गुटखा म्हणजे तंबाखू, चुना,सुपारी व एक विषारी द्रव्य आणि सुगंधी मसाला, इ. चे मिश्रण असते. अनेक नावांनी गुटखा विकला जातो. पान मसाला, गुटखा, सुपारी, आदी पदार्थ चघळणाच्या सवयीमुळे हा आजार दिसून येतो. या आजारात तोंडातल्या मऊ त्वचेखालील भाग निबर होत जातो. यामुळे तोंडाची हालचाल आखडत जाते. तोंडात पांढरट चट्टे दिसू लागतात. हा चट्टा बोटाने चाचपता येतो. जीभेवरही पांढरट डाग येतात. जीभ 'संगमरवरी' पांढरट गुळगुळीत दिसते.हा आजार हळूहळू काही महिन्यांत वाढतो. दिवसेंदिवस तोंड उघडायला कठीण होऊ लागते. आजार जास्त वाढेपर्यंत त्या व्यक्तीला पुरेसे कळून येत नाही. आणखी एक लक्षण म्हणजे मसाला, तिखट तोंडाला अजिबात लागू देत नाही, खूप झोंबते. या आजारातून पुढे कॅन्सर उद्भवू शकतो.गुटखा विकण्याला महाराष्ट्रात बंदी आहे. काही राजकीय पक्षांनी याबद्दल मोहीम सुरु केली होती. तरीही बेकायदेशीर रित्या गुटखा निरनिराळया नावाने विकला जात आहे. लोकशिक्षण हा यासाठी जास्त चांगला व टिकाऊ उपाय आहे. संपूर्ण भारतातही आता गुटख्याला बंदी लागू झाली आहे.
उपचार
गुटखा रोगावरचा उपायही बरेच दिवस करावा लागतो. (अ) बीटा- कॅरोटीनची रोज एक गोळी याप्रमाणे सहा महिने द्यावी. (ब) काही दंतवैद्य मानवी वारेचे सत्त्व इंजेक्शनच्या स्वरूपात डागाखाली टोचतात. (क) या उपायांबरोबरच आखडलेले तोंड सैल करावे लागते. यासाठी एक गुळगुळीत लाकडी पाचरीसारखी फळी दिवसातून 3-4 वेळा तोंडात 15-20 मिनिटे ठेवावी. रोज थोडी थोडी जास्त पाचर घालावी. यामुळे हळूहळू तोंड सैल होते.
पान मसाला, गुटखा, सुपारी, इ. सवयी पूर्णपणे थांबवाव्यात. यासाठी बंदीबरोबरच लोकशिक्षण करावे लागेल.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या