील काही पदार्थ या पडद्यातून द्रवात उतरतात.

हल्ली रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक संगणकयुक्त डायलिसीस मशिन्स उपलब्ध असतात. प्रत्येक रुग्णाला योग्य असे सेटिंग त्यात करता येते.

डायलिसीस यंत्र म्हणजे एक कृत्रिम मूत्रपिंड असते. यात आता खूप सुधारणा झाल्या आहेत. तरीही त्यात धोके व दुष्परिणाम असू शकतात. याचा मासिक खर्चही बराच असतो. म्हणूनच ज्यांना शक्य आहे असे रुग्ण मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करून घेतात.

काही जणांच्या बाबतीत यात निकामी मूत्रपिंडाऐवजी इतर निरोगी व्यक्तीचे मूत्रपिंड बसवण्याची शस्त्रक्रिया केली जाते. प्रत्येकाच्या शरीरात दोन मूत्रपिंडे असतात. त्यातले एखादे दिले तरी शरीराचे अडत नाही. मात्र या शस्त्रक्रिया अत्यंत खर्चीक आणि गुंतागुंतीच्या असतात.

मूत्रपिंड रोपण

डायलिसीसच्या ऐवजी ज्यांना शक्य आहे त्यांना मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया बरी पडते. याचा खर्च सध्या एकूण 5 लाखाच्या आसपास जातो. मूत्रपिंड दान करणारा योग्य दाताही भेटला पाहिजे. मूत्रपिंडाचा काळा व्यापार व गुन्हेगारीचा काही प्रकार उघडकीस आल्याने यासंबंधी आता कायदा झाला आहे.

ज्याला मूत्रपिंड द्यायचे आहे, त्याची पूर्ण तपासणी केली जाते. त्याची स्वत:ची शारीरिक स्थिती निरोगी असायला पाहिजे.  आपल्या देशात अजून मेंदू-मृत व्यक्तीचे मूत्रपिंड काढून बसवण्याची पध्दत अद्याप रुढ झालेली नाही. अपघातात किंवा आजाराने मेंदू निकामी झाला आहे असे रुग्ण रुग्णालयात असतात. योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचे मूत्रपिंड काढता आल्यास बऱ्याच मूत्रपिंड गरजूंना जीवदान मिळू शकते. नुकत्याच मृत झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढताना मूत्रपिंड चांगल्या अवस्थेत पाहिजे. यासाठी ते लवकरात लवकर काढावे लागते आणि थंड राखावे लागते.

मूत्रपिंड काढल्यानंतर ते लवकरात लवकर रुग्णाच्या शरीरात रोपण करतात. यासाठी संबंधित रुग्ण वैद्यकीयदृष्टया पूर्वतयारी करून सज्ज करावा लागतो.

मूत्रपिंड रोपण करताना देणारा आणि घेणारा यांचे रक्तगट, पेशीगट जुळले तरच उपयोग असतो. तसेच घेणाऱ्याच्या शरीरात कर्करोग, एड्स असे आजार नाहीत आणि मानसिक आजार नाही याची खात्री करावी लागते.

एवढे करून काही रुग्णांमध्ये बसवलेले मूत्रपिंड शरीर स्वीकारत नाही. लगेच किंवा कालांतराने हे मूत्रपिंड निकामी होते. यासाठी काही औषधे वर्षभर घ्यावी लागतात. या औषधांचे पण दुष्परिणाम असतात.

हल्ली मूत्रपिंड रोपणाचे शास्त्र खूप प्रगत झाले आहे. त्यामुळे सुमारे 85-90% मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत.

डायलिसीसच्या मानाने यात एकूण जीवनमान व समाधान जास्त असते.

याचा खर्च आज फार असला तरी निवडक शासकीय रुग्णालयात या शस्त्रक्रिया उपलब्ध होणे आवश्यक आहे.

आयुर्वेदामध्ये मूत्रपिंडाच्या विकारांवर अनेक औषधोपचार सुचवले जातात. त्याबद्दल आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने संशोधन अजून तरी अपूर्ण आहे.

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 7/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate