जपानीज एन्सेफेलायटीस हा आजार डासांमार्फत होणारा प्राणीजन्य रोग आहे. या रोगाची साथ आशिया खंडातील अनेक देशात अधून मधून उद्भवत आहे. चीन, जपान, कोरिया,इंडोनेशिया, बांगला देश, भारत, इ. देशात या रोगाची साथ मधून मधून येते. या रोगाचा प्रादुर्भाव विशेषतः ग्रामीण भागात आढळून येतो. मात्र शहरानजिकच्या वस्तीत/ झोपडपट्टीतसुध्दा या रोगाची साथ आढळून आली आहे. ग्रामीण भागात तसेच झोपडपट्टीत पुष्कळ डुकरे आढळतात. या डुकरांमध्ये जपानी मेंदूज्वराचे विषाणू मोठया प्रमाणात असतात. क्युलेक्स या डासांच्या मादीद्वारे या विषाणूंचा प्रसार होतो. हे डास डुकरांना चावतात. डुकरांना मात्र या विषाणूपासून काहीही अपाय होत नाही. या डुकरांना चावलेले डास जेव्हा माणसांना चावतात, तेव्हा 9 ते 12 दिवसांनंतर माणसांमध्ये जपानी मेंदूज्वर हा रोग दिसू लागतो. या विषाणूंची बाधा झालेले मादी डास पुढील डासांच्या पिढीत सुध्दा या विषाणूंचा प्रसार करतात. ज्या भागात स्थलांतर करणारे बगळयासारखे पक्षी काही काळ वास्तव्य करतात, तेथेही या पक्ष्यांकडून डासांमार्फत या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या रोगाचा अधिशयन काल 5 ते 15 दिवस असतो. या रोगाचे विषाणू रक्तात फार अल्पकाळ टिकत असल्याने या रोगाचा प्रसार माणसांमार्फत होत नाही. माणसाला झालेला जंतूसंसर्ग त्या व्यक्तीपुरताच मर्यादित राहून थांबतो. या रोगाची लागण लष्करातील सैनिकांना होण्याची जास्त शक्यता असते. तसेच विदेशी प्रवासी जर ग्रामीण भागात एक महिन्याहून अधिक काळ वास्तव्य करणार असतील तर त्यांनाही या रोगाची लागण होण्याची शक्यता असते. या रोगाचे वैशिष्टय म्हणजे या रोगाची साथ मोठया प्रमाणावर कधीही येत नाही. 4-6व्यक्तींना लागण व त्यातील 2 मृत्यू असे काहीसे चित्र आढळून येते. ज्यांना या रोगाची लक्षणे दिसतात त्यापैकी 20 ते 50 टक्के व्यक्ती मृत्युमुखी पडतात. मृत व्यक्तींमध्ये 65वर्षावरील व्यक्तींचे प्रमाण जास्त आढळते.
रोग लक्षणे
या रोगाची बाधा होऊनही बहुतेक व्यक्तींमध्ये या रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत या रोगाची लक्षणे 15 वर्षातील मुलांमध्ये किंवा 65 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळून येतात. मात्र ज्या भागात या रोगाची पूर्वी साथ आलेली नसेल, अशा भागात कोणत्याही वयोगटात रोगाची लक्षणे दिसून येतात. मध्यवर्ती चेतासंस्थेवर- मेंदूवर या रोगाचा प्रभाव दिसून येतो. सुरुवातीला 'फ्लू' सारखी लक्षणे दिसून येतात. ताप येतो, डोके ठणकते, मळमळते,उलटी येणे, जुलाब होणे, इ. लक्षणे दिसून येतात. ज्यांच्या मेंदूस या रोगाच्या विषाणूंमुळे सूज आली असेल अशा थोडया व्यक्तींना जीभ अडखळणे, हात-पाय थरथरणे, चालताना पाय लटपटणे, अर्धांगवायू होणे, इ. लक्षणे दिसतात. या रुग्णात मनाची गोंधळलेली स्थिती होणे, वागणुकीत बदल होणे, इ. लक्षणेही आढळून येतात. या रोगाची लागण प्रसूतिपूर्व काळात गरोदरपणाच्या 6 महिन्याच्या कालावधीत झाल्यास गर्भपात किंवा मुदतपूर्व प्रसूती संभवते.ज्या व्यक्ती मृत्यूच्या तावडीतून सुटतात, त्यापैकी दोन तृतियांश व्यक्तींना या रोगाची कायम स्वरूपी हानी सोसावी लागते. लुळेपणा, कंपवात, मानसिकतेत बदल, मतिमंदपणा,इ. ने त्या व्यक्तीची कायमची हानी होते.
रोगनिदान
या रोगाचे निदान रक्तद्रव्याची तपासणी करून तसेच पाठीच्या मणक्यातील पाणी तपासणी करून करता येते. उपचार या रोगावर कोणतेही प्रभावी औषध नाही. सहाय्यक उपचार, चांगली शुश्रूषा करणे,यास विशेष महत्त्व आहे. अशा संशयित रुग्णास सरळ रुग्णालयात दाखल करावे. हाता-पायात लुळेपणा आलेल्या रुग्णांना पुढे भौतिकोपचार/ व्यायामोपचार देणे आवश्यक असते.
प्रतिबंधक उपाय
(1) डास प्रतिबंधक उपाय - (पहा हिवताप प्रकरण) (2) डुकरांचा बंदोबस्त - या रोगाचे विषाणू डुकरांमध्ये विशेष करून वाढत असल्याने मोकाट डुकरांचा साथग्रस्त क्षेत्रात तात्काळ नायनाट करणे आवश्यक ठरते. वराह पालन केंद्रास मच्छरदाणीप्रमाणे बारीक जाळया असाव्यात, म्हणजे डासांचा संपर्क पाळीव डुकरांशी येणार नाही. (3) प्रतिबंधक लस : या रोगावर 90% गुणकारी लस शोधण्यात यश मिळालेले आहे. नवजात उंदराच्या मेंदूतील विषाणू मारून त्यापासून प्रतिबंधक लस बनविण्यात आलेली आहे. या लसीच्या 3 मात्रा त्वचेखाली इंजेक्शनने घ्याव्या लागतात. प्रथम मात्रा व दुस-या मात्रेत 7 ते 14 दिवसांचे अंतर असावे व तिसरी मात्रा प्रथम मात्रेच्या 28 ते 30 व्या दिवशी घ्यावी. या लसीचा परिणाम तीन वर्षापर्यंतच होत असल्याने दर तीन वर्षांनी बूस्टर मात्रा घेण्याची आवश्यकता असते. लस घेतल्यावर किमान अर्धातास तरी दवाखान्यात लस घेणा-यांनी थांबावे. कारण काही व्यक्तींना या लसीची प्रतिक्रिया येण्याची शक्यता असते. साथग्रस्त भागातील 1 वर्षावरील सर्व व्यक्तींना ही लस देता येते. एक वर्षाच्या आतील अर्भकांना, गरोदर स्त्रियांना, आजारी व्यक्तींना, हृदयविकार, किडनीविकार,यकृतविकार असणा-या कॅन्सरच्या रुग्णांना ही लस देऊ नये. (4) नियमित सर्वेक्षण : आरोग्य यंत्रणेमार्फत अशा लक्षणांचे रुग्ण आढळतात काय,याची नियमितपणे पाहणी करणेही अत्यावश्यक आहे. आपल्यालाही याची माहिती पाहिजे. (5) आरोग्यशिक्षण : लोकांच्या सहकार्यानेच या रोगावर मात करता येणे शक्य होईल. लोकांनी डास चावणार नाही याची काळजी घ्यावी. मच्छरदाणीचा वापर करावा,घरोघरी डासनाशक फवारणी करून घ्यावी, डुकरांच्या वास्तव्यास सामुदायिकरित्या विरोध करावा, डुकरे ही जणू भंग्याचे काम करीत असल्याने उघडयावर शौचास बसणा-यांची सोय होते; परंतु त्याऐवजी सोपा संडास/ सार्वजनिक शौचालयाचा वापर करणे हा प्रभावी उपाय आहे, हे आपण ध्यानात घ्यावे. आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संघटना व जनतेच्या सहकार्याने व समन्वयाने या रोगावर मात करणे अवघड नाही.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या