फक्त ग्रामीण भागाचा विचार केला तर हे प्रमाण आणखी जास्त होईल. कारण बहुतांश घटना ग्रामीण भागातच घडतात.
या आकडेवारीवरून असे दिसते, की ग्रामीण भागात, शेतीवर काम करणा-या माणसांना, विशेषकरून पावसाळयात सर्पदंश होतात. तसेच ते बहुधा पावलावर आणि थोडया प्रमाणात हातावर, विशेषतः हाताच्या पंज्यावर होतात. यावरून काय काळजी घ्यायची ते कळते.
तरीही एकूण सर्पदंशापैकी सुमारे 80 टक्के घटना ह्या 'बिनविषारी' असतात आणि 20टक्केच विषारी दंश असतात. काही लोक केवळ भीतीने दगावल्याची उदाहरणे आहेत. मात्र वेळेवर आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळाले तर विषारी सर्पदंश झालेल्यांपैकी 90 टक्के व्यक्ती वाचू शकतात.
सापांचे प्रकार अनेक आहेत. त्यात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे. भारतात सापांच्या सुमारे 236 जाती सापडतात. त्यात फक्त 52 जाती विषारी आहेत. त्यातूनही पाच-सहा जातीच जास्त प्रमाणात आढळतात. यात मुख्य म्हणजे नाग, मण्यार, (पट्टेरी) घोणस,फुरसे व काही समुद्री सापांचा समावेश आहे.
एकूण विषारी सर्पदंशापैकी निम्म्याहून अधिक दंश नाग व मण्यार यांचेच असतात. त्याखालोखाल फुरसे, घोणस यांचा नंबर लागतो. नाग व मण्यार ह्यांचे विष मुख्यतः मज्जासंस्थेस तर फुरसे, घोणस यांचे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस घातक असते. विषारी सापाच्या अगदी अंडयातून बाहेर पडलेल्या पिलांनाही थोडे का होईना विष असते. विषाचा उपयोग साप भक्ष्य मिळवण्यासाठी करतात. माणूस हे काही सापांचे भक्ष्य नाही. बेडूक, उंदीर, सरडे, इतर साप,विंचू, इत्यादी प्राणी सापांचे नेहमीचे भक्ष्य आहेत. अपघाताने माणसाचा स्पर्श झाल्यावर किंवा नजीक आल्यावर स्वसंरक्षणार्थ साप चावतो. साधारणपणे प्रत्येक चाव्यात माणसाला पुरून उरेल इतके विष सहज असते. फुरसे मात्र या दृष्टीने निम्मेशिम्मेच विष टोचू शकते.
विषारी सापांना इतर दातांशिवाय विशेष दात असतात. हे विषारी दात वरच्या जबडयाच्या पुढच्या बाजूस दोन्हीकडे असतात. फुरसे, घोणस यांचे दात इंजेक्शनच्या सुईप्रमाणे आतून पोकळ असतात आणि त्यातून विष टोचले जाते. नाग,मण्यार यांच्या दातांना अशी आतून नळी नसते, पण एका बाजूला पन्हळ असते. विष या पन्हळीतून जखमेत उतरते. विषाची पिशवी या विषारी दातांच्या वरच्या बाजूला असते. दंश केल्यावर या पिशव्या आकुंचन पावून विष पिचकारीप्रमाणे सोडले जाते.
या सर्व सापांत मण्यार व घोणस जास्त आक्रमक असून मण्यार हा सर्वात जास्त विषारी समजला जातो. याचे विष नागाहून दहापटीने विषारी असते.
या चार-पाच जातींशिवाय इतर काही प्रकारचे विषारी साप आढळतात. स्थानाप्रमाणे त्यांची नावे वेगवेगळी आहेत. आपल्याकडे आढळणा-या विषारी सापांचा एक विशेष म्हणजे त्यांच्या पोटाकडच्या बाजूस (म्हणजे सरपटताना जमिनीवर लागणा-या बाजूला) असलेले खवले पूर्ण रुंदीचे व एकसंघ असतात. म्हणजेच ते सापाच्या रुंदीइतके अखंड असतात. बहुतेक बिनविषारी सापांमध्ये हे खवले तुकडयातुकडयांचे बनलेले असतात. (याला काही बिनविषारी सापांचा - उदा. विरळा- मात्र अपवाद आहे.)
सर्पदंशानंतर घाबरलेल्या माणसाला साप कोणता आहे हे ओळखणे अवघड आहे. फक्त फणा काढणारा नाग आहे हे लक्षात ठेवणे सोपे असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या सांगण्यावर साप विषारी की बिनविषारी ते ठरवणे अवघड आहे. पण साप पकडून मारून सोबत आणलेला असेल तर विषारी की बिनविषारी हे ठरविता येईल. साप मारताना त्याचे तोंड- डोके ठेचले न जाता अखंड राहिल्यास विषारी दातावरून साप ओळखणे सोपे जाते. तरीही मण्यार (पट्टेरी), घोणस (नक्षी) यांची ओळख चुकत नाही.
सर्पविषात अनेक प्रकारची विषारी द्रव्ये असतात. त्यात मुख्यतः प्रथिने असतात. सर्पविषांच्या परिणामांच्या दृष्टीने 3 प्रकार होतात.
मण्यार, नाग यांचे विष मुख्यतः चेतासंस्था निकामी करते. त्यामुळे मूलभूत स्वरूपाच्या शारीरिक क्रिया (उदा. श्वसन) बंद पडायला लागतात. या विषाचे परिणाम मुख्यतः चेतातंतू व स्नायूपेशी यांना जोडणा-या जागी होतात. त्यामुळे निरनिराळया स्नायूंचे काम बंद पडते. पापण्या जडावणे, गिळता न येणे, श्वसनाचे स्नायू निकामी होणे, इत्यादी घटना या क्रियेमुळेच घडतात. निओस्टिग्मीन नावाचे औषध वापरून हा विषारी परिणाम तात्पुरता उलटवता येतो. या औषधाच्या वापराने सर्पदंश झालेल्या व्यक्तींपैकी अनेकांना वाचवणे अगदी शक्य आहे.
नागाच्या विषामध्ये वरील विषाबरोबरच हृदयक्रिया बंद पाडणारे विषही असते. नागदंशानंतर तात्काळ मृत्यू आल्याच्या घटना सहसा याच विषामुळे घडतात.
शरीरात खेळत असलेले रक्त रक्ताभिसरणसंस्थेतच बंदिस्त असते. रक्ताभिसरणसंस्थेला छोटेसे जरी छिद्र पडले तरी ताबडतोब त्या ठिकाणी रक्तकणिका आणि प्रथिने जमतात. तिथे यामुळे रक्ताची एक गाठ बनून छिद्र बंद होते. सगळे रक्त शेवटी पेशींच्या जाळयातून सूक्ष्म केशवाहिन्यांमार्फत खेळवले जाते. केशवाहिन्यांचे जाळे मजबूत राहण्यासाठी या गोठण यंत्रणेची फार आवश्यकता असते.
सापाच्या रक्तविषांमुळे ही गाठ होण्याची क्रिया बंद पडते. यामुळे जिथे छिद्र सापडेल तिथे रक्तस्राव चालू होतो. हिरडया, सर्पदंशाची जागा (दातांच्या खुणा) यातून सर्वात आधी रक्तस्राव होतो. नाक, मूत्रपिंडे, गुदद्वार, जठर, फुप्फुसे,मेंदू, हृदय, इत्यादी अनेक अवयवांत यानंतर रक्तस्राव होतो. वेळीच उपचार झाले नाही तर मृत्यू ओढवतो.
सर्पविष शरीरात पसरण्याचा मुख्य रस्ता म्हणजे लस किंवा रसवाहिन्या. या वाहिन्यांमधला प्रवाह थोडा दाब दिला तरी थांबतो. म्हणून सर्पदंशाच्या पूर्ण अवयवाला हलके इलॅस्टिक बँडेज (आवळपट्टी) बांधणे हा चांगला प्रथमोपचार आहे.
साप चावल्यावर घाबरणार नाही असा माणूस विरळा. काही लोक तर केवळ भीतीपोटी दगावल्याची उदाहरणे आहेत.
चावणारा साप बिनविषारी असेल तर दातांच्या खुणा अर्धवर्तुळाकार रचनेत असतात. एक किंवा दोन दातांच्या खुणा असतील तर मात्र विषारी असण्याचा संभव असतो. कारण विषारी सापांचे विषारी दात हे इतर सापांच्या दातांपेक्षा लांब व तीक्ष्ण असतात. त्यामुळे विषारी दातांच्याच एक-दोन खुणा होतात.
सर्पविषाच्या इतर परिणामांचे स्वरूप हे सापाच्या जातीवर अवलंबून असते. किती विष शरीरात टोचले गेले आहे यावर परिणाम किती वेळाने व वेगाने होतात ते अवलंबून असते.
नाग, मण्यार ह्यांचे विष चेतासंस्थेवर तर फुरसे, घोणस यांचे विष रक्तावर बाधक असल्याने दोन्ही गटांची लक्षणे व चिन्हे वेगवेगळी असतात.
मण्यार, नाग यांच्या दंशानंतर अर्ध्या तासात किंवा त्याहून लवकर लक्षणे व चिन्हे दिसायला लागतात. मात्र चावून पंधरा तास गेले तरी काहीच परिणाम होत नसल्यास,सर्पदंश झाला असेल पण विष नाही, असा त्याचा अर्थ काढता येईल.
घोणस, फुरसे यांच्या दंशानंतर कमीअधिक वेळात रक्तस्राव चालू होतो. नाग-मण्यार यांच्या तुलनेने मात्र जास्त वेळ लागतो. फुरशाचे विष कमी असल्यामुळे जास्त वेळ लागतो. पण सुमारे दोन तास ते चोवीस तासांपर्यंत कधीही चिन्हे व लक्षणे दिसू लागतात.
परंपरेने चालत आलेले उपचार
सर्पदंशावर अनेक प्रकारचे परंपरागत उपचार केले जातात. मृत्यूशी गाठ असल्याने मांत्रिकांचाही आधार घेतला जातो. एकूण सर्पदंशाच्या घटनांपैकी काहीजण दगावतात तर ब-याच जणांना काहीही होत नाही. यावरून अमुक एक उपचार चांगला किंवा निरुपयोगी असे ठरवणे अवघड आहे. मुळात सर्पदंशाच्या 80 टक्के घटना बिनविषारी दंशाच्या असल्याने उपचार न केला तरी 80 टक्के घटनांच्या बाबतीत 'यश' असते. मात्र वीस टक्के अपयशी घटना विसरल्या जातात किंवा त्यांच्या बाबतीत काहीतरी दैवी कारण किंवा पाप असेल असे समजून सोडून दिले जाते.
देवळात नेण्याचा खरा एकमेव उपयोग म्हणजे धीर देणे. कारण काही जण तरी भीतीनेच दगावतात. पण यात देवळात वेळ गमावण्याचा धोका आहेच. आधुनिक वैद्यकीय सोयी जेवढया उपलब्ध होतील तेवढया प्रमाणात ही अंधश्रध्दा कमी होईल. मंत्राने सर्पविष उतरवणे या अशक्य कोटीतल्या गोष्टी आहेत. अशा उपायांचे निरुपयोगित्व सिध्द करणे फार अवघड नाही. साप खेळवणा-या मांत्रिकांचेच मृत्यू सर्पदंशाने घडल्याच्या घटना आहेत.
योग्य व तत्पर प्रथमोपचारानेच बहुतेक रुग्ण वाचू शकतात. कोणतेही तंत्रमंत्र किंवा नवस केल्याने सर्प विष उतरत नाही. असे सांगणारे नव्वद टक्के लोक हे तो साप मुळात विषारी नसल्यानेच वाचतात. मात्र केवळ भीतीनेही जीव जाऊ शकतो.
1. संबंधित व्यक्तीला आणि कुटुंबातल्या लोकांना धीर दिला पाहिजे. बहुतेक साप बिनविषारी असतात हे त्यांना सांगून धीर द्या.
2. साप चावलेल्या व्यक्तीला आडवे झोपवून शांत राहण्यास सांगितले पाहिजे. त्याला चालायला लावू नये. यामुळे विष लवकर पसरत नाही.
3. बिनविषारी साप असेल तर फक्त जखम धुऊन जंतुनाशक औषध लावले तरी पुरते. मात्र रुग्णाला काही तास नजरेसमोर ठेवणे आवश्यक असते.
4. संपूर्ण हात किंवा पाय लवचीक पट्टीने (इलॅस्टिक क्रेप बँडेज) बांधावा. यामुळे विषारी रक्त सगळीकडे पसरणार नाही. सर्व विष रक्तातून न पसरता मुख्यतः रससंस्था किंवा लसिकातून पसरते. थोडा दाब दिला तरी यातला प्रवाह थांबतो.
5. नंतर त्या हाताला किंवा पायाला लांब काठी बांधावी म्हणजे त्याची जास्त हालचाल होणार नाही.
6. साप चावलेल्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात न्यावे. झापड येत नाही ना किंवा कुठून रक्त वाहत नाही ना याकडे लक्ष ठेवावे.
साप मारलेला असेल तर बरोबर घेऊन जावा. यामुळे निदान करायला मदत होईल. आपल्या भागातील कोणत्या दवाखान्यात सर्पदंशाचा उपचार मिळतो हे आपल्याला माहीत हवे.
लोक सरसकट सगळेच साप मारतात. असे करू नये. धान्याची नासाडी करणा-या उंदरांना साप खातो. आणि सर्वच साप काही विषारी नसतात.
जर रुग्णालय व तज्ज्ञ वैद्यकीयसेवा अर्ध्या तासाच्या अंतरावर असेल तर ताबडतोब रुग्णालयात नेणे चांगलेच. हे करीत असताना वाहनाची जुळवाजुळव, प्रवास, इत्यादी वेळात प्रथमोपचार करावेत.
समजा रुग्णालय फार लांब असेल, वाहनाची सोय नसेल, साप विषारी असेल आणि सर्पाच्या विषलक्षणांचीही सुरुवात दिसत असेल तर अशा परिस्थितीत काय करणार? अशी अवघड परिस्थिती उभी असेल तर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काही तरी करणे आवश्यकच आहे. अशा दुर्गम गावांमधल्या वैद्यकीय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण व तयारी अधिक चांगली पहिजे. सुदैवाने सर्पदंशावर खूप चांगले उपचार उपलब्ध आहेत. त्यातला थोडाफार धोका पत्करून जमेल तितका प्रयत्न केला पाहिजे. म्हणून उपचाराचा भाग खाली जरा विस्ताराने दिला आहे.
- चावलेला साप विषारी की बिनविषारी आहे हे माहीत नसल्यास सर्पविषाच्या लक्षणांची व चिन्हांची सुरुवात दिसत असेल तरच उपचार करा.
- साप विषारी आहे अशी खात्री किंवा पुरेसा संशय असल्यास उपचार सुरू करावेत हे चांगले.
नाग-मण्यार व घोणस-फुरसे यांची विषे वेगवेगळी असतात. पण या सर्व विषांना निकामी करणारा उतारा एकत्र केलेल्या स्वरूपात मिळतो. हे इंजेक्शन घोडयाच्या शरीरात सर्पविषे टोचून रक्तामध्ये जी प्रतिघटके तयार होतात त्या रक्तापासून बनवलेली असतात व ही सर्व प्रथिने असतात. हा पदार्थ कोरडया स्वरूपात मिळतो आणि त्याला ठेवायला फ्रिजची गरज लागत नाही. शुध्द पाणी ठरावीक प्रमाणात मिसळून हे इंजेक्शन तयार करता येते. या इंजेक्शनला 'ऍंटी-स्नेक' व्हेनम' (म्हणजे सर्पविषाविरुध्दचा उतारा) असेम्हणतात. या औषधाने रक्तातल्या सर्पविषाचे सूक्ष्म कण नष्ट केले जातात.
भारतातील सर्व प्रमुख जातींच्या विषारी सापांचे विष वापरून हे तयार केलेले असल्याने कोठल्याही सर्पविषावर हे गुणकारी आहे. पण सर्पविष आधीच शरीरातील निरनिराळया अवयवांत भिनलेले असेल तर मात्र याचा उपयोग होत नाही. विषाचे अवयवावर जे दुष्परिणाम आधीच सुरू झालेले असतात ते तसेच राहतात. म्हणूनच सर्पविषावरचा उतारा लवकरात लवकर दिला गेला पाहिजे. याची सहसा तीन इंजेक्शने पुरतात. पण कधीकधी जास्त इंजेक्शने द्यावी लागतात. हे इंजेक्शन शिरेतून किंवा सलाईनमधून देतात.
सर्पविष उता-याला पेनिसिलीनप्रमाणे रिऍक्शन (प्रतिक्रिया) येऊ शकते. अंगावर लाल गांध उठणे, चक्कर येणे, रक्तदाब अचानक कमी होणे, जुलाब होणे, इत्यादी परिणाम शंभरात एखाद्या बाबतीत घडू शकतात. पण हा 'रिऍक्शन' चा धोका सर्पविषाच्या धोक्याशी तुलना करता परवडण्यासारखा आहे व त्यावर उपचारही करता येतात (ऍड्रेनॅलिनचे एक इंजेक्शन स्नायूमध्ये व इतर काही उपाय. पहा : पेनिसिलीनवरची रिऍक्शन).
नाग, मण्यार यांच्या विषांमुळे श्वसनक्रिया, विशेषतः चेतासंस्थेचे कामकाज बंद पडते हे आपण पाहिले आहे. एकदा ही क्रिया सुरू झाली तर, नुसत्या सर्पविषउता-याने थांबवता येत नाही. यासाठी ऍट्रोपीन + निओस्टिग्मीन ही दोन इंजेक्शने शिरेतून दर अर्ध्या तासाने द्यावी लागतात. यातले निओस्टिग्मीन श्वसन व इतर क्रिया चालू ठेवण्यास मदत करते. एकदा हे इंजेक्शन दिले की अर्धा तास जीवदान मिळते. तेवढया वेळात अगदी अत्यवस्थ रुग्णही आपण रुग्णालयात पोहोचवू शकतो. पापण्या जडावण्याची चिन्हे दिसल्या-दिसल्या हे इंजेक्शन दिले गेले पाहिजे. या चिन्हावर लक्ष असावे म्हणून रुग्णास झोपू देऊ नये. कारण रुग्ण झोपल्यास पापण्या जडावण्याची काहीही सूचना मिळणार नाही. उलट रुग्णास बोलते ठेवून पापण्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे.
श्वसनसंस्थेवर काय परिणाम होत आहे हे जोखण्यासाठी एका दमात रुग्णास जेवढे आकडे मोजता येतील तेवढे मोजायला लावावेत. पूर्वीपेक्षा आकडा मोजणे कमी पडत असेल तर श्वसनक्रियेवर दुष्परिणाम होत आहे असे म्हणता येईल. निओस्टिग्मीन या इंजेक्शनामुळे नाग किंवा मण्यारदंशाच्या उपचारात फार सुधारणा झाली आहे. यामुळे रुग्ण वाचण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे.
फुरसे, घोणस यांचे विष रक्तस्राव घडवून आणते हे आपण पाहिले आहे. आधीच खूप रक्तस्राव झाला असल्यास रक्त द्यावे लागते. हे उपचार सुसज्ज रुग्णालयातच होऊ शकतील.
फुरसे, घोणस यांच्या दंशाच्या जागी खूप सूज येते व जखम चिघळते. कधीकधी संबंधित भाग सडून काळा पडतो. हा सगळा सर्पविषाचा परिणाम असतो. वेळीच उपचार झाले तर हे काही अंशी टाळता येते. पण जखम नंतर जंतुदोषामुळे जास्त चिघळते. यावर व्यवस्थित मलमपट्टी,जंतुविरोधी औषधे देऊन उपचार करावे लागतात.
एकूणच सर्पदंशाचा उपचार हा खूप जोखमीचा असतो. विषारीपणाची खात्री झाल्याझाल्या ताबडतोब चांगले उपचार सुरू झाले तर जीव वाचण्याची खूप चांगली शक्यता असते. यात जेवढा उशीर होईल तेवढे नुकसान अधिक. गावपातळीवर आपण काय आणि किती करू शकू हे रुग्णालयातल्या पुढच्या उपचारांइतकेच महत्त्वाचे आहे. चांगले उपचार झाले तर विषारी दंश झालेल्यापैकी 70-80 टक्के व्यक्ती वाचू शकतात हे निश्चित.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...