हा अचानक येणारा गंभीर आजार आहे. यात मूत्रपिंडातील पेशींना सूज येते. हा आजार सहसा लहान वयात-शालापूर्व वयात-येतो. ही सूज एक प्रकारच्या जिवाणूंमुळे येते. मात्र याची सुरुवात बहुधा घसादुखीने होते.
मूत्रपिंडदाह या आजाराची लक्षणे सहज कळून येतात. यात चेहऱ्यावर सूज (विशेषतः सकाळी), लघवीचे प्रमाण कमी होणे, लघवी लालसर होणे, धुरकट लालसर लघवी होणे ही प्रमुख लक्षणे आहेत.
अशा मुलांमध्ये चेहऱ्यावर सूज, लघवी कमी होणे या खाणाखुणा दिसतात. त्यांना ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. तपासणीत अशा रुग्णांचा रक्तदाब वाढलेला दिसतो. लघवीत प्रथिने व रक्तपेशी दिसतात. एकूण लघवीचे 24 तासांतले प्रमाण नेहमीपेक्षा कमी (कधीकधी अर्धा लिटरच्या आसपास) आढळते. याबरोबरच कधीकधी ताप,पोटदुखी, उलटी, डोकेदुखी, इत्यादी त्रास आढळतो. डॉक्टरकडून योग्य उपचारानंतर बहुधा हा आजार आटोक्यात येतो. रोगनिदान होण्यात उशीर झाला तर मात्र धोका संभवतो.
तोंडावर सूज येऊन, पावलावरही सूज आली असल्यास मूत्रप्रवृत्ती होण्यासाठी पातळ औषधे देण्यापेक्षा सुंठ, मिरी, पिंपळी, आले यांचा वापर उपयोगी असतो. पुनर्नवासव दोन चमचे + दोन चमचे पाणी, दोन वेळा, सात ते दहा दिवस देतात. त्रिकटूचूर्ण दीड ग्रॅ. ते दोन ग्रॅ. सकाळ-संध्याकाळ तीन दिवस द्यावे; पचनाची शक्ती कमी असल्यास याचा उपयोग होतो. हाताच्या अंगठयाइतके आले व तेवढाच गूळ सकाळी रिकाम्या पोटी घेणे (7 ते 14दिवस). हे अगदी थोडीथोडी सूज असताना चांगले उपयोगी पडते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 4/22/2020
'चक्कर येणे' म्हणजे घेरी किंवा गरगरणे. म्हणजे त्या...
काळपुळी, संसर्गजन्य : (अँथॅक्स). बॅसिलस अँथ्रॅसिस ...
जंतुदूषित व्यक्तींशी केलेल्या लैंगिक संबंधानंतर सु...
रोगनिदान तक्ते आणि मार्गदर्शकांचा योग्य वापर करून ...