অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोट व पचनसंस्था तपासणी

पचनसंस्थेची तपासणी म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंतची तपासणी. पचनसंस्था, यकृत, पांथरी यांचे चित्र पाहिल्यावर पोटाच्या आत कोठेकोठे काय असते याची कल्पना येते. यासाठी पोटाचा 'नकाशा' उपयोगी पडेल. यात नऊ भाग असतात. प्रत्येक भागात वेगवेगळे अवयव असतात.

निरीक्षण

पोट नुसते पाहून ब-याच गोष्टी लक्षात येतील.

  • पोटावर सूज, फुगार असेल तर पोटाच्या आतल्या आवरणात पाणी साठले असण्याची शक्यता आहे.
  • शिरा फुगलेल्या दिसत असल्या तर आतल्या रक्तप्रवाहात अडथळा आलेला असेल.
  • पोटावर कोठे फुगवटा असेल तर आत एखादी गाठ असू शकते.

चाचपणी

पोट हाताने चाचपून तपासतात. मुख्यत: आत गाठ गोळा वगैरे लागतो काय व यकृत, पांथरी हे प्रमाणापेक्षा मोठे झाले आहेत काय आणि दुखरेपणा आहे काय हे शोधण्यासाठी ही तपासणी असते.

उजव्या बरगडीखाली यकृत व डाव्या बरगडीखाली पांथरी असते. यकृत व पांथरी वाढून मोठी झाली आहे का हे तपासण्याची विशिष्ट पध्दत आहे. काही वेळा यकृतावर दुखरेपणा असतो (उदा. कावीळ झाली असताना).

मात्र हाताने चाचपून पोटात जंत आहेत किंवा नाहीत ते सांगणे अशक्य आहे.

आवाजनळीने तपासणी

आवाजनळीने पोटावर जागोजाग तपासले असता ब-याच प्रकारचे आवाज ऐकू येतात. जठरावर आवाजनळी लावली तरी भुकेची गुरगुर,हवेचे बुडबुडे, अन्नाची घुसळण वगैरे ऐकू येतील. आवाजनळी आतडयावर आली असेल तर हवेचे मागेपुढे जाणे, पातळ अन्नाचे थेंबथेंब टपकणे,अन्नरस पुढे ढकलण्याचा आवाज ऐकू येतील. गॅस किंवा वायू साठून आतडे फुगले असेल तर हवेचा व त्या पोकळीत थेंबथेंब पडल्याचा आवाज ऐकू येईल. आतडयाचा रस्ता काही कारणाने बंद झाला असेल तर मात्र हे आवाज हळूहळू मंदावतात व शेवटी बंद पडतात. फक्त मधूनमधून अन्न किंवा रस थेंबथेंब टपकण्याचा आवाजच शिल्लक राहतो.

म्हणूनच पोटाच्या ऑपरेशननंतर आवाजनळीने आतडयाची क्रिया चालू झाली ना हे वारंवार तपासतात. ब-याच वेळा पोटाच्या ऑपरेशननंतर किंवा भुलीनंतर आतडयाची हालचाल चार-पाच तास मंदावते किंवा बंद पडते. हालचाल बंद पडणे व परत चालू होणे दोन्हीही आवाजनळीच्या मदतीने कळते.

गुदाशय तपासणी

गुदाशय तपासल्याखेरीज पचनसंस्थेची तपासणी पूर्ण होत नाही असा दंडक आहे. प्रत्यक्षात तो फारसा पाळला जात नाही. गुदाशय तपासण्याचे मुख्य कारण म्हणजे गुदद्वाराचा कर्करोग आणि मूळव्याध होय. गुदाशयाची तपासणी दोन प्रकारे करतात. एक म्हणजे हाताच्या बोटावर रबरी मोजा चढवून त्याला तेलकट पदार्थ लावून गुदाशय आतून तपासले जाते. बोटाला काही विचित्र गाठीसारखे आढळले तर उतारवयात कर्करोगाची शक्यता लक्षात घेतली पाहिजे.

तपासणीचा दुसरा प्रकार म्हणजे एक नळी तेलाने गुळगुळीत करून गुदाशयात सारतात. आत बॅटरीचा प्रकाश टाकून काही दोष आहे की काय हे पाहतात.

मूळव्याध अथवा मोड (पाईल्स) असल्यास ते डोळयाला दिसतात किंवा हाताला लागतात. काही वेळा बध्दकोष्ठतेमुळे गुदद्वाराच्या तोंडाशी छोटीशी जखम (गुदद्वारव्रण) झालेली असते व ती खूप दुखते.

उदराची सोनोग्राफी तपासणी

गेल्या दहा वर्षात सोनोग्राफी तपासणीची सोय सर्वत्र उपलब्ध आहे. ही तपासणी स्वस्त व निर्धोक आहे. पोटातील इंद्रियांना काही आजार आहे हे तपासण्यासाठी या तपासणीचा फार उपयोग होतो. या तपासणीत खालील दोष कळू शकतात.

  • जठर, पांथरी यांचा आकार, सूज.
  • पोटातल्या कोणत्याही अवयवात खडे झाले असल्यास
  • कर्करोगाच्या गाठी
  • पाणी, पू जमा झाले असल्यास
  • आतडयांची मोठी सूज
  • मूत्रपिंडाचा आकार,सूज
  • मूत्राशयाचा आकार, प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ.
  • गर्भाशय, गर्भ, स्त्रीबीजांडे, इ. ची स्थिती.

मात्र ऍपेंडिक्स सूज हा आजार सोनोग्राफी तपासणीत दिसू शकत नाही.

नलिका दुर्बीण तपासणी

अन्ननलिका, जठर, मोठे आतडे या अवयवांची या तंत्राने आतून तपासणी करता येते. पोटाला छोटे छिद्र पाडून उदरपोकळीतले अवयवही या तंत्राने तपासता येतात.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 6/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate