गळू म्हणजे पू साठणे. बहुधा गळू कातडीत तयार होते. काही जातीच्या सूक्ष्म जिवाणूंमुळे गळवे तयार होतात. गळू तयार होताना सुरुवातीला नुसता लालसरपणा व दुखरेपणा असतो. दोन-तीन दिवसांनंतर ठणकणारी गाठ, सूज तयार होते. त्यावर पांढरेपणा (आतल्या पुवामुळे) दिसतो. हाताच्या बोटांनी चाचपल्यावर ही सूज इतर भागांपेक्षा गरम लागते व बोटांनी दबली जाते. सूजेला घट्टपणा असेल तर गळू अजून पिकलेले नाही असे समजावे. गळवावर पांढरटपणा, मऊपणा असेल तर ते फोडावे
शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर गळवे होण्याची शक्यता वाढते. कुपोषण किंवा मधुमेह, एड्स यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच या आजारांत गळवे होतात.
गळवाचा निचरा होणे आवश्यक असते. पिकलेले गळू बहुधा आपोआप फुटते व दोन-तीन दिवसांत निचरा होतो. नाही तर इंजेक्शनची जरा जाड (म्हणजे 16नंबरची) सुई उकळून (निर्जंतुक करून) गळू फोडायला वापरावी. किंवा दाढीचे नवे ब्लेड वापरून गळवावर बारीक छेद घेता येईल. एकदा पू बाहेर पडायला सुरुवात झाल्यावर हळूहळू दाबून निचरा करता येतो.
जर गळू कापायचे नसेल तर एक-दोन दिवस गरम पाणी, फडके वगैरेंनी चांगला शेक दिला तर गळू फुटायला मदत होईल. गळू फार मोठे असेल किंवा बोट, चेहरा अशा नाजूक ठिकाणी असेल तर भूल देऊन फोडावे लागते.
गळू फोडल्यानंतर शक्य तितका पू बाहेर काढावा यानंतर निर्जंतुक स्वच्छ फडक्याने किंवा कापसाने पट्टी बांधावी. पट्टी भिजल्यावर परत बदलावी. दुखणे कमी होण्यासाठी ऍस्पिरिनची गोळी घ्यावी. गळवातील जिवाणूंचा शरीरात प्रसार होऊ नये आणि सूज मर्यादित राहावी म्हणून जंतुविरोधी गोळयांचा वापर करावा.काहीजण गळवावर जळवा लावून पू काढतात. (मात्र जळवा पू शोषत नाहीत असा काही तज्ज्ञांचा अनुभव आहे)
एपिस,आर्निका, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब,कॉस्टिकम, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, सिलिशिया, सल्फर, थूजा
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/25/2020
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...