অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मधुमेह, हृदयरोग जागरुकता

गेल्या वीस-पंचवीस वर्षांत रक्तदाब वाढणे, मधुमेह व हृदयविकार जडणे या आजारांत लक्षणीय वाढ झाली आहे. ही वाढ शहरी वातावरणातील लोकांत तर आहेच; परंतु ग्रामीण भागातील लोकांनादेखील हे आजार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून त्याविषयी अधिक जागरूक राहणे आवश्‍यक आहे.

गेल्या काही दशकांत जगभरात मानवामध्ये विशिष्ट आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या आजारांची निश्‍चित कारणे अद्याप सापडलेली नसली तरी आनुवंशिकता आणि जीवनशैलीतील दोष यांच्या संयोगांमुळे हे विकार होत असावेत, असे शास्त्रज्ञ मानतात.

वाढलेला रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, पित्ताशयातील खडे, रक्तवाहिन्या अरुंद होण्याचे विकार (रोहिणीकाढिण्य), रक्तातील मेदघटकांचे प्रमाण विस्कटणे, वजन वाढणे (स्थूलता), गुडघ्यासारख्या सांध्यांची (शरीराचे वजन पेलणारे सांधे) झीज होणे, मलावरोध, मूळव्याध, पायाच्या शिरा फुगलेल्या दिसणे (व्हेरिकोझ व्हेन्स), हाडांची ठिसुळता वाढणे इत्यादी विकार आपल्या जीवनशैलीतील त्रुटींमुळे होतात.

भारतातदेखील रक्तदाब वाढणे, मधुमेह होणे व हृदयविकार जडणे या आजारांत गेल्या वीस-पंचवीस वर्षांत लक्षणीय वाढ झालेली आढळून येते. ही वाढ शहरी वातावरणात राहणाऱ्या लोकांत नेहमीच जास्त असे; परंतु आता ग्रामीण लोकांतदेखील या आजारांचे प्रमाण बरेच वाढताना आढळत आहे. त्याकडे आपण गंभीरपणे पाहत नाही. त्यासाठी गरज आहे ती आपली जीवनशैली बदलण्याची...

जीवनशैली म्हणजे काय? आपली जीवनशैली अनेक प्रकारे बदलण्याची आवश्‍यकता आहे. आपले आचार आणि आपले विचार, आपले आहार आणि आपले विहार, थोडक्‍यात आपले सर्व व्यवहार, आपली जीवनशैली ठरवतात. या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर आमूलाग्र परिणाम होतो. आपले जीवन म्हणजे ऊर्जेचा योग्य वापर. आपल्याला आहारातून विविध अन्नघटक आणि हवेतून प्राणवायू मिळतो. या अन्नघटकांचा व प्राणवायूचा यथायोग्य वापर होणे शरीरस्वास्थ्यासाठी आवश्‍यक असते.

आपल्या शरीरात १०० ट्रिलियन (एक हजार कोटी) पेशी असतात. या प्रत्येक पेशींमध्ये विविध अणू आणि रेणू एकत्र केले जातात (याला "चय' म्हणतात, जसे संचय म्हणजे जमा करणे) आणि अनेक रेणूंचे विघटन केले जात असते (याला अप-चय म्हणतात). ही संचयाची व विघटनाची कृती चयापचय (मेटॅबॉलिझम्‌) या नावाने ओळखली जाते. चयापचयातील दोषांमुळे शरीरात अनेक दोष निर्माण होतात.

रक्तातील साखर वाढणे किंवा कमी होणे, रक्तातील काही मेदघटक वाढणे, तर काही कमी होणे; काही क्षार किंवा जीवनसत्त्वे कमी पडणे इत्यादी दोष चयापचयातील त्रुटींमुळे होतात. याचप्रमाणे चयापचयातील काही विशिष्ट दोषांमुळे आपल्या शरीरात काही दोषांचा समुच्चय तयार होतो, याला मेटॅबॉलिक सिंड्रोम म्हणतात. मधुमेह, रोहिणीकाढिण्य, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार होण्यामागे हा चयापचयातील दोषांचा समुच्चय मुख्यतः जबाबदार मानला जातो.

या दोषांमध्ये व्यक्तीत पुढील विकार एकवटलेले आढळतात

१) शरीराची ठेवण, पोट सुटलेले असते (कमरेच्या घेराला नितंबाच्या छेदाने भागल्यास पुरुषांत ०.९ व स्त्रियांत ०.८५ या एवढे किंवा कमी गुणोत्तर यावे, यापेक्षा अधिक आल्यास पोट सुटलेले आहे).

२) रक्तदाब १४०/९० पेक्षा कमी नसतो.

३) रक्तातील ट्रायग्लिसराइड्‌स मेदघटक १५० पेक्षा जास्त असणे.

४) उपाशीपोटी रक्तशर्करा ११० पेक्षा जास्त असते.

५) लघवीत आल्बुमिन आढळून येते.

हे दोष एकत्रित येणे हे या आजारांच्या कारणांत महत्त्वाचा हातभार लावतात. हे दोष एकत्र येण्यामागे आपल्या चयापचयात निर्माण झालेला एक दोष महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे आपल्या शरीरातील इन्शुलिन या संप्रेरकाची (हॉर्मोनची) कार्यक्षमता कमी होते. कारण, पेशींची इन्शुलिनच्या परिणामाबाबतची संवेदनक्षमता कमी होते, हा होय. परिणामी शरीरातील इन्शुलिन तयार करणाऱ्या ग्रंथींना अधिकाधिक इन्शुलिन तयार करण्याची प्रेरणा मिळते.

रक्तात इन्शुलिनचे प्रमाण वाढू लागते. निरोगी माणसात इन्शुलिनचे प्रमाण उपाशीपोटी पाच ते आठ मायक्रो युनिट्‌स असते व जेवल्यावर अर्ध्या तासाने ६० ते ८० होते. ते तासाभरात पूर्ववत होते. इन्शुलिन वाढू लागण्याचे शरीरावर अनेक विपरीत परिणाम होतात. इन्शुलिनमुळे मूत्रपिंडातून सोडिअम क्षार शोषला जाऊ लागतो.

परिणामी सूज वाढू लागते, रक्तशर्करा उतरते, मध्येच भूक लागते व खा । खा सुटते, त्यामुळे वजन वाढू लागते. सोडिअम क्षार साचल्याने रक्तदाबदेखील वाढू लागतो. इन्शुलिन स्नायूंच्या पेशींमध्ये पुरेशा क्षमतेने कार्य करीत नसल्याने ऊर्जा निर्माण होत नाही, स्नायू थकतात.

व्यायाम व श्रम होईनासे होतात, पुन्हा वजन व मेद वाढू लागतो. मेदाच्या साठ्यातून मोठ्या प्रमाणात ट्रायग्लिसराईड्‌स रक्तात येऊ लागतात. या ट्रायग्लिसराईड रेणूंच्या विघटनातून "ऍसिटेट' हा रेणू तयार होतो. यकृतात ऍसिटेट आणि ग्लुकोज या रेणूंपासून कोलेस्टेरॉल या रेणूची बांधणी होते. आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलपैकी १०-१५ टक्के आपल्या आहारातून येतो, बाकी ८५ टक्के यकृतात बांधला जातो. सोडिअम रेणूमुळे रक्तदाब वाढतो, कोलेस्टेरॉल वाढलेला असला तर रोहिणीकाढिण्य विकाराला आमंत्रणच मिळते. त्यातून तंबाखूचे कोणत्याही प्रकारचे सेवन घातक ठरते.

हृदयविकाराचा झटका येतो, पक्षाघात होतो, मूत्रपिंडे निकामी होतात, पायांना रक्ताचा पुरवठा न झाल्याने पायाला झालेल्या जखमा भरून येण्यात अडचण भासते. शिवाय इन्शुलिनचे कार्य नीट न झाल्याने मधुमेह होतो. मधुमेहात प्रतिकारशक्ती खालावते. पायाच्या संवेदना बधिर होतात. पायांना झालेल्या लहान-लहान जखमा उग्र रूप धारण करू शकतात. पाय काढण्याची पाळी येऊ शकते.

निरोगी स्वास्थ्य हाच मनःशांतीचा पाया

स्वस्थ बसून राहण्याची सवय बदलावी, लोळत पडण्याऐवजी हालचाल करावी. नियमाने पायी चालावे. जे काम आपल्याला आपल्या हाताने करता येईल, ते काम स्वतः करण्याची सवय लावून घ्यावी. नियमाने व्यायाम करावा. खेळ खेळावेत, योगासने करावीत, सूर्यनमस्कार घालावेत. आपले शरीर आंतर्बाह्य स्वच्छ ठेवावे. शरीरात कोठेही जिवाणू अगर विषाणूंना थारा मिळता कामा नये. दातांच्या व हिरड्यांच्या आरोग्याकडे दक्षतेने पाहिले पाहिजे. वेळोवेळी रक्तदाब व रक्तातील मेदघटकांची पातळी तपासून घ्यावी.

४० वर्षाच्या वयानंतर अशी तपासणी वार्षिक करणे इष्ट असते. रक्तातील साखर दर सहा महिन्यांनी तपासून पाहावी. आपल्या डॉक्‍टरांच्या सल्ल्याने इतर तपासण्या आवश्‍यक असल्यास त्याही गरजेनुसार कराव्यात. मन नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कौटुंबिक जीवनातील स्वास्थ्य हा मनःशांतीचा पाया असतो. सर्वांशी मोकळेपणे विचारविनिमय करीत जावे. श्रद्धा ही मोठी शक्ती असते. प्रार्थना मनाला स्थिरता देऊ शकते.

धर्माचरणाने श्रद्धा बळकट होते व त्यातून मनाला स्थिरता प्राप्त होते. बहुतेक सणावारी सामाजिक गाठीभेटी होतात. संबंध जुळतात. संभाषणातून अनेक फायदे मिळतात. आपले काही गैरसमज झाले असले तर संबंधित व्यक्तींशी मनमोकळेपणे चर्चा करणे इष्ट असते. आपल्या जीवनाचे ध्येय ठरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपल्या आशा-आकांक्षा वास्तव आहेत ना, याचा अधूनमधून ताळा-पडताळा घेतला पाहिजे. आपल्या किंवा आपल्या कुटुंबातील कोणाच्याही राक्षसी महत्त्वाकांक्षांना वेळीच वेसण घालणे गरजेचे असते. आपली विचारसरणी सुसूत्र ठेवावी व ती तशी आहे ना याचा अंदाज त्या विषयातील तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेतून येत राहील. आज अनेक विकारांवर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत, मात्र विकारांवर उपचार करण्याची वेळ येऊ न देता त्यांचा प्रतिबंध करणे यातच सूज्ञपणा आहे.

आजार टाळण्यासाठी उपाय...

आजार टाळावयाचे असतील तर प्रत्येकाने आपले खाणे-पिणे, व्यायाम, सवयी व मनःस्थितीकडे लक्ष दिले पाहिजे. आहारात पालेभाज्या, शिरांच्या भाज्या, दुधी भोपळा, कोबी, फुलकोबी, नाचणी, वरई, दूध, दही, गाजर, काकडी, टोमॅटो, मुळा, कांदा, पेरू, बीट, पपई, कलिंगड यांचा समावेश भरपूर असावा.

तूप, लोणी, साय, तेल, इतर तृणधान्ये, शेंगदाणे यांचा समावेश मर्यादित असावा. साखर, गोड पदार्थ, तळण, मसाले, आंबा, द्राक्षे, केळी, चिकू सहसा टाळावेत. मासळी व अंड्यातील पांढरा बलक सेवनाने फायदा होऊ शकतो.

मद्यपान किंवा धूम्रपान कटाक्षाने टाळावे. मद्यपानामुळे स्वादुपिंडाला अपाय होऊ शकतो. स्वादुपिंडातील बीटा पेशींचे कार्य न झाल्यास मधुमेह होतो. शिवाय मद्यपानामुळे काही व्यक्तींच्या रक्तातील ट्रायग्लिसराईड्‌स वाढतात.

मद्यातून उष्मांक मिळाल्याने वजन वाढते, एकूणच मधुमेहाची प्रवृत्ती बळावते. तंबाखूतून येणारा निकोटिनचा रेणू रक्तवाहिन्या अरुंद करतो, रोहिणीकाढिण्य होण्यास पुन्हा हातभार लागतो.
(लेखक ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate