नवीन रक्त जसजसे तयार होते तसतशा जुन्या रक्तपेशी मोडीत निघतात. यातले रक्तद्रव्य यकृतात विरघळून त्यातून एक पिवळा पदार्थ (बिलिरुबीन) निर्माण होतो. तो पिवळा पदार्थ शौचावाटे बाहेर पडतो म्हणून विष्ठा रंगाने पिवळी असते. या पिवळया पदार्थाचे रक्तातले प्रमाणे वाढणे यालाच'कावीळ' म्हणतात. हा पदार्थ रक्तात प्रमाणाबाहेर उतरल्याने लघवीही जास्त पिवळी दिसते. डोळे, त्वचा पिवळे दिसतात.
काविळीचे तीन प्रकार
लाल रक्तपेशींचा वेगाने नाश होऊन पिवळा पदार्थ जादा तयार होणे. लहान बाळाची पहिल्या दोन-तीन दिवसांतली कावीळ या प्रकारची असते. याचे कारण ओव्हर लोड किंवा अतिरिक्त रक्तद्रव्य. पित्तमार्गात अडथळा येऊन यकृतात पित्त साठून रक्तात उतरणे (उदा. पित्तखडे,यकृताचा कर्करोग)
यकृत सुजेची कावीळ
यकृताचे कामकाज आजाराने मंद होऊन हे पिवळे द्रव्य रक्तात साठून राहते. (उदा. दूषित पाण्यामुळे किंवा दूषित इंजेक्शनने येणारी सांसर्गिक कावीळ) यकृताच्या आजारामुळे होणारी कावीळ मोठया प्रमाणावर आढळते. विषाणू काविळीचे दोन मुख्य प्रकार आहेत. अ व ई कावीळ : याची पचनसंस्थेतून लागण होते. बी,सी, डी कावीळ रक्तातून व लैंगिक संबंधातून पसरते. ए आणि ई प्रकारची कावीळ (तोंडातून प्रवेश) ए काविळीचे विषाणू रुग्णाकडून विष्ठेमार्फत आणि दूषित अन्नपाण्यामार्फत इतरांकडे पसरतात. प्रदूषित समुद्री मासळीनेही हे विषाणू पसरतात. उकळण्यामुळे 1 मिनिटात हे विषाणू नष्ट होतात. सहसा भारतात लहान वयातच हा संसर्ग होतो व त्यानंतर प्रतिकारशक्ती निर्माण होते. म्हणूनच प्रौढ वयात हा आजार सहसा दिसून येत नाही. मात्र उच्च /मध्यम वर्गात लहानपणी हा आजार क्वचित होतो, म्हणून प्रौढपणी कधीही येऊ शकतो. लहान वयात या आजाराचा त्रासही कमी होतो. यकृतात हे विषाणू बिघाड निर्माण करतात आणि त्यामुळे कावीळ होते. लक्षणे-चिन्हे काही आठवडयांत (15-20 दिवस) दिसायला लागतात. हा आजार जिथे पाणी खराब आहे, अस्वच्छता आहे अशा सर्व ठिकाणी आढळतो. ग्रामीण भागांत व शहरातल्या झोपडपट्टयांत पावसाळयात हा आजार जास्त आढळतो. रोगनिदानासाठी तापाचा तक्ता-मार्गदर्शक पाहा.
रोगनिदान
ए प्रकारचा हा आजार सहसा मुलांमध्ये होतो आणि त्यातील 70% बालकांना काही विशेष त्रास होत नाही. काही जणांना फक्त थोडा ताप व थकवा येतो. मात्र तरुण-प्रौढ वयात संसर्ग झाल्यास आजार दिसतो.
लक्षणे
सतत राहणारा मध्यम ताप, डोकेदुखी, अंगदुखी, भूक नसणे, मळमळ,उलटी व काविळीत येणारा पिवळेपणा किंवा मातकटपणा. पिवळेपणा सर्वात आधी डोळयात दिसतो. लघवी जर्द पिवळी दिसते. काही जणांची विष्ठा पांढुरकी होते. त्वचेखाली बिलिरुबीन साठून शरीरावर खाज सुटते.
चिन्हे
कावीळच असल्याची खात्री करून घ्या. शारीरिक तपासणीत डोळयांत पिवळेपणा दिसल्याशिवाय रोगनिदान करु नये. यकृताची सूज असल्यास पोटाच्या उजव्या बाजूला हाताने दाबून दुखरेपणा आढळतो. यकृताचा आकार वाढत असल्यास ते धोकादायक असते.
लघवीची साधी तपासणी
लघवीच्या तपासणीत काविळीचे प्राथमिक निदान होऊ शकते. लघवी तपासणीची ही एक सोपी पध्दत आहे. एका परीक्षानळीत किंवा लांबट बाटलीत (बाटली रंगीत नको) लघवी घेऊन ती जोरजोराने हलवा. त्यावर फेस येईल. हा फेस पिवळया रंगाचा असेल आणि टिकून राहात असेल तर कावीळ आहे असे समजावे.
रक्ताची तपासणी
रक्ततपासणीत काविळीचा प्रकार, यकृताला झालेल्या आजाराचे प्रमाण व बिलिरुबीनचे प्रमाण समजते. यामुळे उपचारासाठी आवश्यक असणारी माहिती मिळते.
प्रतिबंधक लस
अ काविळीसाठी इंजेक्शन स्वरुपात लस उपलब्ध आहे. याचा परिणाम 4 वर्षे टिकतो. मात्र याचा खर्च फार (1400 रु.) असल्याने ती परवडत नाही. भारतात याचा संसर्ग आधीच बालवयात झालेला असल्याने त्याचा आपल्याला विशेष उपयोग नाही.
ई प्रकारचे विषाणू
हे विषाणू पण दूषित अन्न - पाण्यावाटे पसरतात. पावसाळयाच्या सुरुवातीस किंवा पूर, इ. वेळी हे विषाणू साथी निर्माण करतात. 'अ' प्रकारचे विषाणू सहसा बालवयात आजार निर्माण करतात तर 'ई' प्रकारचे तरुण आणि प्रौढ वयात जास्त. या साथींमध्ये गरोदर स्त्रियांना जास्त घातक कावीळ होते. त्यामुळे काही स्त्रिया दगावतात देखील. मात्र'ई' प्रकारच्या काविळीत सहसा नंतर काही त्रास उरत नाही. आयुष्यात एकदा झाल्यानंतर हा संसर्ग सहसा परत होत नाही.
काविळीचे दुष्परिणाम
विषाणू-कावीळ 4-8 आठवडयांत बहुधा आपोआप बरी होते. पण काही जणांची कावीळ बरी न होता वाढत जाते व मृत्यू येतो. झोपेचे चक्र बिघडणे किंवा बेशुध्दी, गुंगी या वाढलेल्या काविळीच्या सर्वात महत्त्वाच्या खुणा आहेत. अशी खूण दिसल्यास डॉक्टरकडे पाठवावे. काही महिन्यांनी किंवा वर्षांनी काही रुग्णांना जलोदराचा त्रास चालू होतो. या जलोदराचे कारण म्हणजे यकृत निबर होऊन त्याचे काम बिघडते. रक्तावर नीट प्रक्रिया न झाल्यामुळे खाली पोटात पाणी साठते. काविळीमुळे गरोदरपणात गर्भावरही अनिष्ट परिणाम होतात. या सर्व दुष्परिणामांना वेळीच ओळखून रुग्ण स्त्रियांना डॉक्टरकडे पाठवा. या आजारात गर्भपात करणे आवश्यक ठरू शकते.
रक्तावाटे पसरणारी कावीळ
बी, सी, डी आणि जी प्रकार') काविळीचे आणखी काही प्रकारचे विषाणू तोंडावाटे न येता दूषित इंजेक्शनच्या मार्गाने किंवा लैंगिक संबंधाने येतात. यामुळे होणारा आजार सौम्य असतो. पण नंतर जलोदराचा त्रास होण्याची मात्र जास्त शक्यता असते. याचे विषाणू शरीरात नंतरही बरेच महिने राहतात. या काळात स्त्रीला गर्भ राहिला तर तो विकृत होणे, पोटात मरणे वगैरे दुष्परिणाम होतात. म्हणून गरोदर स्त्रियांना साथीच्या काळात अशा प्रकारच्या काविळीविरुध्द तात्पुरती प्रतिकारशक्ती देणारी लस टोचणे आवश्यक आहे. या लसीचे तीन डोस असतात. या आजाराबद्दल जास्त माहिती लिंगसांसर्गिक आजारांच्या प्रकरणात दिली आहे.
उपचार
काविळीबद्दल बरेच गैरसमज आहेत. माळ बांधणे आणि कावीळ उतरण्याचा काहीएक संबंध नाही. नाकात थेंब टाकून कावीळ बरे करण्याची पध्दतही शास्त्रीयदृष्टया बरोबर की चूक हे माहीत नाही. तसेच कावीळ म्हटले की 'लावा सलाईन' हा खाक्याही निरर्थक आहे. रुग्ण खूप आजारी असेल तरच रुग्णालयात दाखल करावे लागते. काविळीचे विषाणू कोठल्याही औषधाने मरत नाहीत. कावीळ आपोआप हटते किंवा क्वचित रोगी दगावतो. फक्त रोग्याला भूक लागत नसते. मळमळ होते म्हणून उसाचा रस, साखरपाणी वगैरे देणे बरोबर आहे. याच्या पलीकडे औषध नाही. दारू पिणा-यांनी किमान सहा महिने दारू बंद केली पाहिजे. दारू ही यकृताला अत्यंत घातक आहे. काविळीत यकृत नाजूक होते. त्यामुळे काविळीत अनावश्यक औषधे टाळावीत. माळ बांधणे व सलाईन-टॉनिक-इंजेक्शन देणे या अनावश्यक, निरुपयोगी गोष्टी आहेत. काविळीत पूर्ण विश्रांती आवश्यक असते. 'बी, सी, डी ' प्रकारची (एका वेगळया प्रकारचे विषाणू) कावीळ असेल तर लैंगिक संबंध टाळावा. कारण हा प्रकार लिंगसांसर्गिक आहे. कावीळ असताना तेल, तूप टाळावे असा सार्वत्रिक समज आहे, पण आधुनिक शास्त्रात असे सांगितलेले नाही. मात्र आयुर्वेदात काही पथ्यापथ्य सांगितलेले आहे. तापासाठी पॅमाल द्यावे. मळमळ किंवा त्वचेची खाज यांवर प्रोमेझिनची गोळी द्या. एवढाच औषधोपचार ऍलोपथीत आहे. कावीळ हा आजार त्रासदायक व काही प्रमाणात धोकादायक आहे. आधुनिक शास्त्रात त्याला अद्यापि औषध मिळालेले नाही. मात्र आयुर्वेदिक शास्त्रात बरीच औषधे दिली जातात. काविळीवर खेडोपाडी ब-याच प्रकारचे उपचार केले जातात. ही औषधे खरोखर परिणामकारक, सुरक्षित आहेत की नाही हे सिध्द होणे आवश्यक आहे. परंतु या विषाणूवर अजून मारक औषध नसल्याने प्रतिबंधक उपायानेच या रोगाचे नियंत्रण केले पाहिजे. स्वच्छता, शुध्द पाणी, चांगले राहणीमान हेच खरे यासाठी प्रतिबंधक उपाय आहेत. दूषित इंजेक्शन-सिरींज वापराने ही बी-कावीळ पसरू शकते. यासाठी जैव कचरा विल्हेवाट चांगली असली पाहिजे
आयुर्वेद व पारंपरिक उपचार
कावीळ या सांसर्गिक आजारावर अनेक प्रकारचे उपाय आहेत. सगळयांत सोपा उपाय म्हणजे भुईंआवळा. ही पावसाळयात वाढणारी एक वनस्पती असते.12-15 इंचाचे हे पूर्ण रोप (मुळासकट) कुटून त्याचा रस करावा.यासाठी त्यात थोडे पाणी मिसळावे लागते. हे दोन-तीन चमचे याप्रमाणे दिवसातून दोन-तीन वेळा द्यावा. असे कावीळ बरी होईपर्यंत रोज द्यावे. काविळीचा विकार पावसाळयात जास्त प्रमाणात आढळतो. याच काळात ही वनस्पती खूप आढळते. ही वनस्पती वाळवून चूर्ण करून ठेवून गरज पडल्यावर पाणी मिसळून वापरता येते. पण यात ओल्या वनस्पतीपेक्षा कमी गुणवत्ता असते. आणखी एक उपाय म्हणजे आरोग्यवर्धिनी गोळी 500 मि.ग्रॅमच्या दोन गोळया दिवसातून तीन वेळा याप्रमाणे सात दिवस द्याव्यात. आरोग्यवर्धिनीबरोबरच कुमारी आसव2 चमचे + 2 चमचे पाणी द्यावे. काविळीत लघवीचा रंग लालसर असल्यास एरंडाच्या 1-2 पानांचा देठासह रस द्यावा. हा रस सकाळी रिकाम्या पोटी 4-5 दिवस रोज द्यावा. जेव्हा लघवीचा रंग पिवळा पण विष्ठा पांढरट असेल तेव्हा पित्तरसाचा आतडयात येण्याचा मार्ग बंद झालेला असतो. अशावेळी सैंधवमीठ 2 ग्रॅम व त्रिकटू चूर्ण 2 ग्रॅम 3दिवसांपर्यंत देत राहावे. या उपायाने सुजेचा अडथळा दूर होऊन पित्ताचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र गाठ, खडा यांमुळे अडथळा असेल तर पित्तमार्गावर शस्त्रक्रियाच करावी लागेल. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काविळीत तेलकट, पचावयास जड असलेले पदार्थ व मिठाई हे वर्ज्य आहेत. मात्र अल्प प्रमाणात गाईचे तूप (10-20मि.ली.) हे पित्त कमी करते म्हणून देत राहावे; मना करू नये. आयुर्वेद काविळीच्या उपचारात, तेल व तूप यांना सारखे मानत नाही. तेल, डालडा, वनस्पती तूप हे पित्तकारक तर साजूक तूप हे पित्तशामक आहे. जास्त पिवळेपणा असलेल्या काविळीत आधी दोन-तीन दिवस रोज सकाळी 15-20मि.ली. तूप देऊन तिस-या दिवशी रात्री जेवणानंतर आरग्वध (बहावा/ अमलताश) मगज15-20 ग्रॅम पाण्याबरोबर द्यावा. आरग्वध मगज हा गाभुळ चिंचेसारखा पदार्थ असता. यामुळे सौम्य जुलाब होऊन अन्नमार्गातले पित्त पडून जाते. लघवीचा पिवळेपणा, मळमळ, यकृताचा दुखरेपणा कमी होणे, भूक सुधारणे, त्वचेची खाज कमी होणे या लक्षणांवरून कावीळ बरी होत असल्याचे समजावे.
होमिओपथी निवड
आर्सेनिकम, ब्रायोनिया, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला, सल्फर
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या