हिरडयांवर अनेक कारणांनी सूज येते
तोंडाची स्वच्छता न राखल्यामुळे 'क' जीवनसत्त्व (पालेभाज्या, लिंबू, आवळा, संत्री) कमी पडल्यामुळे. हिरडयांवर सूज असेल तर हिरडया सळसळतात, शिवशिवतात, कधीकधी ठणकतात. मात्र हिरडया ठणकणे म्हणजे पू झालेला असतो. मिश्रीची सवय असल्यासही हिरडयांना त्रास होऊ शकतो. गोड पदार्थ, जास्त शिजवलेले पदार्थ व पिठूळ पदार्थ, इत्यादींनी दातांच्या फटीमध्ये अन्नकण राहतात. यामुळे दात व हिरडयांचे रोग लवकर होतात. कीटण चढले असल्यास, तोंडात दुर्गंधी येत असल्यास, हिरडयांतून पू व रक्त येत असल्यास दंतवैद्याकडून वेळीच उपचार करावे. ब-याच जणांच्या दातांवर एक प्रकारचे कठीण पिवळे कीटण चढते. यामुळे हिरडया व दात यांमध्ये फट तयार होते. अन्नकण यात अडकून कुजतात व दुर्गंध येतो, कीटणामुळे हिरडयांची हानी होते. यामुळे दातांचा मुळाकडचा भाग उघडा पडत जातो. या सर्व घटनाक्रमामुळे हिरडयातून पू व रक्त येते. यामुळे हळूहळू दात दुबळे होऊन पडतात. दातांवर कीटण न चढेल इतकी स्वच्छता रोज पाळणे आवश्यक आहे. ब्रशचा वापर करताना हा उद्देश लक्षात ठेवावा. दातांची योग्य निगा ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे.
उपचार
'क' जीवनसत्त्वाची गोळी रोज एक याप्रमाणे 5 दिवस द्यावी किंवा त्याऐवजी आवळा, लिंबू वगैरे 4-5 दिवस खाण्यात यावे.
मिठाच्या पाण्याने चुळा भरून तोंड स्वच्छ ठेवावे. झोपताना देखील चुळा भरून स्वच्छता ठेवावी
चॉकलेट, गोळयांची सवय असलेल्या मुलांचे दात लवकर किडतात, त्यामुळे या सवयीवर नियंत्रण ठेवावे. होमिओपथी निवड नायट्रिक ऍसिड, एपिस, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, फेरम फॉस, हेपार सल्फ,लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर
दातांची व हिरडयांची स्वच्छता
दात घासण्यासाठी चांगला ब्रश आणि पेस्ट लागते. ब्रशच्या केसांनी दातांच्या फटीतील घाण व अन्नकण निघू शकतात. ब्रश आडवा धरून खालीवर फिरवणे आवश्यक आहे. ब्रश नसल्यास दात घासण्यासाठी बाभूळ, कडूनिंब, वड, रूई यांचे दातवण चालेल. यांच्या करंगळीएवढया जाड अशा एक वीत लांबीच्या काडया दातवण म्हणून वापराव्यात. प्रथम काडीचा भाग चावून मऊ करावा. मग दातवणाच्या कुंचल्यासारख्या झालेल्या टोकाने दात स्वच्छ करावेत. रात्री जेवणानंतरही दात ब्रश किंवा दातवणाने साफ करणे आवश्यक आहे. प्रत्येक जेवणानंतर ताबडतोब खळखळून चूळ भरणे आवश्यक आहे. बोटाने हिरडया चोळाव्यात. शक्यतो अर्ध्या तासाच्या आतच चूळ भरणे आवश्यक आहे. दातावर कीटण चढू न देणे हे महत्त्वाचे आहे. गोड पेस्टपेक्षा तुरट, कडू चवीच्या पेस्टने स्वच्छता चांगली होते. टुथपेस्ट नसल्यास ब्रश व दंतमंजनाचा वापर करता येईल.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या